मुंबई, 31 ऑक्टोबर : आपलं मानसिक आरोग्य हे आपल्या एकूण आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपण सामाजिकदृष्ट्या कसे वागतो, हे आपल्या मानसिक आरोग्याच्या स्थितीवर अवलंबून असतं. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूंमध्ये मानसिक आरोग्य किती मोलाची भूमिका बजावतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यानुसार, योग्य उपायांचा वापर करून मानसिक आरोग्याची काळजी घेतली पाहिजे किंवा त्यात सुधारणा केली पाहिजे. कारण विविध घटक आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतात. यापैकी आहार आणि जीवनशैली हे दोन सर्वांत महत्त्वाचे घटक आहेत. खराब जीवनशैली आणि निकृष्ट आहारामुळे बरेच लोक तणावाखाली राहतात. त्यामुळे त्यांची प्रॉडक्टिव्हिटीही कमी होते. अशा परिस्थितीत, आपण आहारात अनेक प्रकारचे आरोग्यदायी पदार्थ समाविष्ट करू शकता. जेणेकरून मानसिकदृष्ट्या निरोगी राहता येईल. दैनंदिन आहारामध्ये तुम्ही खालील अन्न पदार्थांचा समावेश करू शकता. त्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य तर चांगलं राहीलच शिवाय स्मरणशक्तीदेखील सुधारेल. हेही वाचा - Winter Care : हिवाळ्यातील रुक्ष, कोरड्या त्वचेपासून मिळवा सुटका, अशाप्रकारे वापरा बदाम आणि कोरफड मासे: माशांमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स असतात. विशेषत: सालमन, सार्डिन या माशांमध्ये मुबलक प्रमाणात हेल्दी फॅटी अॅसिड्स आढळतात. मानवी मेंदूच्या आरोग्यासाठी ही अॅसिड्स खूप महत्त्वाची आहेत. त्यांच्यामुळे मानसिक आरोग्य सुधारतं. शिवाय, शरीराला इतरही अनेक फायदे होतात. हिरव्या पालेभाज्या: हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं. त्यात व्हिटॅमिन के, अल्फा-लिनोलिक अॅसिड आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. पालेभाज्यांतील या गुणधर्मांमुळे आपल्या मानसिक आरोग्यामध्ये सुधारणा होते. याशिवाय, आरोग्याशी संबंधित इतर अनेक समस्यांपासून सुटका मिळते. विविध प्रकारच्या बेरी - मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आहारात विविध बेरींचाही समावेश करू शकता. एका संशोधनानुसार, बेरीज खाल्ल्यानं व्यक्तीचा मूड सुधारण्यास मदत होते आणि डिप्रेशनची लक्षणंही कमी होतात. ब्लू बेरीशिवाय बदाम, भोपळ्याच्या बिया इत्यादींचाही आहारात समावेश करता येऊ शकतो.
ड्राय फ्रुट्स: आहारतज्ज्ञ रोज सुकामेवा म्हणजेच ड्रायफ्रुट्स खाण्याचा सल्ला देतात. विशेषतः बदाम दिवसातून चार ते पाच बदाम भिजवून खाल्लेच पाहिजेत, असं सांगितलं जातं. बदामांमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ई असतं. अक्रोडामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतं. यामुळे स्मरणशक्ती सुधारते. म्हणून चांगल्या मानसिक आरोग्यासाठी सुकामेवा खाल्ला पाहिजे. हे पदार्थ खाल्लेत तर आरोग्य चांगलं राहील आणि आरोग्य चांगलं राहिलं तरच तुम्ही आयुष्याचा आनंद घेऊ शकाल.