रायपूर, 13 ऑक्टोबर : वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यानंतर दंड वसूल केला जातो. दुचाकी, चारचाकी अशा गाड्यांसाठी वेगवेगळे नियम असतात. मात्र जर एखादी गाडी यापेक्षा वेगळी असेल तर, मग नेमकं चलन कसं कापणार? असाच प्रश्न वाहतूक पोलिसांनीही पडला आहे. सोशल मीडियावर सध्या अशाच एका गाडीचा फोटो व्हायरल होतो आहे.
छत्तीसगडचे एसपी संतोष सिंग यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये एक गाडी आहे, ज्याला सायकल म्हणावं, बाईक म्हणावं की ट्रक म्हणावा असाच प्रश्न हा फोटो पाहून पडेल.
पकड़ तो लिया है, उल्लंघन भी कई चीजों का हैं। पर अब ये नहीं समझ आ रहा कि चालान किसका काटे- ट्रक का,
बाइक का, या साईकिल का या इनको इस आविष्कार के लिए बधाई दें
हा फोटो पाहिल्यानंतर त्याला स्टेअरिंग आहे, सायलेन्सर आहे, सायकलच्या मागे रॉयल इनफिल्ड असं लिहिलं आहे. गाडीच्या मागे बोली भाषेत पाटीही लिहिली आहे, ज्यावर लकी द ग्रेट असं लिहिलं आहे आणि असं पाहायला गेलं तर खरं तर ही सायकल आहे.
आता हा तरुण सायकल, बाईक आणि चारचाकी असं एकत्र चालवतो आहे. चारचाकीसारखं स्टेअरिंग लावलं आहे आणि हे स्टेअरिंग हातात घेताना सीट बेल्ट बांधला नाही. त्यानंतर बाईक म्हणाल तर तरुणाने हेल्मेट घातलेला नाही. शिवाय सायकल म्हणून बाईक आणि गाडीसाठी लागणारी ना कागदपत्रं, ना लायसेन्स. अशा कितीतरी नियमांचं उल्लंघन झालं आहे.
तरुणाने खरंतर ही नवी गाडी निर्माण करून आविष्कारच केला आहे. त्यामुळे तो पकडला गेला. मात्र नियमांचं उल्लंघन केल्यानंतर आता चलन कसलं कापायचं म्हणून पोलीसही बुचकळ्यात पडले आहेत.
हा फोटो शेअर करताना संतोष सिंग यांनी ट्वीट केलं आहे, "पकडलं खरं, उल्लंघनदेखील अनेक गोष्टींचं आहे. मात्र आता हे समजत नाही आहे की नेमकं चलन कशाचं कापायचं. ट्रकचं, बाईकचं की सायकलचं. की या आविष्कारासाठी यांचं अभिनंदन करायचं". या तरुणाचं त्यांनी कौतुकही केलं आहे.
हा फोटो पाहिल्यानंतर यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. त्यापैकी बहुतेकांनी या आविष्कारासाठी या तरुणाचं अभिनंदन करायला हवं, त्याला पुरस्कारच द्यायला हवा असं म्हटलं आहे.