मुंबई, 14 एप्रिल : देशात जसजशी कोरोना
(Coronavirus) प्रकरणं वाढत आहेत. तसतसा लसीकरणाचा
(Corona vaccination) वेगही वाढवण्यात आला आहे. पण सध्या देशात फक्त दोनच लशी उपलब्ध आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह काही राज्यात लशीचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे केंद्र सरकारने आता विदेशी कोरोना लशींना आपात्कालीन मंजुरी द्यायला सुरुवात केली. त्यापैकीच एक म्हणजे रशियाची स्पुनिक V (
SputnikV) कोरोना लस. याच महिन्यात ही लस भारतात आणली जाणार आहे.
हैदराबादमधील डॉ. रेड्डीने
(Dr Reddy’s) रशियाशी स्पुनिक V लशीबाबत करार केला आहे. डॉ. रेड्डी कंपनी एप्रिल ते जूनदरम्यान ही लस रशियातून भारतात आयात करणार आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडमार्फत (RDIF) भारताला 250 दशलक्ष डोस दिले जाणार आहे. या लशीची भारतात किती किंमत असणार माहिती नाही. पुढील आठवड्यात ही किंमत ठरेल.
हे वाचा - कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या Remdesivir बाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय
रशियाच्या राजधानीचं शहर असलेल्या मॉस्कोमधल्या (Moscow) गामालेय नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिऑलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी या संस्थेने स्पुतनिक V ही लस विकसित केली आहे. मानवात सर्दीसाठी (Adenovirus) कारणीभूत असलेल्या दोन विषाणूंचा वापर या लशीत करण्यात आला आहे. स्पुतनिक V ही लस कोरोनाप्रतिबंधासाठी 91.5 टक्के प्रभावी असल्याचं आढळलं आहे.
स्पुतनिक V ही लस दोन ते आठ अंश सेल्सिअस तापमानाला साठवून ठेवावी लागते. याचाच अर्थ असा की नेहमीच्यारे फ्रिजरेटरमध्ये ती साठवता येऊ शकते. तिच्यासाठी अतिरिक्त कोल्ड-चेन इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता नाही. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लशींप्रमाणेच स्पुतनिक V या लशीचेही दोन डोस घेणं आवश्यक आहे. फक्त या लशीच्या दोन डोसमध्ये 21 दिवसांचं अंतर असणं आवश्यक आहे.
हे वाचा - फक्त 156 रुपयांत कोरोनावर उपचार; या योजनेअंतर्गत 2 लाखांपर्यंतचा खर्च मिळणार
भारतात वापरण्यास मंजुरी मिळालेली ही तिसरी कोरोना लस आहे. यापूर्वी ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राझेनेका कंपनी यांनी विकसित केलेली आणि पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने उत्पादित केलेली कोविशिल्ड (Covishield)आणि भारत बायोटेकनं विकसित केलेली कोव्हॅक्सिन (Covaxin) या दोन लशींच्या आपत्कालीन वापरास भारतात परवानगी देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.