मुंबई, 20 जानेवारी: सर्वांच्या स्वयंपाकघरात बटाटा (Potato) असतोच. घरात कोणतीही भाजी नसेल, तर बटाट्याची भाजी हा हक्काचा पर्याय. तसंच बटाट्यापासून वेगवेगळे रुचकर पदार्थ बनवले जातात. बटाटा उपवासालाही चालतो. बटाट्यांचा जास्त प्रमाणात वापर करण्यात येत असल्याने अनेकदा बटाटे मोठ्या प्रमाणात खरेदी करून घरात ठेवले जातात. अशा वेळी या बटाट्यांना कोंब (Sprouted potatoes) फुटतात; मात्र कोंबांकडे दुर्लक्ष करून ते बटाटे तसेच वापरले जातात. तुम्हाला माहिती आहे का, की कोंब आलेले बटाटे खाणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. तुमच्या घरात ठेवलेल्या बटाट्यांना कोंब फुटू लागले असतील किंवा फुटले असतील, तर ते बटाटे फेकून देणंच चांगलं आहे. कारण ते आरोग्यासाठी धोकादायक असल्याचं नॅशनल कॅपिटल पॉयझन सेंटरने (National capital poison center) म्हटलं आहे. सोलानाइन आणि चाकोनाइन हे काही विषारी पदार्थ बटाट्यामध्ये नैसर्गिकरीत्याच असतात. बटाट्यांमध्ये त्यांचं प्रमाण कमी असलं, तरी ते रोपांमध्ये आणि पानांमध्ये जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे बटाट्यांना कोंब फुटल्यानंतर बटाट्यामध्ये या दोन्ही विषारी घटकांचं प्रमाण वाढू लागतं. अशा परिस्थितीत कोंब फुटलेले बटाटे खाल्ल्यानंतर हे विषारी घटक आपल्या शरीरात पोहोचतात. असे कोंब फुटलेले बटाटे एकदा किंवा दोनदा खाल्ल्याने जास्त नुकसान होत नाही; पण जास्त प्रमाणात सेवन झाल्यास पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. ही माहिती नॅशनल कॅपिटल पॉयझन सेंटरच्या अहवालात दिली आहे. हे वाचा- रोज 10 कप कॉफी पिण्याचं व्यसन;अखेर 55 किलोने घटवलं वजन, वाचा तिने नेमकं काय केलं बटाट्यातले विषारी घटक शरीरात जास्त प्रमाणात पोहोचले, तर अनेक लक्षणं दिसू लागतात. उलट्या, जुलाब आणि पोटदुखीसारख्या लक्षणांचा त्यात समावेश असतो. काही जणांमध्ये ही लक्षणं सौम्य असू शकतात, तर काहींमध्ये ती गंभीर स्वरूपाची असू शकतात. स्थिती अधिक गंभीर झाल्यास कमी रक्तदाब, ताप आणि डोकेदुखी यांसारखी लक्षणं दिसतात. त्यामुळे कोंब आलेले बटाटे खाणं हे वेळीच थांबवलं नाही, तर मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे खबरदारी बाळगावी आणि कोंब फुटलेले बटाटे फेकून द्यावेत. हे वाचा- तुम्ही Paracetamol चा ओव्हरडोस तर घेत नाहीत ना? घेत असाल तर सावधान! ं बटाट्यांना कोंब फुटू नयेत, यासाठी काही काळजी घेऊ शकता. यासाठी बटाटे अशा ठिकाणी ठेवा, जेथे सूर्याची किरणं पोहोचणार नाहीत. तसंच ती जागा जास्त थंडही नसावी. बटाटे नेहमी कांद्यांपासून वेगळे ठेवा. कारण कांद्यांतून बाहेर पडणाऱ्या विशिष्ट वायूमुळे बटाट्यांना कोंब फुटण्यास सुरुवात होते. मोठ्या प्रमाणात बटाटे खरेदी केले, तर त्यांना हवा लागेल अशा कॉटनच्या पिशवीत ठेवू शकता. बटाट्यांचा रंग हिरवा दिसत असेल किंवा आधीच कुठे तरी कोंब फुटला असेल तर तो काढून टाकावा. तसंच कोंब फुटलेल्या बटाट्याचा तुम्ही एक चांगला वापर करू शकता. तो कोंब फुटलेला बटाटा आपल्या बागेत लावू शकता. त्यातून बटाट्याचं रोप उगवतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.