मुंबई, 3 ऑक्टोबर : नवरात्र हा देवीचा सर्वांत मोठा उत्सव असतो. देशभरातील विविध भागांमध्ये हा उत्सव विविध प्रकारे साजरा केला जातो. घटस्थापना आणि विजयादशमी प्रमाणेच नवरात्रातील अष्टमी आणि नवमीचे दिवसही महत्त्वाचे असतात. याला महाअष्टमी आणि महानवमी किंवा खंडेनवमी असंही म्हणतात. दृक पंचागानुसार आज (3 ऑक्टोबरला) 4.37 मिनिटांनी नवमी लागते आहे. उद्या 4 ऑक्टोबरला 2.20 मिनिटांनी नवमी समाप्त होते आहे. नवरात्रातील नवमीच्या दिवसाचं महत्त्व, पूजा व मुहूर्त याबाबत इंडियन एक्स्प्रेसनं वृत्त दिलं आहे. वाईट गोष्टींचा अंत करून एक नवी सुरुवात करण्याच्या दृष्टीनं नवरात्राचं महत्त्व आहे. आदिशक्तीच्या असुरांवरील विजयाचा हा उत्सव आहे. विजयादशमीला देवीनं महिषासुराचा वध केल्याने तिला महिषासुरमर्दिनी म्हटलं जातं अशी आख्यायिका आहे. याचदिवशी भगवान श्रीरामांनी रावणाला युद्धात हरवलं होतं. वाईटावर चांगल्याचा विजय हे या सणातून प्रतिबिंबित होतं. हेही वाचा - अशी रांगोळी स्पर्धा कधीच पाहिली नसेल; 45 मिनिटात महिलांनी केली कमाल नवरात्रातील काही प्रमुख दिवसांपैकी एक दिवस म्हणजे महानवमीचा दिवस. यंदा उद्या, 4 ऑक्टोबरला नवमी आहे. दृक पंचांगानुसार, आज (3 ऑक्टोबर) दुपारी 4.37 वाजता नवमीचा प्रारंभ होतो आहे, तर उद्या 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.20 पर्यंत नवमी असेल. या दिवशी नऊ दिवसांच्या देवीच्या उत्सवाची सांगता होते. भाविक नवरात्राच्या काळात नऊ दिवसांचे उपवास धरतात. अनेक घरांमध्ये हे उपवास नवमीला सोडले जातात. या दिवशी सकाळी लवकर उठून देवीची पूजा आणि आरती केली जाते. देवीचं प्रस्थान होणार असल्यामुळे माहेरवाशीण समजल्या जाणाऱ्या देवीची शोडषोपचारे पूजा केली जाते. देवीला महास्नान घातलं जातं. अनेक प्रकारचे नैवेद्य देवीला दाखवले जातात. भारतात पश्चिम बंगालमध्येही दुर्गादेवीचा मोठा उत्सव असतो. नवमीच्या दिवशी पश्चिम बंगालमधील अनेक भागांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. नऊ दिवस घरांमध्ये घट बसलेले असल्यामुळे अनेकांच्या भावना त्यासोबत जोडलेल्या असतात. त्यामुळेच देवीच्या प्रस्थानावेळी भक्त भावूक होतात. देशातील अनेक भागांत नवरात्रामध्ये कुमारिका पूजनाची प्रथा आहे. त्यासाठी वयात न आलेल्या लहान मुलींची घरोघरी पूजा केली जाते. त्यांचे पाय धुवून, औक्षण करून त्यांना भोजन दिलं जातं. काही ठिकाणी भेटवस्तूही मुलींना दिली जाते. अष्टमी व नवमी हे दोन्ही दिवस नवरात्रात खूप महत्त्वाचे मानले जातात. अष्टमीच्या दिवशी अनेकांचा उपवास असतो. काही घरांमध्ये नवमीला नवरात्र उठतं. या दिवशी देवीच्या रुपातील कुमारिका, सवाष्णीला जेवू घालून देवीला निरोप दिला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.