मानवी शरीर हे सर्वांत गुंतागुंतीचं यंत्र मानलं जातं. काही वेळा अशा शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागतं, ज्याबद्दल आपण कदाचित कधी ऐकलंही नसेल. अलीकडच्या काळात विविध कारणांमुळे गुंतागुंतीचे आणि दुर्मीळ आजार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. ब्रिटनमधल्या एका महिलेला असाच एक विचित्र आजार आहे. यामुळे ती काहीही खाऊ-पिऊ शकत नाही. ती केवळ बिस्किटं खाऊनच जगत आहे. तालिया सिनोट नावाच्या 25 वर्षांच्या तरुणीला एक दुर्मीळ आजार आहे, ज्यामुळे ती डायजेस्टिव्ह बिस्किटांव्यतिरिक्त काहीही खाऊ शकत नाही. ज्या गोष्टी तिच्या शरीराला आवश्यक आहेत, त्यादेखील तिच्या घशातून खाली जात नाहीत. तिनं इतर काही पदार्थ खाल्ले तर तिला लगेच उलट्या होतात. या दुर्मीळ आजारावर एकमेव तांत्रिक उपाय आहे; मात्र तो खूप महागडा असल्याने तिचे पालक या उपायासाठी पैशांची जमवाजमव करत आहेत. जोपर्यंत तिच्या पोटात एक विशिष्ट यंत्र बसवलं जात नाही, तोपर्यंत ती इतर कोणताही पदार्थ खाऊ शकत नाही. त्यामुळे तिला सध्या तरी बिस्किटांवर अवलंबून राहण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. डायजेस्टिव्ह बिस्किटांव्यतिरिक्त इतर पदार्थ नाही पचत इंग्लंडमध्ये वॉल्व्हहॅम्पटनमध्ये राहणाऱ्या तालिया सिनोटला गॅस्ट्रोपॅरोसिस नावाचा दुर्मीळ आजार झाला आहे. या स्थितीत मानवी शरीरातली अन्नाची हालचाल मंदावते किंवा पूर्णपणे थांबते. पोटातून अन्न लहान आतड्यापर्यंत पोहोचू शकत नाही. `बीबीसी`शी बोलताना तालियाने सांगितलं, `यामुळे जीवन जगणं खूप कठीण बनलं आहे. मी एखाद्या वेळी जास्त प्रमाणात अन्न खाल्लं किंवा एखादं पेय प्यायलं तर मला वेदना होतात आणि उलट्या होऊ लागतात. मला पोषक घटक नळीद्वारे दिले जातात. मला 2018 मध्ये या आजाराची लक्षणं सर्वप्रथम जाणवली होती.` विषाणू संसर्गानंतर पचनसंस्था झाली ठप्प तालिया सिनोटने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीत तिला एका विषाणूचा संसर्ग झाला होता. या विषाणूने तिच्या पचनसंस्थेवर हल्ला केला आणि त्यानंतर तिची स्थिती अशी बनली. तालियाच्या वडिलांनी यावर खूप संशोधन केल्यानंतर लंडनमधल्या एका तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला. या आजारावर कोणतेही उपचार नाहीत. एका गॅस्ट्रिक पेसमेकरच्या मदतीने पोटातले स्नायू अन्नपचनाची क्रिया पूर्ण करू शकतात; मात्र त्यासाठी मोठा खर्च अपेक्षित असून, त्यासाठी ते पैसे जमा करत आहेत. त्यामुळे तालिया सध्या बिस्किटांशिवाय अन्य कोणताही पदार्थ खाऊ शकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.