मुंबई, 23 डिसेंबर: भारतात विवाहसंस्थेला फार महत्त्व आहे. आपल्याकडे विवाह ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. विवाह केवळ दोन जीवांची रेशीमगाठ नसून, त्यामुळे अनेक नातेसंबंध तयार होतात. तसंच आपल्याकडे विवाहामुळे प्रस्थापित होणारा संबंध हा केवळ एका जन्मापुरता मर्यादित राहत नाही तर तो पुढे सात जन्म टिकतो असं मानलं जातं. हे नातं सात जन्म टिकावं म्हणून आपल्याकडे वटपौर्णिमेसारखे सणदेखील महिला मोठ्या भक्तीभावाने साजरा करतात. त्या तुलनेत इतर देशांमध्ये विवाह संबंध हे फार कमकुवत असतात. घटस्फोटाचं प्रमाण इतर देशांत खूप जास्त आहे. त्याच्या तुलनेत आपल्याकडे घटस्फोट कमी होतात. पण दिवसेंदिवस हे प्रमाण वाढताना दिसत आहे.
भारतात घटस्फोटाचं प्रमाण जवळपास 1.1% असल्याचा अंदाज आहे. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आजकाल लग्न झाल्यानंतर काहीच दिवसांत पती-पत्नींमध्ये वाद होतात. हा घरातील वाद कोर्टापर्यंत जाणं ही आजकाल सर्वसाधारण बाब झाली आहे. जगभरात जे घटस्फोट होतात त्यात घटस्फोटाबाबत पुढाकार घेण्यात महिला आघाडीवर असतात तर भारतात मात्र पुरुष घटस्फोटासाठी पुढाकार घेतात. हे घटस्फोट होण्यामागील नेमकी कारणं काय असतात हे आता आपण जाणून घेऊया.
हेही वाचा- कुटुंबाच्या विरोधात जात तरुणीनं लग्न केलं, प्रेमविवाहानंतर पहिल्या पत्नीसाठी पतीनेच केला भयानक शेवट
फसवणूक करणं
लग्नानंतर पती किंवा पत्नीकडून एकमेकांची फसवणूक होणं ही खूप वाईट गोष्ट आहे. पत्नी वा पतीकडून विवाहबाह्य संबंध ठेवले जातात, या कारणामुळे आजकाल घटस्फोटाचं प्रमाण वाढलं आहे. हे टाळण्यासाठी पती व पत्नी एकमेकांप्रती प्रामाणिक राहणं हे खूप महत्त्वाचं आहे.
मानसिक आजारपण
कुटुंबीयांमार्फत जुळवलेल्या लग्नामध्ये एक गोष्ट मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. पती किंवा पत्नी दोघांपैकी एक मानसिकदृष्ट्या कमकुवत असतो. त्यामुळे त्याचे वर्तन वेड्यासारखं असतं. तरीही कुटुंबीय लग्न लागलं पाहिजे म्हणून लग्न लावून देतात. नंतर दुसऱ्या जोडीदाराला आपला जोडीदार मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचं लक्षात येतं आणि त्यांचा घटस्फोट होतो.
धार्मिक मतभेद
प्रेम प्रकरणातून प्रेमविवाह होतात. यात जात-धर्म पाहिले जात नाहीत. लग्नानंतर मात्र जोडीदारावर धर्म परिवर्तनासाठी दबाव आणला जातो वा धर्मावरुन सारखी दोघांमध्ये भांडणं व्हायला लागतात. त्याची परिणती घटस्फोटांत होते.
हेही वाचा- जर घरात सुरु आहे लग्नाची तयारी, तर थांबा...नाही तर होऊ शकतं नुकसान, जाणून घ्या कारण
मानसिक वर्तन
लग्नानंतर मानसिक वर्तन कसं आहे हे फार महत्त्वाचं असतं. अनेक प्रकरणांमध्ये असं दिसून आलं आहे की, पती किंवा पत्नी आपल्या जोडीदाराबद्दल खूप संशयी असतात. दोघांपैकी एक दुसऱ्यावर नेहमी संशय घेतो. त्याच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप केला जातो. तो वा ती ऑफिसमध्ये असो किंवा इतर ठिकाणी, त्यांच्या पार्टनरला सर्व काही जाणून घ्यायचं असतं. त्यामुळे पुढे दोघांमध्ये दुरावा निर्माण होतो आणि हळूहळू प्रकरण घटस्फोटापर्यंत जातं.
दारूचं व्यसन
अनेक घटस्फोट होण्यामागे दारुचं व्यसन हे मुख्य कारण असतं. दारुच्या नशेत जोडीदाराला वाईट वागणूक दिली जाते. त्यास कंटाळून घटस्फोट होण्याची परिस्थिती निर्माण होते.
वरील कारणांमुळे आजकाल घटस्फोटाचं प्रमाण भारतात वाढताना दिसत आहे.
समाज सुदृढ रहावा म्हणून सुरू झालेली विवाहसंस्था मोडकळीस येताना दिसत आहे. समाजातील बदलाची ही चिन्ह म्हणावी लागतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.