नवी दिल्ली, 05 मार्च : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी भारतात सध्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. भारत बायोटेक (Bharat Biotech) या कंपनीने आपल्या कोव्हॅक्सिन (Covaxin) या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांचे (Clinical Trials) प्राथमिक निष्कर्ष बुधवारी (3 मार्च) जाहीर केले. त्यात ही लस 81 टक्के प्रभावी असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक मार्च रोजी याच कोव्हॅक्सिन लशीचा पहिला डोस घेतला आहे. तर कोवॅक्सिनसह पुण्यातील कोविशिल्ड (Covishield) ही लसही लसीकरण मोहिमेत दिली जाते आहे. पण या लशींपैकी कोणती लस सर्वात जास्त उत्तम आहे?
कोविशिल्ड ही लस ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने अॅस्ट्राझेनेका या औषध कंपनीच्या सहयोगाने विकसित केली आहे. त्याच लशीपासून भारतात पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) या संस्थेने लस विकसित केली आहे. ती भारतातही कोविशिल्ड याच नावाने ओळखली जात आहे. तर कोव्हॅक्सिन ही लस पूर्णतः भारतीय असून, ती हैदराबाद भारत बायोटेक या कंपनीने इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (NIV) या संस्थांच्या सहकार्याने विकसित केली आहे.कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांचे निष्कर्ष केंद्र सरकारने तीन जानेवारी रोजीच कोव्हॅक्सिन या लशीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली होती. त्या वेळी तिसऱ्या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायल्सचे (Clinical Trials) निष्कर्ष हाती आलेले नव्हते. त्यामुळे क्लिनिकल ट्रायल स्वरूपात मंजुरी देण्यात आली होती. त्याचाच अर्थ असा, की ज्यांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आलं. आता तिसऱ्या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायलचे अंतरिम निष्कर्ष जाहीर झाले आहेत. त्या ट्रायल्समध्ये 25 हजार 800 स्वयंसेवक सहभागी झाले होते. स्वयंसेवकांची संख्या लक्षात घेतली, तर ही देशातली आतापर्यंतची सर्वांत मोठी ट्रायल मानली जात आहे.
हे वाचा - कोव्हॅक्सिन-कोव्हिशिल्ड लशींचे साइड इफेक्ट्स आणि कुणी घेऊ नये लस? वाचा सविस्तर
तिसऱ्या टप्प्यातल्या 43 स्वयंसेवकांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 36 जण प्लासिबो ग्रुपचे (Placebo Group) होते, तर सात जण खरी लस दिलेले होते. (प्लासिबो ग्रुप याचा अर्थ, अशा चाचण्यांच्या वेळी काही स्वयंसेवकांना खऱ्या लशीऐवजी दुसरा निरुपद्रवी डोस दिला जातो. कोणाला हा डोस देण्यात आला आहे, याची माहिती केवळ लसीकरण अधिकाऱ्यांनाच असते. या आधारे कोव्हॅक्सिन या लशीचा प्रभाव 80.6 टक्के असल्याचा निष्कर्ष निघाला. यातील 4500 स्वयंसेवक असे होते, की ज्यांना आधीपासूनच काही ना काही गंभीर विकार होते. त्यावरही कोव्हॅक्सिनने चांगली प्रतिकारशक्ती दर्शवली आहे. कोव्हॅक्सिनच्या या चाचण्यांमध्ये 2433 स्वयंसेवक 60 वर्षांहून अधिक वयाचे होते.
भारतात सध्या असलेल्या लसीकरणाच्या नेटवर्कमध्ये लशींची साठवणूक 2 ते 8 अंश सेल्सिअसपर्यंतच्या तापमानात करण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. त्या अनुषंगाने कोव्हॅक्सिनची साठवणूक करणं सोपं आहे. कोव्हॅक्सिन ही लस ओपन व्हॉयल पॉलिसीनुसार मिळते. म्हणजेच या लशीची बाटली उघडल्यानंतर तिचा वापर पुढच्या 25 ते 30 दिवसांत केला तरी चालतो. त्यामुळे वाया जाणाऱ्या लशीचं प्रमाण 10 ते 30 टक्क्यांपर्यंत कमी होईल. कोविशिल्ड लशीबाबत ही सुविधा उपलब्ध नाही. लशीची बाटली उघडल्यानंतर चार तासांच्या आत ती वापरणं गरजेचं आहे.
हे वाचा - COVID-19: विद्यापीठानंतर आता महापालिकेतील 80 कर्मचारी पॉझिटिव्ह, जिल्ह्यात खळबळ
कोव्हॅक्सिन ही लस विषाणूची संपूर्ण रचना लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. विषाणूमध्ये काही छोटे-मोठे बदल झाले तरी कोव्हॅक्सिनचा प्रभाव कमी होणार नाही. काही माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार, कोविशिल्ड ही लस कोरोनाच्या दक्षिण आफ्रिकेतल्या स्ट्रेनवर उपयुक्त ठरत नाही. जानेवारीत कोव्हॅक्सिनबद्दल आलेल्या एका अहवालात म्हटल्यानुसार, ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरही कोव्हॅक्सिन प्रभावी ठरत आहे. 'बायोआरएक्सिव्स' यांच्यातर्फे प्रकाशनपूर्व समीक्षणात या लशीबद्दल सांगण्यात आलं होतं. न्यूयॉर्कमध्ये कोल्ड स्प्रिंग हार्बर लॅबोरेटरीद्वारे ते संचालित केलं जातं. दरम्यान, कोव्हॅक्सिन या लशीवरून विरोधी पक्षांनी अनेक सवाल उपस्थित केले होते. 16 जानेवारीपासून देशात लसीकरण मोहीम सुरू झाली. त्या वेळपासून कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लशींचे डोस लोकांना दिले जात आहेत.