नवी दिल्ली, 25 मे: दारू पिणं (Alcohol Consumption) हे आरोग्यासाठी घातक असतं, त्यामुळं अनेक आजार होतात, रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) कमी होते, हे शास्त्रीयदृष्ट्याही सिद्ध झालं आहे. तरीही जगभरात दारूचा खप मोठ्या प्रमाणात होतो. सध्याच्या कोरोना साथीच्या काळात (Corona Virus Pandemic) तर दारूमुळे विषाणूचा नाश होत असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. कसलेही वैज्ञानिक पुरावे किंवा कसलंही संशोधन झालेलं नसताना अगदी ठामपणे अल्कोहोल सेवनानं विषाणूचा नाश होत असल्याचं सांगितलं जात होतं. अर्थातच नंतर हे सगळे उपाय चर्चेपुरते उरले, पण यामुळे शतकापूर्वी आलेल्या एका महाभयंकर साथीच्या आठवणींना उजाळा मिळाला.
या साथीत व्हिस्कीचा (Whisky) औषध म्हणून सर्रास वापर झाला होता. ही साथ स्पॅनिश फ्लूची (Spanish Flu) होती. आजही स्पॅनिश फ्लू हा सर्व साथीच्या आजारांपैकी सर्वात प्राणघातक रोग म्हणून ओळखला जातो. 1918 ते 1920 दरम्यान पसरलेल्या या महाभयानक आजारानं जगातील 3 ते 5 टक्के लोकसंख्या नष्ट केली होती. या साथीत 5 ते 10 कोटी लोकांचे जीव गेले होते, असं एबीपीलाईव्ह डॉट कॉमच्या वृत्तात म्हटलं आहे.
व्हिस्कीचा औषध म्हणून वापर -
या साथीचा प्रसार अमेरिकेत झाला तेव्हा लोकांनी अनेक जुन्या उपचारांचा वापर करण्यास सुरुवात केली. यामध्ये एक लोकप्रिय उपाय होता व्हिस्कीचा (Whisky). अगदी अल्प प्रमाणात व्हिस्की घेतल्यास त्याचा औषध (Medicine) म्हणून उपयोग होत असल्याचं सांगितलं जात होतं. त्याकाळी इन्फ्लूएन्झापासून स्वत:चं रक्षण करण्यासाठी डॉक्टर, नर्स आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी नियमित व्हिस्कीचा वापर करत. काही डॉक्टरांचा असा विश्वास होता की, रोगामुळे कमकुवत होणारी श्वसन प्रणाली आणि हृदयाला व्हिस्कीमुळे उत्तेजना मिळते. 1918 मध्ये कोणतंही अँटीबायोटिक उपलब्ध नव्हतं. त्यामुळे रूग्णांसाठी अॅस्पिरिन, स्ट्रीकनिनपासून हॉर्लिक, विक्स व्हेपोरब आणि व्हिस्कीपर्यंत नानाविध औषधांचा वापर केला जात असे.
4 एप्रिल 1919 रोजी एका वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या एका लेखात असं म्हटलं होतं की, 'व्हिस्की केवळ उत्तेजक म्हणूनच काम करत नाही, तर ती वेदनाही कमी करते. यामुळे अस्वस्थता कमी होते आणि आजारापासून मुक्त झाल्याची भावना निर्माण होते त्यामुळे विषाणूचा संसर्ग रोखण्यास मदत होते'.
एका मद्य विक्रेत्याचा हवाला देऊन यात असंही म्हटलं होतं की, 'ही साथ आल्यापासून व्हिस्कीच्या विक्रीत तिप्पट वाढ झाली असून, काही लोक थेट वापर करत आहेत. तर काही लोक केकसह किंवा अन्य पदार्थांसह तिचा वापर करत आहेत. डॉक्टरांनीच व्हिस्कीच्या वापराची शिफारस केल्याचं आमच्या काही ग्राहकांनी सांगितलं आहे. तर काहींनी मित्रांना चांगला फायदा झाल्याचं सांगितलं आहे. ज्यांनी आयुष्यात कधीही व्हिस्की घेतलेली नाही, असे लोकदेखील आता व्हिस्की घेत आहेत'.
स्पॅनिश फ्लूवरील उपचार -
त्यावेळी अमेरिकी (USA) नौदलाच्या (Navy) शिकागोजवळील ग्रेट लेक्स नेव्हल स्टेशनवर तैनात असलेल्या नर्स ज्युली मॅबेल ब्राउन म्हणतात, 'आमच्याकडे रुग्ण खूप होते, पण त्यांच्यावर उपचार करायला वेळ नव्हता. आम्ही ना त्यांच्या शरीराचे तापमान मोजयाचो ना आमच्याकडे त्यांचा रक्तदाब तपासण्याकरता वेळ होता. आम्ही त्यांना थोडी गरम व्हिस्की देत असू. त्यावेळी आम्ही तेवढेच करू शकत होतो. त्यामुळे काहींना रक्तस्त्राव व्हायचा तर काहीजण बेशुद्ध होत. अतिशय भयानक काळ होता. आम्हाला कायम ऑपरेटिंग मास्क आणि गाऊन घालून सज्ज राहावे लागत होते.’
व्हिस्की औषध म्हणून वापरली जाऊ शकते?
स्पॅनिश फ्लूच्या साथीदरम्यान व्हिस्कीच्या वापराला शास्त्रीय पुरावा नव्हता. वेदनाशामक म्हणून व्हिस्कीचा उपयोग होत असे, त्यामुळे डॉक्टरच शिफारस करत असत. अल्कोहोलमध्ये कोणतेही औषधी गुणधर्म नसतात, असं 1917 मध्ये अमेरिकन मेडिकल असोसिएशननं स्पष्ट केलं होतं. सध्याच्या कोविड-19 च्या काळात तुम्हाला या आजाराची कोणतीही लक्षणं जाणवल्यास स्वत:च्या मनाने कोणतेही उपचार करू नका. यामुळं धोका वाढू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Whisky