मुंबई, 18 नोव्हेंबर : मित्र-मैत्रीण किंवा समोरच्या व्यक्तीचं लक्ष वेधण्यासाठी अनेक जण निरनिराळ्या प्रकारच्या क्लृप्त्या लढवतात. काही तरी हटके गोष्ट करून मित्रांना आकर्षित करणं, त्यांच्याकडून वाहवा मिळवणं या गोष्टींची काही तरुणांना सवय असते. यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. सध्या ब्रिटनमधला एक तरुण अशाच विचित्र कृतीमुळे चर्चेत आहे. हा तरुण मित्रांना इम्प्रेस करण्यासाठी एका वेळी डझनभर एनर्जी ड्रिंक्स प्यायला. त्याची ही विचित्र कृती त्याच्या अंगलट आली. एनर्जी ड्रिंक्सचा अतिरेक या तरुणाच्या जीवावरच बेतला असता. सुदैवाने वैद्यकीय उपचार मिळाले आणि त्याचा जीव वाचला. ब्रिटनच्या एका डॉक्टरने या तरुणाची कहाणी आपल्या यू-ट्यूब व्हिडिओद्वारे शेअर केली आहे. एनर्जी ड्रिंकचा या तरुणाच्या आतड्यांवर कसा परिणाम झाला हे या व्हिडिओतून सांगितलं गेलं आहे. ब्रिटनमध्ये राहणारा एका गेमर मित्रांना इम्प्रेस करण्यासाठी एका वेळी एक डझन एनर्जी ड्रिंक्स प्यायला. त्याचे गंभीर परिणाम त्याच्या शरीरावर झाले. जेएस असं या गेमरचं नाव असून, त्याची कहाणी ब्रिटनमधल्या डॉ. बर्नार्ड यांनी यू-ट्यूब व्हिडिओद्वारे शेअर केली आहे. एनर्जी ड्रिंक्सच्या दुष्परिणामामुळे या गेमरची आतडी स्वतःलाच कशी खाऊ लागली, हे यात सांगितलं आहे. हेही वाचा - केवळ बिस्किटं खाऊन जगतेय इंग्लंडमधली तरुणी; ‘या’ दुर्मीळ आजारामुळे ओढवली वेळ शरीरात एक डझन एनर्जी ड्रिंक्स गेल्यानं त्यातलं अति कॅफिन, साखर आणि अन्य रसायनांमुळे जेएसच्या आतड्यांवर विपरीत परिणाम झाला. ‘त्याला अॅक्यूट पॅंन्क्रियाटिस झाला. यामुळे त्याची आतडी स्वतःच नष्ट होऊ लागली होती’, असं डॉक्टरांनी सांगितलं. यामुळे तरुणाचा जीव धोक्यात आला होता; पण डॉक्टरांनी तातडीने अँटीबायोटिक्स देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. डॉ. बर्नार्ड यांनी सांगितलं, ‘36 वर्षांच्या या गेमरला कामादरम्यान आपल्या मित्रांना इम्प्रेस करण्याची इच्छा झाली आणि त्याने एकामागून एक 12 एनर्जी ड्रिंक्स घेतली. यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्याच्या हृदयाचे ठोके वाढले. अति कॅफिनमुळे असा त्रास जाणवत असेल असं त्याला वाटलं. त्यानंतर त्याची कंबर दुखू लागली. वेदना दूर व्हावी यासाठी त्याने एक ड्रिंक अल्कोहोल घेतलं. त्यामुळे त्याची प्रकृती जास्त ढासाळली आणि त्याला उलट्या होऊ लागल्या’. प्रकृती बिघडलेली असताना जेएसने रुग्णालयात न जाता बरं होण्यासाठी एक दिवस वाट पाहिली. जेव्हा खाणं-पिणं अवघड झालं तेव्हा त्याने रुग्णालय गाठलं. रुग्णालयात पोहोचल्यावर त्याने नर्सच्या शूजवर उलटी केली. मित्रांना प्रभावित करण्याच्या नादात आपण एक मूर्खपणा केला आहे, हे तो डॉक्टरना सांगू शकत नव्हता; मात्र त्याला नेमकं काय झालंय याचं निदान डॉक्टरनी केलं. या माणसाची आतडी स्वतःलाच संपवू लागली आहेत, हे डॉक्टरांना कळलं. हा प्रकार केवळ एनर्जी ड्रिंक्समुळे घडत होता. त्यानंतर डॉक्टरांनी तातडीने उपचार केले. काही दिवसांत जेएस बरा झाला आणि रुग्णालयातून घरी परतला. ही घटना त्याला आयुष्याचा धडा देणारी ठरली. ‘जास्त प्रमाणात एनर्जी ड्रिंक्स घेत असाल तर ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे’, असं डॉ. बर्नार्ड यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.