नागपूर, 06 जानेवारी : भारतात इंजेक्शनमार्फत दिल्या जाणाऱ्या कोरोना लशीच्या (corona vaccine) आपात्कालीन वापराला (emergency use) मंजुरी मिळाल्यानंतर आता नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लशीची तयारी सुरू झाली आहे. नाकातून दिली जाणारी स्वदेशी कोरोना लसही लवकरच उपलब्ध होणार आहे. या लशीवर सध्या संशोधन सुरू आहे.. महाराष्ट्रातही हे संशोधन होतं आहे.
भारताला पहिली स्वदेशी कोरोना लस देणाऱ्या हैदराबादच्या भारत बायोटेकनं आता नझल व्हॅक्सिनी म्हणजेच नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोरोना लशीचीही तयारी सुरू केली आहे. देशात चार ठिकाणी संशोधन सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नागपूरचाही समावेश आहे.
नागपुरातील डॉ. आशिष ताजने यांनी सांगितलं की, भारत बायोटेकच्या माध्यमातून नाकातून देण्यात येणाऱ्या लशीवर संशोधन केलं जातं आहे. देशात चार ठिकाणी हे संशोधन होतं आहे. यामध्ये नागपूरच्या गिल्लूरकर हॉस्पिटलचा समावेश आहे. संशोधनाचा प्राथमिक डेटा तयार केला जाणार आहे आणि हा अहवाल मान्यतेसाठी सरकारकडे पाठवला जाणार आहे.
हे वाचा - स्वदेशी कोरोना लशीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह; मंजुरी देणाऱ्या समितीचा यू-टर्न
दरम्यान याआधी पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटनंही (serum institute of india) अमेरिकेच्या कोडाजेन्सिक्स (Codagenix Inc.) या कंपनीसोबत नाकावाटे दिल्या जाणारी कोरोना लशीबाबत करार केला होता. या कंपनीनं तयार केलेली CDX-005 ही लस. या लशीत पुण्याच्या सीरम संस्थेची भागीदारी आहे. कोडाजेन्सिक्स कंपनीने याआधी दिलेल्या माहितीनुसार, सीरम इन्स्टिट्यूट या कोरोना लशीचं भारतात उत्पादन घेणार आहे.
हे वाचा - कोरोना लस घेण्याआधी किंवा नंतर दारू प्यायलेली चालते का? तज्ज्ञांनी दिलं हे उत्तर
भारतात सध्या भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूटच्या कोरोना लशीला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. 13 किंवा 14 जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरण मोहीम सुरू केली जाणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस देण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. सरकारनं यासाठी प्राधान्यक्रम ठरवला आहे. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर, 50 वर्षांवरील व्यक्ती आणि आजारी असलेल्या व्यक्तींना लस दिली जाईल. यासाठी नोंदणी करणं बंधनकारक आहे. सरकारी यादीत नसलेल्या ज्यांना कोरोना लस घ्यायची आहे, त्यांना नोंदणीसाठी Cowin app उपलब्ध करून देण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine