मुंबई, 06 मे : कोविड-19 चा (Covid-19) परिणाम फुफ्फुसांच्या कार्यावर होत असल्यानं गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णांच्या उपचारांसाठी ऑक्सिजन अतिशय महत्त्वाचा असतो. धाप लागणं किंवा श्वास घ्यायला त्रास होणं ही लक्षणं गंभीर कोविड-19 रुग्णांमध्ये दिसतात. यामुळे शरीरातील विविध भागांना होणाऱ्या ऑक्सिजनच्या (Oxygen) पुरवठ्यावर विपरीत परिणाम होतो. म्हणूनच या रुग्णांना मेडिकल ऑक्सिजनच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या उपचारांची गरज लागते. सध्या अशा ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. पण ऑक्सिजन वापरतानाही काळजी घेणं गरजेचं आहे. याबाबत केंद्र सरकारने गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.
ऑक्सिजन पुरवण्याच्या विविध प्रकारांपैकी एक म्हणजे लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (Liquid Medical Oxygen) अर्थात द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनचा वापर. एलएमओ म्हणजे दुसरे तिसरे काही नसून वैद्यकीय उपचारांसाठी लागणारा जास्त शुद्धीकरण केलेला ऑक्सिजन असतो. मानवी शरीरामध्ये वापरण्यासाठी त्याची निर्मिती करण्यात येते.
ऑक्सिजन द्रवरूपात का?
ऑक्सिजनचं वितळण्याचं आणि उकळण्याचं तापमान (Melting & Boiling Points) कमी असल्याने सामान्य तापमानाला ऑक्सिजन वायूरूपात असतो. द्रव स्वरूपात त्याचं रूपांतर केल्यामुळे त्याची जास्त प्रमाणात साठवणूक करणं आणि वाहतूक करणं सोपं होतं.
द्रवरूपातील ऑक्सिजन कसं तयार होतं?
या वायूच्या निर्मितीचे अनेक प्रकार आहेत. वायूंच्या मिश्रणातून ऑक्सिजन वेगळा करण्याची पद्धत सर्वसामान्यपणे वापरली जाते. त्यासाठी एअर सेपरेशनयुनिट्स (Air Separation Units) वापरली जातात. एएसयू म्हणजे वायूंना परस्परांपासून वेगळं करणारी संयंत्रं असतात. वातावरणात असलेल्या हवेमधून ऑक्सिजन वेगळा करण्यासाठी फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथड (Fractional Distillation Method) म्हणजेच अंशतः उर्ध्वपातन पद्धतीचा वापर केला जातो. वातावरणातल्या हवेमध्ये प्रामुख्याने नायट्रोजन आणि ऑक्सिजन वायू असतात. नायट्रोजनचं प्रमाण 78 टक्के, तर ऑक्सिजनचं प्रमाण 21 टक्के असतं. उर्वरित 1 टक्का भागात अरगॉन, कार्बन डायऑक्साईड, निऑन, हेलिअम आणि हायड्रोजन हे वायू असतात.
हे वाचा - सावधान! कोरोना रुग्णांना Steroids देणं घातक; भोगावे लागतील गंभीर परिणाम
या पद्धतीत हवेतल्या विविध वायूंना खूप थंड करून त्यांचं द्रवरूपात रूपांतर केलं जातं. त्यातले घटक वेगवेगळे केले जातात आणि त्यातून द्रवरूप ऑक्सिजन वेगळा केला जातो. त्यासाठी वातावरणातील हवा -181 अंश सेल्सियस तापमानापर्यंत थंड केली जाते. या तापमानाला ऑक्सिजनचं द्रवात रूपांतर होतं. नायट्रोजनचा उत्कलन बिंदू -196 अंश सेल्सियस असल्याने तो वायू रूपातच राहातो. मात्र अरगॉनचा उत्कलन बिंदू ऑक्सिजनप्रमाणेच (–186°C) आहे आणि त्यामुळे अरगॉन बऱ्याच जास्त प्रमाणात ऑक्सिजनसोबत द्रवात रूपांतरित होतो.
या प्रक्रियेतून मिळणारं ऑक्सिजन आणि अरगॉनचं मिश्रण बाहेर सोडलं जातं. त्यावरचा दाब कमी केला जातो आणि दुसऱ्या एका कमी दाब असलेल्या डिस्टिलेशन पात्रामधून त्याला अधिक शुद्ध करण्यासाठी पाठवलं जातं. या प्रक्रियेनंतर आपल्याला अतिशय शुद्ध ऑक्सिजन मिळतो. हा शुद्ध ऑक्सिजन क्रायोजेनिक कंटेनरमध्ये भरून वाहतुकीसाठी पाठवला जातो.
क्रायोजेनिक कंटेनर म्हणजे काय?
क्रायोजेनिक्स (Cryogenics) म्हणजे अतिशय कमी तापमानाला वस्तूंचं उत्पादन आणि वर्तन. ज्या द्रवाचा सामान्य उत्कलनांक (Boiling Point) (उकळण्याचं तापमान) –90 अंश सेल्सिअसच्या खाली आहे त्या द्रवाला क्रायोजेनिक द्रव म्हणतात.
क्रायोजेनिक तापमानाला –90°C च्या खाली द्रवरूप वायूंची वाहतूक आणि साठवणूक सुरक्षित आणि व्यवहार्य पद्धतीने करण्याच्या दृष्टिकोनातून विशेष प्रकारे क्रायोजेनिक कंटेनर तयार केले जातात. हे कंटेनर अतिशय उच्च दर्जाच्या तापमानरोधक आवरणाचा वापर करून तापमान कायम राखण्यासाठी इन्सुलेट (Insulation) केलेले असतात. ज्यामध्ये द्रवरूपातल्या वायूंची अतिशय कमी तापमानाला साठवणूक करता येते.
प्रेशर स्विंग अॅडसॉर्प्शन तंत्रज्ञान म्हणजे काय?
ऑक्सिजनची निर्मिती बिगर क्रायोजेनिक तंत्रज्ञानानेही वायूरूपात करता येते. त्यासाठी सिलेक्टिव्ह अॅडसॉर्प्शन तंत्रज्ञानाचा (Selective Adsorption Technology) वापर करता येतो. उच्च दाबाखाली वायू घन पृष्ठभागांकडे आकर्षित होतात या गुणधर्माचा वापर या तंत्रज्ञानात केलेला असतो. जितका दाब जास्त तितकं वायूंचं अॅडसॉर्प्शन जास्त असतं.
झिओलाइटचा एक अॅडसॉर्प्शन बेड (Adsorption Bed) अर्थात वायूंना आकर्षित करणारा पृष्ठभाग असलेल्या पात्रामधून हवेसारखं वायूंचं मिश्रण सोडलं जातं. हा पृष्ठभाग ऑक्सिजनपेक्षा नायट्रोजनला खूपच जास्त प्रमाणात आकर्षित करतो. त्यामुळे नायट्रोजन या पृष्ठभागावर जमा होतो आणि या पात्रामधून जो वायू बाहेर पडतो त्यामध्ये पात्रात सोडण्यापूर्वी असलेल्या वायूच्या मिश्रणाच्या तुलनेत खूपच जास्त माणात ऑक्सिजन असतो.
हे वाचा - या देशात 12 वर्षांच्या मुलांना मिळणार Corona लस, Pfizer ला मिळाली मान्यता
अशा प्रकारे ऑक्सिजनची निर्मिती जागेवरच करणारे प्रकल्प उभारता येणं रुग्णालयांना सहज शक्य आहे. या प्रकल्पांमध्ये वातावरणातील हवेमधून संहतीकरण (Concentration) करून ऑक्सिजन मिळवला जातो. रुग्णालयांच्या जवळच ऑक्सिजन निर्मिती झाल्यामुळे त्याची वाहतूक करण्याची गरज राहत नाही आणि त्यावरील अवलंबित्व कमी होतं.
वैद्यकीय ऑक्सिजनच्या या स्रोतांव्यतिरिक्त ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, कुठेही सहज नेता येणाऱ्या पोर्टेबल ऑक्सिजन निर्मिती यंत्रांचादेखील घरगुती वापर करता येतो.
सुरक्षेची खबरदारी
तापमान जास्त असेल तर कोणतीही वस्तू ऑक्सिजनमध्ये जळून जाऊ शकते. म्हणूनच कोविड-19 च्या काळात जास्त प्रमाणात ऑक्सिजनची साठवणूक होत असलेल्या रुग्णालयांमध्ये आग लागण्याचे धोके वाढण्याची शक्यता असते. ती लक्षात घेऊन योग्य प्रकारच्या अग्निसुरक्षा उपाययोजना करण्याची आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना ऑक्सिजनची सुरक्षित हाताळणी करण्याचे प्रशिक्षण देण्याची गरज असते. वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी करणाऱ्या व्यक्तीकडे प्रिस्क्रिप्शन असणं आवश्यक आहे.
विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध वापर हवा
अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या ऑक्सिजनचा वापर नागरिकांनी योग्य पद्धतीने, विशेषतः सार्वजनिक आरोग्याच्या आणीबाणीच्या काळात, अतिशय विचारपूर्वक करणं गरजेचं आहे. या वायूचा विनाकारण वापर करण्यामुळे किंवा त्याचा प्रमाणाबाहेर साठा केल्यामुळे लोकांमध्ये घबराट निर्माण होऊ शकते आणि काळ्या बाजाराला प्रोत्साहन मिळू शकतं.
हे वाचा - कोरोनाचा प्रकोप वाढतोय; कधीपर्यंत मिळणार दिलासा? तज्ज्ञांनी दिलं उत्तर
'एम्स'चे संचालक प्रा. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं, 'ऑक्सिजनचा योग्य वापर ही काळाची गरज आहे. सध्याच्या काळात ऑक्सिजनचा गैरवापर ही अतिशय चिंतेची बाब आहे. आपल्याला भविष्यात ऑक्सिजनची गरज लागेल या भीतीने काही लोक आपल्या घरी ऑक्सिजन सिलेंडरची (Oxygen Cylinder) साठवणूक करत आहेत. असं करणं पूर्णपणे चुकीचं आहे. तुमची ऑक्सिजन सॅच्युरेशन पातळी 94 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. त्यामुळे ऑक्सिजनची पातळी योग्य असूनही एखादी व्यक्ती ऑक्सिजन वायूचा गैरवापर करत असेल तर ती व्यक्ती ऑक्सिजनची पातळी 90 टक्के किंवा 80 टक्क्यांच्या खाली असलेल्या एखाद्या अतिशय गरजू रुग्णाला ऑक्सिजनपासून वंचित ठेवत आहे, असा त्याचा अर्थ आहे.'
ऑक्सिजनची 92 किंवा 93 ही पातळी अतिसंवेदनशील मानता कामा नये. ही पातळी त्या रुग्णानं वेळेवर रुग्णालयात दाखल व्हावं, हे सांगणारी निदर्शक पातळी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Oxygen supply