लंडन, 28 ऑक्टोबर: कोरोनानं (Coronavirus pandemic) जगाला अशा स्थितीत आणून ठेवलंय की ज्याचा कधी कुणी विचारही केला नव्हता. वटवाघळांमुळे (Bats) ही साथ (Pandemic) पसरवल्याचं बोललं जात आहे. अशा परिस्थितीत आता कोणत्याही प्राण्याची जराशी विचित्र हालचाल दिसून आली किंवा काही वेगळं घडलं तरी नागरिक घाबरून जात आहेत. ब्रिटनमधल्या (Britain) काही समुद्र किनारपट्ट्यांच्या भागातल्या नागरिकांमध्ये असंच भीतीचं वातावरण सध्या पाहायला मिळत आहे. सध्या ब्रिटनमधल्या अनेक किनाऱ्यांवर मृतावस्थेतल्या हजारो खेकड्यांचा (Crabs) खच लोकांच्या दृष्टीस पडत आहे. हा मृत खेकड्यांचा खच पाहून नागरिक घाबरून गेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर खेकड्यांचा मृत्यू कसा झाला, यामागची कारणं काय आहेत, याविषयीची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. ब्रिटनमधल्या अनेक समुद्रकिनाऱ्यांवर हजारो मृत खेकड्यांचा खच सध्या लोकांच्या दृष्टीस पडत आहे. यामध्ये टीसेडच्या मारास्के आणि सॉल्टबर्नच्या बीचचाही समावेश आहे. अशीच घटना साहेम्स सीटसच्या कारेव्ह किनाऱ्यावरही घडली आहे.
या ठिकाणी मृत खेकड्यांचे कमरेपर्यंतच्या उंचीचे ढीग आढळून आले आहेत. यात काही खेकडे मृतावस्थेत होते, तर काही खेकडे जिवंत होते. या घटनेला एन्व्हायर्न्मेंट एजन्सीनेही (Environment Agency) दुजोरा दिला आहे. या घटनेमागच्य कारणांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. मरसके येथील शेरोन बेल यांनी सांगितलं, की `मी नेहमीप्रमाणे माझ्या घरातून समुद्रकिनारी फिरण्यासाठी निघाले. परंतु, दरम्यान मला किनाऱ्यावर मृत खेकड्यांचा खच दिसला. गेल्या दोन आठवड्यांपासून मृत खेकड्यांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.
25 ऑक्टोबरला मात्र ही संख्या हजारांच्या घरात होती. त्यानंतर मी माझ्या नवऱ्याला बोलावलं. आम्ही दोघांनी किनारपट्टी परिसरात पाहणी केली. त्यानंतर घटनेची छायाचित्रं घेतली. काही वेळ पाहणी केल्यानंतर ढिगाऱ्यातले जिवंत खेकडे पुन्हा पाण्यात सोडून दिले. ही घटना फारच विचित्र आहे. यापूर्वी मी असा प्रकार कधीच पाहिला नव्हता.` `मी गेल्या 21 वर्षांपासून मरसके बीचजवळ राहत आहे. आतापर्यंत किनाऱ्यावर समुद्राच्या लाटा आणि वादळं (Cyclone) आदळताना पाहिली. परंतु, अशी स्थिती मी कधीच पाहिली नव्हती. नॉर्थ सेहममध्ये दोन आठवड्यांपूर्वी अशीच घटना घडली होती. या घटनेवर स्थानिक लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. निसर्गाचा हा काही इशारा आहे, असं मत काही स्थानिकांनी व्यक्त केलं होतं. तसंच पाण्यात काही घटक मिसळले गेल्यानं खेकड्यांचा मृत्यू होत असावा, असं काही स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे,` असं शेरोन बेल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. पाण्याचे नमुने (Samples) तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मृत्यूचं कारण समजावं यासाठी काही खेकड्यांचे नमुनेदेखील तपासणीसाठी पाठवले आहेत. मृत खेकड्यांची संख्या बघता खेकड्यांमध्ये कोणती महामारी तर पसरली नाही ना, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे; मात्र तपासणी अहवाल आल्यानंतरच सर्व गोष्टी आणि कारण स्पष्ट होईल, असं एन्व्हायरर्न्मेंट एजन्सीनं माध्यमांशी बोलताना सांगितलं.