मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /तुमचं मूल वारंवार नाकात बोट घालतं का? सवय सोडण्याचे 5 सोपे उपाय

तुमचं मूल वारंवार नाकात बोट घालतं का? सवय सोडण्याचे 5 सोपे उपाय

सारखं नाकात बोट घालण्याची सवय असणाऱ्यांना तब्येतीची काही तक्रार असू शकते हे माहिती आहे का?

सारखं नाकात बोट घालण्याची सवय असणाऱ्यांना तब्येतीची काही तक्रार असू शकते हे माहिती आहे का?

सारखं नाकात बोट घालण्याची सवय असणाऱ्यांना तब्येतीची काही तक्रार असू शकते हे माहिती आहे का?

  नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : आपल्यापैकी अनेकांना विविध सवयी असतात. काहींना नाकात बोट घालण्याची सवय असते. कुणी नाकात बोट घातलं की त्याबद्दल अनेकदा थट्टाही उडवली जाते; पण सारखं नाकात बोट घालण्याची सवय असणाऱ्यांना तब्येतीची काही तक्रार असू शकते हे माहिती आहे का? कफाची तक्रार असणाऱ्यांना सहसा नाकात बोट घालण्याची सवय असू शकते. लहान मुलांची नाकात बोट (Nose Picking) घालण्याची सवय आणि त्यावरचे उपाय याबाबतची माहिती Onlymyhealth.com या वेबसाइटनी प्रसिद्ध केली आहे.

  लहान मुलांची ही सवय अगदी लहान असतानाच सोडवली जाऊ शकते. मोठ्यांनाही अनेकदा नाकात बोट घालण्याची सवय असू शकते. या टिप्समुळे ही सवय सुटू शकते-

  सवयीकडे लक्ष द्या : तुमचं मूल जर सारखं नाकात बोट घालत असेल, तर त्याच्या या सवयीकडे गांभीर्यानं लक्ष द्या. ते नाकात बोट घालायला लागलं, की त्याला अडवण्याचा प्रयत्न करा. याबद्दल सारखं बोलत राहिल्यानं त्याची ही सवय सुटू शकते; मात्र मुलांशी प्रेमानं बोलून, समजावण्याचा प्रयत्न करा, हे पक्कं लक्षात असू द्या. त्यांना मारून किंवा चिडून या सवयीबद्दल सांगण्याचा प्रयत्न केलात तर कदाचित उलटाही परिणाम होऊ शकतो.

  मुलांची बोटं पकडा : तुमचं मूल वारंवार नाकात बोट घालत असेल, तर त्याचं बोट तुम्ही पकडू शकता. म्हणजेच ते जेव्हा नाकात बोट घालायला लागेल, तेव्हा त्याचा हात धरा. दर वेळेस असं केल्यानं मुलाची ही वाईट सवय सुटू शकते. अर्थातच जेव्हा अन्य व्यक्ती समोर असतील तेव्हा त्यांचा हात पकडू नका. त्यांना खुणेनं समजावण्याचा प्रयत्न करा.

  हे ही वाचा-तुमच्याही घरात चंचल मुलं आहेत? त्यांनाही धनुर्वाताचे इंजेक्शन देणं आहे गरजेचं

  मुलांना पुरेसं पाणी प्यायला द्या : नाकात कोरडपणा जाणवतो तेव्हा मुलं नाकात बोट घालतात. शरीरात पाणी कमी असेल तर मुलांना हा कोरडेपणा जाणवतो. त्यामुळे मुलांना जास्तीत जास्त पाणी प्यायला लावा. त्यांना पातळ पदार्थही जास्त द्या. त्यामुळे त्यांच्या शरीरातही ओलससरपणा राहील आणि नाकात कोरडेपणा जाणवणार नाही.

  नाक स्वच्छ करायला शिकवा : काही वेळेस मुलं नाक स्वच्छ करण्यासाठी म्हणून नाकात बोटं घालतात. मूल नाक स्वच्छ करण्यासाठी नाकात बोट घालत असेल, तर त्या वेळेस त्याला रुमालानं नाक स्वच्छ करायला सांगा. अगदी लहान मुलांचं नाक तुम्ही रुमालानं स्वच्छ करून द्या. त्यामुळे तीच सवय त्यांनाही लागेल. मग नाक स्वच्छ करण्यासाठी म्हणून ती नाकात बोट घालणार नाहीत.

  मुलांची नक्कल करा : ऐकायला हे विचित्र वाटेल; पण हा उपायही करून बघा. काही वेळेस मुलं नाकात बोट घालतात आणि अजिबात ऐकत नाहीत. अशा वेळेस त्यांच्यावर चिडण्याऐवजी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करा. त्यांनी नाकात बोट घातल्यावर तुम्हीही त्यांच्यासमोर बसून त्यांची नक्कल करा. मुलाला हे दिसल्यावर कदाचित त्यांना किळस येईल. कदाचित त्यांना याची गंमतही वाटेल आणि लक्षात येईल. असं नाकात बोट घालणं ही चांगली सवय नाही हे तुम्ही अशी नक्कल केल्यावर त्यांना नक्कीच अगदी नीट समजेल.

  हे ही वाचा-तुम्हीही खाद्यपदार्थ तळलेले तेल पुन्हा वापरता? आरोग्यावर होतात हे घातक परिणाम

  अनेकदा वृद्धांना किंवा प्रौढांनाही नाकात बोट घालण्याची सवय असते. त्याबद्दल आपण त्यांना थेट बोलू शकतो; पण लहान मुलांची ही सवय वेळीच सोडवणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांना नीट समजावून सांगा. काहीही झालं तरी त्यांना ओरडू नका, मारू नका. तुमचं मूल सतत नाकात बोट घालत असेल, तर मग मात्र त्याला लहान मुलांच्या डॉक्टरांकडे घेऊन जा. नाकात सतत बोट घालण्यामागचं नेमकं कारण काय हे डॉक्टर अधिक चांगलं सांगू शकतील.

  नाकात बोट घालणं, हे अत्यंत स्वाभाविक प्रक्रिया आहे; पण ती सवय बनली तर मात्र वाईट दिसतं. लहान मुलांची ही सवय वेळीच सोडवली नाही, तर पुढे जाऊन ती समस्या अधिक वाढू शकते. त्यामुळे थोडंसं सतर्क राहा आणि मुलांची ही सवय वेळीच प्रेमाने सोडवा.

  First published:
  top videos

   Tags: One child