नवी दिल्ली, 07 मे : देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट (Coronavirus second wave) आहे. या लाटेत कोरोना अधिक संसर्गजन्य असल्याचं दिसतं आहे, त्यामुळे देशातील कोरोना प्रकरणंही वाढत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क (Mask) वापरण्यावर भर दिला जातो आहे. कुणी कापडी, कुणी सर्जिकल, कुणी N-95 मास्क वापरतं आहे. तर काही तज्ज्ञांनी डबल मास्कचाही सल्ला दिला आहे. पण मग नेमका कोणता मास्क सर्वात चांगला आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात उद्भवलेली परिस्थिती पाहता कोणता मास्क वापरावा, याबाबत न्यूज 18 शी बोलताना दिल्लीच्या 'एम्स'चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) यांनी मार्गदर्शन केलं आहे.
डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले, "खरं तर N-95 मास्कच प्रत्येकाने घालायला हवेत. पण ते प्रत्येकाला उपलब्ध होण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे अशा परिस्थितीत डबल मास्क हा चांगला पर्याय आहे. आतला मास्क थ्री प्लाय सर्जिकल मास्क आणि त्यावर कापडी मास्क असे दोन मास्क (Double Masking) नाका-तोंडावर बांधावेत. तेही शक्य नसलं, तर दोन कापडी मास्क बांधावेत. N-95 मास्कचं फिल्टरेशन (Filteration) 90 टक्के प्रभावी असतं. सर्जिकल मास्क (Surgical Mask) 85-90 टक्के प्रभावी असतात आणि कापडी मास्क त्यापेक्षा कमी प्रभावी असतात.
हे वाचा - कोरोनावर मात केल्यानंतर नवं संकट; बऱ्या झालेल्या रुग्णांना होतंय गंभीर इन्फेक्शन
"मास्क परिधान करणं आणि तो नीट परिधान करणं, ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या नाका-तोंडात येणारी हवा गाळून आली पाहिजे, कुठेही फट राहता कामा नये, याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. नाही तर संसर्गाचा धोका आहे. दीर्घ श्वास घेतल्यानंतर मास्क आत खेचला गेला, तर तुम्ही तो नीट घातला आहे असा त्याचा अर्थ. मास्कने तुमचं नाक-तोंड पूर्ण झाकलं गेलं पाहिजे, तो हनुवटीवर आला पाहिजे", असं डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं.
हे वाचा - ...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत
हात स्वच्छ धुतल्यानंतर मास्क हातात घ्या. मास्कला समोरून स्पर्श करू नका. मास्क कानाला बांधायच्या दोऱ्यांच्या साह्यानेच उचला. घरी आल्यानंतर मास्क काढा. कापडी मास्क असेल, तर एकदा वापरल्यावर स्वच्छ धुऊन वाळवून पुन्हा वापरा. मास्क काढताना डोळे, नाक, तोंडाला स्पर्श करू नका. मास्क काढल्यानंतरही हात स्वच्छ धुवा, असा सल्लाही डॉ. गुलेरिया यांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: AIIMS, Coronavirus, Mask