नवी दिल्ली, 9 ऑगस्ट: सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. प्रचंड कोसळणारा पाऊस आणि त्याचा आनंद घेण्यासाठी मक्याचं भाजलेलं कणीस हे कॉम्बिनेशन असं आहे, की ज्याचं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. गेली दोन वर्षं कोरोनाच्या संसर्गामुळे घरातून बाहेर पडण्यावरच निर्बंध आलेत; त्यामुळे पर्यटनाची तर गोष्टच दूर. पावसाळी पर्यटन करताना मक्याचं (Indigenous Corn) भाजलेलं कणीस (म्हणजेच भुट्टा) खाण्याची मजा काही औरच; पण सध्याच्या प्राप्त परिस्थितीनुसार ते आपण घरी आणून खाल्लेलंच श्रेयस्कर. गेल्या काही वर्षांत स्वीट कॉर्न (Sweet Corn) अर्थात मधुमका म्हणजेच गोड मक्याची लागवडही आपल्याकडे केली जाते. त्यामुळे तोही बाजारात उपलब्ध असतो. मधुमका आणि आपला नेहमीचा मका, यांची कणसं दिसायला सारखी असली, तरी त्यांचे गुणधर्म मात्र वेगवेगळे आहेत. त्यांची ओळख करून देणारी सविस्तर पोस्ट सेलेब्रिटी न्यूट्रिशनिस्ट मुनमुन गनेरिवाल (Celebrity Nutrionist Munmun Ganeriwal) यांनी इन्स्टाग्रामवर लिहिली आहे. चार दिवसांपूर्वी शेअर केलेल्या या पोस्टला 3600 हून अधिक जणांचे लाइक्स मिळाले असून, अनेकांनी त्यावर कमेंट्सही केल्या आहेत. या पोस्टच्या आधारे इंडियन एक्स्प्रेसने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
आपलं वास्तव्य जिथे असतं, त्या परिसरात वर्षानुवर्षं जी पिकं घेतली जातात, चांगली होतात, तेच आपल्या आहारात असावं, असं आहारशास्त्राचा एक नियम सांगतो. तसंच, जे पीक ज्या हंगामात येतं, त्या हंगामातच आपल्या आहारात असलं, तर त्याचा त्रास होत नाही, असंही सांगितलं जातं. त्यानुसार, आपला देशी मका पावसाळी हंगामातच (Rainy Season) उपलब्ध असतो. त्यामुळे पावसाळ्यातच तो पुरेपूर खाऊन घ्यावा, असं मुनमुन यांनी लिहिलं आहे. मधुमका वर्षभर उपलब्ध असतो.
दररोज घ्या Apple Cider Vinegar; एका महिन्यात वजन होईल कमी
देशी मक्याच्या 3000 हून अधिक जाती भारतात आहेत. मक्याच्या शेतीला खतं आणि पाणी कमी लागतं. तसंच, जेव्हा अन्य पिकांमध्ये मक्याचं आंतरपीक घेतलं जातं, तेव्हा मुख्य पिकांवरच्या किडींना दूर पळवण्याचं काम हे मक्याचं आंतरपीक (Intercrop) करतं. त्यामुळे कीटकनाशकांचा खर्च कमी होतो. तसंच, पर्यावरणाच्या दृष्टीनेही ते उपयुक्त ठरतं. या मक्याच्या कणसांची काढणी कणसं पूर्ण पक्व झाल्यानंतर केली जाते. त्यामुळे त्यातल्या शर्करेचं स्टार्चमध्ये रूपांतर झालेलं असतं. त्यामुळे हे कणीस खाल्ल्यानंतर माणसाच्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढत नाही. शिवाय, या कणसात तंतुमय पदार्थांचं प्रमाण खूप जास्त असतं. हे तंतुमय पदार्थ रक्तशर्करा (Blood Sugar) नियंत्रणात ठेवण्याचं काम करतात. शिवाय, पचनाला, पोट साफ ठेवायलाही हे तंतुमय पदार्थ (Fibres) उपयुक्त ठरतात. अशा सगळ्याच दृष्टीने देशी मका खाणं आरोग्याला लाभदायक असल्याचं मुनमुन गनेरिवाल यांनी लिहिलं आहे.
घरगुती उपायाने मिळवा wrinkle free त्वचा, रात्री केल्यास अधिक परिणामकारक
दुसऱ्या बाजूला मधुमका हे संकरित पीक (Hybrid Crop) आहे. त्यामुळे त्याचं संकरित बियाणं आयात करावं लागतं. त्यात साखरेचं प्रमाण जास्त असल्यामुळे पौष्टिकतेचं प्रमाण कमी असतं. मधुमका खाल्ल्यानंतर शरीरातल्या साखरेचं प्रमाण वाढतं. तसंच, त्यात तंतुमय पदार्थ फारशा प्रमाणात नसतात. शिवाय, हे संकरित पीक असल्याने त्यावर कीटकांचा प्रादुर्भाव होण्याचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे कीटकनाशकांचा वापर अपरिहार्यपणे करावा लागतो. हे पर्यावरणासाठीही घातक असतं. संकरित पिकांच्या लागवडीतून आलेल्या उत्पन्नातलं बियाणं पुढच्या वेळी लागवडीसाठी वापरता येत नाही. त्या वेळी पुन्हा बियाणं विकत घ्यावं लागतं. त्यामुळे शेतकऱ्याचा खर्च आणि अवलंबित्व या दोन्ही गोष्टी वाढतात. या सगळ्या कारणांचा विचार करता देशी मकाच खाणं चांगलं असं मुनमुन गनेरिवाल यांनी सुचवलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Food, Health