मॉस्को, 16 ऑक्टोबर : कोरोना लशीच्या (corona vaccine) स्पर्धेत रशिया (russia) सर्वात पुढे जाताना दिसत आहे. जिथं सर्व देशांमध्ये अजूनही लशींचं ट्रायल सुरू आहे, तिथं रशियाने आधी आपल्या दोन लशींना मंजुरी दिली आणि आता तिसरी लस तयार केली आहे. Sputnik V आणि EpiVacCorona नंतर रशियाने आता तिसरी कोरोना लस तयार केल्याचा दावा रशियाने केला आहे.
रशियाची तिसरी कोरोना लस चुमाकोव्ह सेंटर ऑफ रशियन अॅकडमी ऑफ सायन्सेजने तयार करण्यात आली आहे. या लशीचं पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. पहिला टप्पा 6 ऑक्टोबरला सुरू झाला. त्यावेळी 15 जणांना ही लस देण्यात आली आहे. यापैकी कुणामध्येही लशीचा दुष्परिणाम दिसलेला नाही, असं सांगितलं जातं आहे. या लशीचं दुसऱ्या टप्प्यातील ट्रायल 19 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्यावेळी 285 जणांना लस दिली जाणार असल्याचं सांगितलं जातं आहे. क्लिनिकल ट्रायल डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, अशी आशा व्यक्त केली जाते आहे. हिंदुस्थान टाइम्सच्या रिपोर्टनुसार या लशीला डिसेंबर 2020 पर्यंत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
हे वाचा - कोरोनाची माहिती देणारे व्हिडीओ पाहताय? YouTube ने घेतला महत्त्वाचा निर्णय
रशियाची पहिली लस Sputnik V एडिनोव्हायरस व्हेक्टरवर आधारित आहे. ही लस रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या मुलीलाही देण्यात आली आहे. सध्या 13,000 लोकांना ही लस दिली जाते आहे. या लशीला 11 ऑगस्टला मंजुरी देण्यात आली आणि यानंतर पहिली कोरोना लस तयार करणारा रशिया जगातील पहिला देश बनला.
तर रशियाची दुसरी EpiVacCorona लस सिंथेटिक लस आहे. सायबेरियातील व्हेक्टर इन्स्टिट्युटने ही लस तयार केली आहे. ही लस Sputnik V पेक्षा सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे. याचं ट्रायल 100 जणांवर करण्यात आलं आहे. रशियाचे उपराष्ट्राध्यक्ष तात्याना गोलिकोवा आणि चीफ सेनेटरी डॉक्टर अन्ना पोपोवा यांनी हे लस घेतली आहे, त्यांनी याच्या दुष्परिणामाबाबत माहिती दिलेली नाही. पहिली लस या लशीला 14 ऑक्टोबरला मंजुरी दिली आहे. लशीचे 60,000 डोस लवकरच तयार केले जाणार आहे. 40,000 जणांवर पोस्ट रजिस्ट्रेशन क्लिनिकल ट्रायल सुरू केलं जाणार आहे.
हे वाचा - कोरोनाला हरवण्यासाठी पुतिन यांचा 'प्लॅन बी', 40 हजार लोकांना देणार नवं Vaccine
रशियन लशीचं भारतात ट्रायल करण्यासाठी डॉ. रेड्डी लॅबने रशियासह करार केला होता. तसंच ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाकडे परवानगी मागितली होती. मात्र डीजीसीआयने परवानगी दिली नाही. रशियाने आपल्या कोणत्याही लशीचं मोठ्या स्तरावर ट्रायल केलेलं नाही. त्यामुळे या लशीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले जात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Coronavirus, Russia