मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष; वेळीच उपचार न केल्यास उद्भवू शकते गंभीर परिस्थिती

पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष; वेळीच उपचार न केल्यास उद्भवू शकते गंभीर परिस्थिती

पोटदुखी

पोटदुखी

पोटदुखीसोबत 24 तासांपेक्षा जास्त काळ उलट्या, जुलाब होत असतील, तर याकडे दुर्लक्ष करू नये. लघवी किंवा शौचातून, तसंच उलटीतून रक्त पडणं, भूक मंदावणं, पोटात सूज येणं, अचनक वजन कमी होणं, सतत ताप येणं, अंगदुखी ही गंभीर आजाराची लक्षणं असू शकतात.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 22 नोव्हेंबर :   पोटदुखी हे अनेक आजारांचं एक लक्षण आहे. अन्नातून विषबाधा, पोटाचं इन्फेक्शन अशा स्वरूपाच्या समस्यांमुळे झालेली पोटदुखी औषध घेतल्यावर काही दिवसांत बरी होते; मात्र काही वेळा पोटदुखी एखाद्या गंभीर आजाराचं मूळ असू शकते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. पोटदुखी 24 तासांपेक्षा अधिक काळ असेल, तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेणं इष्ट असतं. अशा पोटदुखीमागे काय कारणं असू शकतात, याबाबत जाणून घेऊ या.

वास्तविक पोटदुखी ही सर्व वयोगटाच्या व्यक्तींमध्ये नेहमी आढळणारी समस्या आहे; मात्र त्यामागची कारणं वेगवेगळी असू शकतात. पोटदुखीसोबत उलट्या, मळमळ, ताप, अशक्तपणा अशा तक्रारी जाणवत असतील, तर त्यामागे एखादं गंभीर कारण असू शकतं. “पोटदुखीची काही कारणं गंभीर असतात. त्यामुळे त्यावर वेळीच उपचार करण्याची गरज असते,” असं कॅलिफोर्नियातल्या प्रोव्हिडेन्स सेंट जोसेफ रुग्णालयातले गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट डॉ. हरदीपसिंग यांचं म्हणणं आहे.

हेही वाचा - डायबेटिस टाइप -1 आता तीन वर्षांसाठी रोखता येणार; औषधाला मंजुरी

पोटदुखीसोबत 24 तासांपेक्षा जास्त काळ उलट्या, जुलाब होत असतील, तर याकडे दुर्लक्ष करू नये. लघवी किंवा शौचातून, तसंच उलटीतून रक्त पडणं, भूक मंदावणं, पोटात सूज येणं, अचनक वजन कमी होणं, सतत ताप येणं, अंगदुखी ही गंभीर आजाराची लक्षणं असू शकतात. पोटदुखी काही दिवसांत बरी झाली नाही किंवा कामात लक्ष लागत नसेल इतकी जास्त पोटदुखी असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, असं कॅलिफोर्नियातल्या पोमोना व्हॅली रुग्णालयातील गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिसीज विभागाच्या डॉक्टर व संचालक निश्चिता मेरला यांचं म्हणणं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पोटदुखी नेहमीच पोटाशी संबंधित असते असं नाही. काही वेळेला पोटाच्या आजूबाजूच्या अवयवांचं दुखणंही पोटावर प्रभाव टाकतं. त्यामुळे पोटदुखी उद्भवते. पोटदुखी काही गंभीर आजारांचं लक्षण असू शकते.

कोलेसिस्टिटिस

या आजारात पित्ताशयाच्या पिशवीला सूज येते. त्यामुळे पोटाच्या वरच्या उजव्या भागात अचानक असह्य दुखू लागतं. हे दुखणं उजवा खांदा किंवा पाठीकडेही जातं. याव्यतिरिक्त ताप, थंडी वाजणं, उलटी, जलद श्वासोच्छ्वास, जेवण झाल्यावर दुखणं अशीही काही लक्षणं जाणवतात.

पॅन्क्रियाटायटिस

यात पॅन्क्रिया या अवयवाला सूज येते. यात पोटाच्या मधल्या वरच्या भागात दुखणं सुरू होतं. ते पाठ किंवा छातीपर्यंत पसरू शकतं. उलट्या, ताप, पोटाला सूज, हृदयक्रिया जलद होणं हीदेखील लक्षणं यात असतात.

अ‍पेंडिसायटिस

पोटातील अ‍ॅपेंडिक्सला सूज आल्यास हा आजार होतो. वेळेत उपचार न मिळाल्यास ते गंभीरही होऊ शकतं. यात पोटात खूप दुखतं. बेंबीजवळ हे दुखणं सुरू होतं. पोटाच्या खालच्या उजव्या भागापर्यंत ते जातं. या आजारात खोकला किंवा चालतानाही पोट दुखू शकतं. ताप, भूक मंदावणं, उलट्याही यात होऊ शकतात. आजार गंभीर झाल्यास पोटातलं अ‍ॅपेंडिक्स शस्त्रक्रिया करून काढून टाकावं लागतं. उपचार केले नाही, तर 48 किंवा 72 तासांच्या आत ते पोटात फुटू शकतं व रुग्णाची परिस्थिती गंभीर बनू शकते.

डायव्हर्टिक्युलेटिस

आतड्यांच्या भिंतींवर असलेल्या डायव्हर्टिक्युला या अवयवाला सूज येते, तेव्हा हा आजार होतो. सूज आल्यामुळे आतड्याचं कार्य बाधित होतं. मग पोटदुखी उद्भवते. ताप, थंडी वाजणं, उलटी, शौचातून रक्त पडणं ही याची इतर लक्षणं आहेत. आजाराच्या गांभीर्यावर त्यावरचे उपचार अवलंबून असतात. अँटिबायोटिक औषधं किंवा गंभीर झाल्यास रुग्णालयात दाखल करणं असे उपचार केले जातात. काही वेळा शस्त्रक्रियाही केली जाते.

हेही वाचा - Winter Health Tips : हिवाळ्यात कोंडलेल्या नाकासाठी करा हे सोपे उपाय, त्वरित मिळेल आराम

इरिटेबल बॉवेल सिंड्रोम

हा खूप गंभीर आजार नसला, तरी यात पोटदुखी रुग्णाला हैराण करते. हा गॅस्ट्रोइंटेस्टिनल आजार असून, त्याचा परिणाम मोठ्या आतड्यावर होतो. यात पोटाच्या खालच्या भागात दुखतं. सूज, गॅसेस, डायरिया, बद्धकोष्ठता ही याची आणखी काही लक्षणं आहेत. अँटिबायोटिक्स किंवा इतर औषधांद्वारे याचे उपचार केले जातात.

बॉवेल ऑब्स्ट्रक्शन

एखाद्या पेशीमुळे अन्नघटक आतड्यात जाऊ शकत नाहीत, तेव्हा ही समस्या निर्माण होते. यामुळे पचन बिघडून पोटदुखी सुरू होते. ज्यांच्या पोटाच्या शस्त्रक्रिया झाल्यात, त्यांना ही समस्या जास्त भेडसावते. यात पोटाच्या खालच्या भागात दुखतं. उलटी, पोटात सूज, गॅसेस अशीही लक्षणं यात जाणवतात. यात रुग्णाला IV Fluids देऊन उपचार केले जातात.

पेप्टिक अल्सर

लहान आतड्यात अल्सर म्हणजेच छोट्या जखमा झाल्यामुळे हा आजार होतो. जेवल्यानंतर ही पोटदुखी वाढते. त्याशिवाय उलटी, सूज, गॅसेस, पोटात जळजळ, वजन कमी होणं ही अन्य काही लक्षणं आहेत. पोटातलं पित्त कमी करणारी औषधं देऊन हा आजार बरा केला जातो.

पोटदुखी हा सामान्य वाटणारा आजार असला, तर सततच्या पोटदुखीकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. अनेक गंभीर आजारांचं हे लक्षण असू शकतं. त्यामुळे वेळीच त्यावर उपचार करावेत.

First published:

Tags: Lifestyle, Stomach pain