नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : दिवाळीचा सण आलाय, चोहीकडे या सणाचा आनंद आणि उत्साह दिसून येतोय. आज, 22 ऑक्टोबरला धनत्रयोदशी असून 24 ऑक्टोबरला नरकचतुर्दशी अर्थात दिवाळी आहे. काही घरांमध्ये दिवाळीची तयारी पूर्ण झाली आहे, तर काही ठिकाणी तयारी शेवटच्या टप्प्यात आहे. दिवाळीचा सण सुमारे 5 दिवस चालणारा असतो आणि या सणाची सुरुवात आज म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवसापासून होते. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी, भांडी, कपडे अशा वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं. दिवाळी हा नवीन सुरुवात करण्याचा, आनंद, समृद्धी व भरभराटीचा सण आहे. आजच्या दिवशी काही खास पदार्थ बनवण्याचीही परंपरा आहे. धनत्रयोदशीला हे पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य देवाला अर्पण केल्याने व नंतर त्या पदार्थांचं सेवन केल्याने सौभाग्य प्राप्त होतं, असं मानलं जातं. या संदर्भात माहिती देणारं वृत्त ‘टीव्ही 9 हिंदी’ने दिलं आहे. हेही वाचा - Diwali 2022: छोटी जागा आहे…नो टेन्शन! ‘या’ पद्धतीनं काढा सुंदर रांगोळी, Video पंचामृत पंचामृताचा वापर प्रत्येक पूजेत केला जातो. हे पवित्र पेय पाच घटकांचं मिश्रण करून बनवलं जातं. यामध्ये असलेल्या पाच घटकांना विशेष महत्त्व आहे. पंचामृतात मध हे एकतेचं, दूध पवित्रतेचं, साखर आनंदाचं, दही हे समृद्धीचं आणि तूप हे शक्तीचं प्रतीक आहे. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी पंचामृत सेवन करायला हवं. बुंदीचे लाडू धनत्रयोदशीला बुंदीचे लाडू बनवून त्याचा नैवेद्य गणपतीला अर्पण करणं शुभ मानलं जातं. या दिवशी लक्ष्मीसोबत गणपतीची पूजा केली जाते. म्हणूनच बुंदीचे लाडू प्रसाद म्हणून खाल्ल्याने सौभाग्य प्राप्त होतं, असं म्हटलं जातं. गूळ-मेथीचे लाडू धनत्रयोदशीला गूळ आणि मेथीचे लाडू बनवणं हा नैवेद्याचा विशेष भाग आहे. हिवाळा सुरू होणार असल्याने हा लाडू शरीराला उष्ण ठेवण्यासाठीही चांगला मानला जातो. तसंच गूळ संपत्तीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे याचं सेवन करणं चांगलं असतं. लापशी सणांमध्ये लापशी या पदार्थाला खूप महत्त्व आहे. लापशी पिता येईल, इतकी पातळ बनवली जाते. धनत्रयोदशीला गव्हापासून बनवलेली ही गोड लापशी बनवून देवाला नैवेद्य दाखवणं शुभ मानलं जातं. अशा रीतीने धनत्रयोदशीला भगवान गणेश आणि लक्ष्मीची पूजा करताना त्यांना वरीलपैकी कोणताही नैवेद्य अर्पण करता येईल. देवाला अर्पण केल्यानंतर तुम्ही ते प्रसादाच्या रूपात सेवन करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.