नवी दिल्ली, 07 जानेवारी : कोरोना विषाणू (Covid 19) जगभरात थैमान घालत आहे. कोरोनाची नवनवीन रूपं समोर येत आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन स्ट्रेन आढळून आला आहे आणि आता कोरोना विषाणूविषयी अधिक नवीन माहिती समोर येत आहे. कोरोना विषाणू हवेत दोन तास राहत असल्याचं आढळून आले आहे. रुग्णालयाच्या हवेतील सॅम्पल्समधे कोरोना विषाणू आढळून आल्याने भीती व्यक्त केली जात आहे.
सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलेक्युलर बायोलॉजी (CCMB) आणि सीएसआयआर-मायक्रोबियल तंत्रज्ञान संस्था (IMTech) यांनी केलेल्या संशोधनात ही माहिती समोर आली आहे. द प्रिंटमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार कोरोना वॉर्डमध्ये हवेत हे विषाणू आढळून आले आहेत असं संशोधनातून स्पष्ट झालं आहे. कोरोना वॉर्डमधील हवेतील सॅम्पल्समध्ये हे विषाणू दोन तास राहत असल्याचं दिसून आलं.
हैदराबाद आणि चंदीगड येथील तीन रुग्णालयात वैज्ञानिकांनी यावर संशोधन केलं आहे. याविषयी सीसीएमबीने अधिक माहिती देताना सांगितलं की, संशोधकांनी एअर सॅम्पल वापरून याठिकाणी विषाणूचे कण गोळा केले आणि नंतर आरटी-पीसीआरने त्याची तपासणी केली.
हे वाचा - कोरोना उद्रेकाच्या संकटाचा 2 आठवडे आधीच मिळणार इशारा; शास्त्रज्ञांनी मार्ग शोधला
यामध्ये त्यांना कोरोना विषाणूचे कण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णाने एका रूममध्ये खूप वेळ घालवल्यानंतर त्या रूममध्ये कोरोना विषाणू राहत असल्याचं समोर आलं आहे. लक्षणं न दिसणाऱ्या रुग्णांमधील विषाणू हवेमध्ये पसरत नाहीत पण हे विषाणू हवेत 2 तासांपर्यंत राहू शकतात. हवेची झुळूक किंवा फॅन लावल्यास हा विषाणू हवेत पसरण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती वॉर्डमधील कोव्हिड रूग्णांची संख्या, त्यांची स्थिती आणि त्यांच्या उच्छवासातील कोरोना( SARS-CoV-2) विषाणूंची संख्या यावर अवलंबून आहे, असं सीसीएमबीनं सांगितलं.
हे वाचा - फक्त इंजेक्शन नाही तर नाकावाटेही दिली जाणार स्वदेशी कोरोना लस; नागपुरात संशोधन
दरम्यान सीसीएमबीचे (CCMB) संचालक राकेश मिश्रा यांनी या विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोव्हिड प्रतिबंधक मार्गदर्शक सूचनांचं महत्त्व सांगितलं आहे. त्यांनी याविषयी बोलताना म्हटलं, या सर्व निष्कर्षांवरून दिसून येतं की कोरोनाव्हायरस काही काळ हवेमध्ये राहू शकतो. यासाठी नियमित हात धुणं, योग्य पद्धतीनं मास्क वापरणं, लक्षणं दिसणाऱ्या रुग्णांना गर्दीपासून लांब ठेवणं हे नियम पाळल्यास परिस्थिती सुधारू शकते.