नवी दिल्ली, 20 जानेवारी : लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींमध्ये (Obesity) कोरोना प्रतिबंधक लशीचा (Vaccine) प्रभाव कमी असू शकेल, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. हेल्दी (Healthy) व्यक्तींच्या तुलनेत लठ्ठ व्यक्तींच्या (Obese) शरीरात एखादा विकार बरा होण्याची प्रक्रिया संथ गतीने होते, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. 'नेचर'मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार, कोविड-19ला प्रतिकार करण्याचा वेग कमी असण्याशी लठ्ठपणाचा संबंध आहे. त्यामुळे लशींचाही लठ्ठ व्यक्तींमध्ये पुरेसा प्रभाव दिसून येत नाही. त्यामुळे कोविड-19 प्रतिबंधक लशीचाही हवा तितका प्रभाव लठ्ठ व्यक्तींमध्ये दिसणार नाही, असं तज्ज्ञांना वाटतं.
'कोविड-19ची तीव्रता लठ्ठ आणि मधुमेही (Diabetic) व्यक्तींमध्ये अधिक असते. लठ्ठ व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती (Immunity) कमी असते आणि हेल्दी व्यक्तींच्या तुलनेत विकार बरा होण्याची प्रक्रिया या व्यक्तींमध्ये संथ असते,' असं धरमशिला नारायण सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे पल्मोनरी कन्सल्टंट नवनीत सूद यांनी सांगितलं.
'लठ्ठपणासारखी स्थिती लशींना शरीराची प्रतिकार यंत्रणा देत असलेल्या प्रतिसादावरही परिणाम करते. त्यामुळे कोविड-19च्या लशीबाबतही तीच गोष्ट लागू होते; मात्र लठ्ठपणा आणि कोविड-19च्या लशीचा प्रभाव या दोन्हींच्या सहसंबंधांबद्दल ठोस निष्कर्ष काढणारे संशोधन अद्याप झालेलं नाही,' असंही सूद यांनी सांगितलं.
लठ्ठपणामुळे शरीरात तीव्र दाह होऊ शकतो. मधुमेह आणि हृदयरोगही (Heart Disease) त्यामुळे होऊ शकतो. त्यामुळे लठ्ठ व्यक्तींमध्ये प्रतिकार यंत्रणेतील सायटोकाइन्ससारख्या (Cytokines) नियंत्रक प्रथिनांची संख्या आणि प्रकार जास्त असू शकतात.
सायटोकाइन्सकडून मिळालेला इम्युन रिस्पॉन्स अर्थात प्रतिकारासाठीचा प्रतिसाद कोविड-19च्या काही गंभीर केसेसमध्ये आरोग्यपूर्ण पेशींना हानी पोहोचवू शकतो, असं लेखात म्हटलं आहे. पर्स्पेक्टिव्ह्ज ऑन सायकॉलॉजिकल सायन्स या जर्नलमध्ये अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, ताण-तणाव, एकटेपणा, आरोग्यदायी सवयींचा अभाव यांमुळे शरीराची रोगप्रतिकारयंत्रणा कमी होऊ शकते. त्यामुळेच कोविड-19ला प्रतिबंध करणाऱ्या लशींचा प्रभावही कमी होऊ शकतो.
पर्यावरणीय घटक, तसंच प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे आनुवंशिक गुण, शारीरिक आणि मानसिक आरोग्य यांमुळे शरीराची रोगप्रतिकारयंत्रणा कमजोर होऊ शकते. त्यामुळे या यंत्रणेकडून लशीला दिला जाणारा प्रतिसाद संथ असू शकतो. 'शारीरिक कमजोरीबरोबरच कोविड-19 महामारीमध्ये मानसिक आरोग्य कमकुवत असण्याचाही मोठा परिणाम दिसून आलेला आहे. मानसिक ताणतणाव व्यक्तीच्या शारीरिक रोगप्रतिकारयंत्रणेवर दुष्परिणाम करू शकतात आणि त्यामुळे संसर्गाशी लढण्याची शक्ती कमी होते,' असं अमेरिकेतल्या ओहियो स्टेट विद्यापीठातल्या अॅनेलिज मॅडिसन यांनी संशोधनातून सांगितलं.
हे देखील वाचा - तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका! कंपनीने नागरिकांना केलं सूचित
नवी दिल्लीतील श्री बालाजी अॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटच्या मायक्रोबायोलॉजी विभागाच्या वरिष्ठ सल्लागार ज्योती मुट्टा यांनी सांगितलं, की 'आरोग्याच्या गंभीर तक्रारी असणाऱ्या व्यक्ती, प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या व्यक्ती आदींमध्ये लशीला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. स्टेरॉइड्सची औषधं घेणाऱ्या व्यक्ती, यकृताचे गंभीर आजार, अनियंत्रित मधुमेह, कर्करोग, मूत्रपिंडाचे गंभीर आजार असलेल्या व्यक्ती यामध्ये येतात. मद्यपान टाळलं पाहिजे. जीवनशैली आरोग्यदायी असेल, तर विचित्र परिस्थिती उद्भवण्याचा धोका नाही.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Covid19, Obesity