मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /रोज बटाटे खाऊनही वजन होऊ शकतं कमी; संशोधकांचा दावा

रोज बटाटे खाऊनही वजन होऊ शकतं कमी; संशोधकांचा दावा

आरोग्यासाठी बटाट्याचा वापर

आरोग्यासाठी बटाट्याचा वापर

स्टार्च मुबलक असलेले बटाटे तुमचं वजन कमी करू शकतात, असं संशोधकांचं मत आहे. मात्र त्यासाठी बटाटा योग्य पद्धतीने खाणं आवश्यक आहे. या संशोधनातून नेमके काय निष्कर्ष समोर आले आहेत, ते जाणून घेऊया.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई 01 डिसेंबर :  गेल्या काही वर्षांत लठ्ठपणाची समस्या वाढली आहे. वजन वाढणं, लठ्ठपणामुळे अनेक लोक त्रस्त आहेत. कारण या गोष्टींमुळे हृदयविकार, डायबेटिससारखे गंभीर आजार होण्याचा धोका वाढला आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पोषक आहार आणि व्यायाम गरजेचा आहे. लठ्ठपणाचा सामना करत असलेल्या लोकांना आहारतज्ज्ञ, डॉक्टर काही विशिष्ट पदार्थ किंवा कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थ आहारातून वर्ज्य करण्याचा सल्ला देतात. या पदार्थांमध्ये प्रामुख्याने बटाट्याचा समावेश असतो. पण भरपूर बटाटे खाऊनदेखील तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. हे कसं शक्य आहे, असा प्रश्न तुमच्या मनात कदाचित येईल. पण ही बाब एका संशोधनातून समोर आली आहे. स्टार्च मुबलक असलेले बटाटे तुमचं वजन कमी करू शकतात, असं संशोधकांचं मत आहे. मात्र त्यासाठी बटाटा योग्य पद्धतीने खाणं आवश्यक आहे. या संशोधनातून नेमके काय निष्कर्ष समोर आले आहेत, ते जाणून घेऊया. `आज तक`ने या विषयी माहिती दिली आहे.

    वजन कमी करण्यासाठी फिटनेस एक्सपर्ट सर्वप्रथम कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ आहारातून वगळण्याचा सल्ला देतात. बऱ्याचदा जेवण करताना पोट भरण्यासाठी आपण असे पदार्थ खातो, ज्यामध्ये कॅलरी जास्त असतात. त्यामुळे आपलं वजन कमी होण्याऐवजी वाढू लागतं. सर्व उपाययोजना करूनही वजन का वाढत आहे, हे आपल्याला समजत नाही. पण तुम्ही स्टार्चचं प्रमाण मुबलक असलेले बटाटे खाऊन वजन कमी करू शकता, असं संशोधकांचं मत आहे. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये योग्य पद्धतीने बटाट्याचा समावेश केला तर निश्चितच सकारात्मक परिणाम दिसून येतात, असं संशोधनातून दिसून आलं आहे.

    हेही वाचा - Good Quality Sleep : काय असते गुड क्वालिटी स्लिप? हे संकेत सांगतील कशी आहे तुमची झोप

    हे संशोधन जर्नल ऑफ मेडिसिनल फूडमध्ये प्रकाशित झालं आहे. या संशोधनात सहभागी झालेल्यांनी रोजच्या आहारात बटाट्याचा समावेश केल्याने त्यांचं वजन 5.8 किलोग्रॅमने कमी झालं. त्या तुलनेत बीन्स खाणाऱ्या लोकांचं वजन चार किलोनी कमी झालं, असा दावा संशोधकांनी केला आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, जे लोक आपल्या आहारात बटाट्याचा समावेश करतात, त्यांचं पोट लवकर भरतं. बाकीच्या लोकांच्या तुलनेत हे लोक कमी जेवतात. कारण बटाट्यात कार्बोहायड्रेट असतात. त्यामुळे बटाटयाचा समावेश पचायला जड पदार्थांमध्ये होतो.

    जड पदार्थ पचायला वेळ जास्त लागतो. त्या तुलनेत पचायला हलके पदार्थ कितीही प्रमाणात खाल्ले तरी ते सहज पचतात. जड पदार्थांमुळे तुमचं पोट लवकर भरतं. त्यामुळे तुम्हाला जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. बटाट्यामुळे पोट बराचवेळ भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा होत नाही. 100 ग्रॅम बटाट्यात सुमारे 80 कॅलरीज असतात. गाजर किंवा ब्रोकोलीसारख्या भाज्यांच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. मात्र चपाती, भात किंवा पास्ताच्या तुलनेत यात कॅलरीज कमी असतात.

    हेही वाचा - गरमागरम पोळीवर तूप लावून खायला आवडते, पण हे कॉम्बिनेशन आपल्यासाठी हेल्दी आहे का?

    बटाटा हा वजन वाढवणारा पदार्थ मानला जातो. यामुळे लठ्ठपणा, डायबेटिस टाइप -2 आणि हृदयविकार होऊ शकतो. पण आहारात तुम्ही बटाटा किती आणि कशा पद्धतीनं खाता यावरही या गोष्टी अवलंबून असतात. जर तुम्ही आहारात जड पदार्थांचा समावेश केला तर तुम्हाला कॅलरी कमी मिळतील आणि पोट लवकर भरेल. या संशोधनासाठी संशोधकांच्या पथकाने 18 ते 60 वयोगटातील 36 लोकांचे मूल्यांकन केलं. हे लोक लठ्ठपणा, इन्शुलिन रेझिस्टन्सने ग्रस्त होते. इन्शुलिन रेझिस्टन्स ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये पेशी रक्तातील साखर (रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण) शोषण्यास सक्षम नसतात. त्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढते. आठ आठवड्यांच्या या अभ्यासादरम्यान सहभागी लोकांना लंच आणि डिनरवेळी चपाती, भात आणि पास्तासह 85 ग्रॅम मासे किंवा मांस आणि 57 ग्रॅम बटाटे अथवा शिजवलेली डाळ देण्यात आली.

    संशोधनात सहभागी लोकांना बटाटे खाण्यासाठी देण्यापूर्वी ते सालांसह 12 ते 24 तास फ्रीजमध्ये ठेवले गेले. कारण कुलिंग प्रोसेसमध्ये बटाट्यातील फायबरचं प्रमाण वाढतं आणि यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढत नाही. सर्वसामान्यपणे डायबेटिसच्या रुग्णांनी बटाटा खाल्ल्यानंतर ब्लड शुगर लेव्हल वाढते. हे टाळण्यासाठी बटाटे फ्रीजमध्ये ठेवले गेले. डायबेटिसच्या रुग्णांनी या पद्धतीने बटाट्याचे सेवन केलं तर त्यांना त्याचा त्रास होणार नाही.

    वजन कमी करण्यासाठी बटाटे शिजवण्याची आणि त्याचे पदार्थ बनवण्याची पद्धत महत्त्वाची आहे. बटाटयामुळे वजन कमी होतं म्हणून तुम्ही चिप्स किंवा तेलात तळलेले बटाट्याचे पदार्थ हवे तितके खाणं योग्य नाही. तेलामुळे बटाट्यातील पोषक घटक कमी होतात आणि त्यामुळे वजन वाढू लागतं. अमेरिकेतील लुईसियाना येथील पेनिंग्टन बायोमेडिकल रिसर्च सेंटरमधील डाएटिशियन आणि या संशोधनाच्या सहप्रमुख प्रा. कँडिडा रेबेलो यांनी सांगितलं, ``वजन कमी करण्यासाठी प्रयत्नशील असलेले लोक दीर्घकाळ पोट भरलेलं वाटावं आणि वारंवार भूक लागू नये यासाठी कॅलरीकडे दुर्लक्ष करत एकाच पद्धतीचं जेवण करतात. त्यामुळे कमी कॅलरी असलेले जड पदार्थ यावर उत्तम पर्याय ठरू शकतात, ``असं रेबेलो म्हणाल्या.

    ``अन्नाचं प्रमाण कमी न करता, बटाट्याचा समावेश करून कॅलरीजचं प्रमाण कमी करणं हा आमच्या संशोधनाचा मुख्य पैलू होता. संशोधनादरम्यान आम्ही ज्यांचं मूल्यांकन केलं त्यांना त्यांच्या रोजच्या कॅलरीच्या गरजेनुसार अन्न दिलं गेलं. पण यादरम्यान, काही सहभागी स्वयंसेवकांच्या प्लेटमध्ये मांसाऐवजी बटाट्याचा समावेश केला. बटाट्याचं सेवन केलेल्या सहभागी स्वयंसेवकांचं पोट लवकर भरलं आणि त्यामुळे ते प्लेटमधील अन्य पदार्थ खाऊन संपवू शकले नाहीत, असं आम्हाला दिसून आलं. बटाट्यामुळे त्यांचं पोट बराचवेळ भरलेलं राहिलं आणि त्यांना परत भूक लागली नाही,`` असं कँडिडा यांनी सांगितलं. कॅंडिडा यांच्या मते, ``एकूणच या संशोधनाच्या निष्कर्षातून असं दिसून आलं की तुम्ही उपाशी न राहता थोडेसे प्रयत्न केले तर तुमचं वजन अगदी सहजपणे कमी करू शकता. ``

    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle