मुंबई, 22 ऑगस्ट: बदलत्या जीवनशैलीमुळे तणाव वाढल्याचं दिसून येतं. रोजच्या कामाची पद्धत, कौटुंबिक, आर्थिक बाबी या गोष्टींमुळे तणाव, चिंता आणि राग यामध्ये वाढ होते. तणाव आणि चिडणं या गोष्टींवर नियंत्रण मिळवण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. परंतु, या उपायांमुळे अपेक्षित फायदा होतोच असं नाही. खरं तर, कामाच्या ताणामुळे तणाव, चिडचिडेपणा, राग येणं या गोष्टी खूप स्वाभाविक आहेत; पण काही वेळा या गोष्टी नियंत्रणाबाहेर जातात. यामुळे ऑफिसमधले सहकारी किंवा कुटुंबातल्या व्यक्तींसोबत वादही होतात. तसंच शारीरिक समस्याही निर्माण होतात; मात्र श्वसनासंबंधीच्या व्यायामाच्या साह्याने या गोष्टी नक्कीच टाळता येऊ शकतात. हेल्थ शॉट्स डॉट कॉमने याविषयी माहिती दिली आहे. कोणत्याही प्रकारच्या श्वासोच्छवासाच्या व्यायामाला किंवा तंत्राला ब्रीद वर्क म्हणतात. तुम्ही जाणीवपूर्वक श्वसनाचे व्यायाम करत असाल, तुमचं मन श्वास घेण्याच्या आणि सोडण्याच्या प्रक्रियेवर केंद्रित केलं, तर त्याच्या साह्याने तुम्ही सर्व प्रकारच्या तणावापासून मुक्त होऊ शकता. शिवाय या गोष्टी तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत बनवतात. पर्यायी उपचार म्हणून आजकाल ब्रीद वर्क किंवा ब्रीदिंग एक्सरसाइजचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. तुम्ही जाणीवपूर्वक श्वास घेणं आणि सोडणं ही क्रिया करत असाल तर त्यामुळे तुमची मज्जासंस्था शांत होते. यामुळे हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात येतं. रक्तातली स्ट्रेस हॉर्मोनची पातळी कमी होते. जेव्हा तुम्ही खोल श्वास घेता, तेव्हा शरीरात मोठ्या प्रमाणात हवा जाते. यामुळे भीती आणि तणाव कमी होतो. हेही वाचा - Human Body: मानवी शरीराशी निगडीत ‘या’ आहेत अद्भुत गोष्टी याशिवाय, तणाव, चिडचिडेपणा दूर करण्यासाठी फोर्टिस एस्कॉर्ट हॉस्पिटलच्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ. भावना बर्मी यांनी दोन महत्त्वपूर्ण उपाय सांगितले आहेत. यात गरम तळव्यांचा (Warm Palms) प्रयोग आणि नमस्ते आसनाचा (Hello Gesture) समावेश आहे. नमस्ते आसन करताना सर्वप्रथम आपले हात हृदय चक्राजवळ ठेवा. त्यानंतर श्वासाकडे लक्ष द्या. काही काळ या अवस्थेत राहिल्यानंतर तुम्हाला आराम वाटेल. तणाव आणि चिडचिडेपणा दूर करण्यासाठी तुम्ही गरम तळव्यांचा प्रयोग करू शकता. यात सर्वप्रथम दोन्ही हातांचे तळवे एकमेकांशी घासून गरम करावेत. त्यानंतर गरम तळवे तणावग्रस्त अवयवांवर ठेवावेत. त्यानंतर तुम्हाला शांत करणारी ऊर्जा अनुभवता येईल. ही क्रिया दहा वेळा करा, असं डॉ. बर्मी यांनी सांगितलं. योगतज्ज्ञ मनीषा कोहली यांनी रोज करण्यासाठी तीन ब्रीदिंग एक्सरसाइजविषयी माहिती दिली आहे. यामुळे ताण आपोआप कमी होतो आणि रिलॅक्स वाटतं, असं त्या सांगतात. हे आर्ट ऑफ ब्रीदिंग असून, त्याला डायफ्रॅमॅटिक ब्रीदिंग असंही म्हणतात. या व्यायामांमध्ये खोल श्वास घेणं, अनुलोम-विलोम आणि कपालभातीचा समावेश आहे. हेही वाचा - ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन करणं होणार सोपं; दिल्लीतील IBS हॉस्पिटलनं शोधली ब्रेन मॅपिंग टेक्नॉलॉजी अनुलोम-विलोम दिवसभरात केव्हाही आणि कोणीही करू शकतो. अनुलोम-विलोम करण्यासाठी सर्वप्रथम डोळे बंद करून पद्मासनात बसावं. त्यानंतर उजवी नाकपुडी बंद करावी. डाव्या नाकपुडीतून दीर्घ श्वास घ्यावा. फुफ्फुसं भरण्यासाठी शक्य तितकीच हवा आत घ्यावी. त्यानंतर उजव्या नाकपुडीवरचा अंगठा काढून श्वास सोडावा. श्वास सोडताना डावी नाकपुडी बंद करा. मग उजव्या नाकपुडीतून श्वास घ्या. डाव्या नाकपुडीवरचा अंगठा काढून श्वास सोडा. हा व्यायाम 10 मिनिटांपर्यंत करता येतो. कपालभाती हादेखील उत्तम व्यायामप्रकार आहे. जेवल्यानंतर किंवा अन्न खाल्ल्यानंतर 4 तासांनी कपालभाती करावी. रक्तदाब रुग्ण, गर्भवती महिलांनी, तसंच मासिक पाळीच्या काळात कपालभाती करू नये. कपालभाती करण्यासाठी पाय दुमडून बसावं. पाठीचा कणा, कंबर आणि मान सरळ ठेवावी. दोन्ही हात एकमेकांवर ठेवून पोटावर ठेवावेत. एकदा दीर्घ श्वास घ्या आणि नंतर पोटाला धक्का देऊन वारंवार श्वास सोडा. या क्रियेत तुमचं पोट आतल्या बाजूला गेलं पाहिजे. ही क्रिया 50 वेळा करावी. हेही वाचा - जर तुम्ही टर्म इन्शुरन्स घेत असाल तर या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा! अन्यथा पॉलिसी असून उपयोग नाही तणाव आणि चिडचिडेपणा कमी होण्यासाठी तुम्ही दीर्घ श्वासाचा व्यायाम करू शकता. यासाठी सर्वप्रथम मन शांत करून श्वासावर लक्ष केंद्रित करावं. हा व्यायाम कोणीही करू शकतं. दीर्घ श्वसनाचा (Deep Breathing) व्यायाम करण्यासाठी सर्वप्रथम पाय दुमडून ताठ बसा. पाठीचा कणा, कंबर आणि मान ताठ ठेवा. ज्यांना पाय दुमडून बसणं शक्य नाही, ते खुर्चीत बसून हा व्यायाम करू शकतात. त्यानंतर डोळे बंद करावेत. एक हात छातीवर, तर दुसरा हात पोटावर ठेवा. सर्व लक्ष श्वासावर केंद्रित करावं. खोल श्वास घेऊन सोडावा. ही क्रिया पाच वेळा करावी, असं मनीषा कोहली यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







