कोरोनाविरोधात आणखी एक प्रभावी औषध, 3 दिवसांतच रुग्णांना मिळाला आराम; शास्त्रज्ञांचा दावा

कोरोनाविरोधात आणखी एक प्रभावी औषध, 3 दिवसांतच रुग्णांना मिळाला आराम; शास्त्रज्ञांचा दावा

कोरोना रुग्णांमध्ये रोगप्रतिकारक प्रणाली अतिसक्रिय होऊन शरीराला पोहोचणारी हानी रोखण्यास हे औषध मदत करू शकतं, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 08 जून : कोरोनाव्हायरसविरोधात (Coronavirus) औषध नाही, मात्र इतर आजारावरील काही औषधं प्रभावी ठरत आहेत. भारतात सध्या कोरोना रुग्णांवर हायड्रोक्सिक्लोरोक्विन आणि रेमडेसिवीर या औषधांचं ट्रायल सुरू आहे. अशात आणखी एक औषध कोरोनाविरोधी प्रभावी ठरू शकतं, असा दावा अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी केला आहे.

कोरोनाला कॅन्सरचं औषध टक्कर देऊ शकतं, असा दावा नॅशनल कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्युट आणि नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ अॅलर्जी अँड इन्फेक्शिअस डिसीज (NIAID) यांनी एकत्रितरित्या हा अभ्यास केला. सायन्स इम्युनोलॉजी जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे.

कोरोनाच्या काही रुग्णांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती अतिसक्रिय (overactive immune response) होते. शिवाय कोरोना रुग्णांना श्वास घ्यायलाही त्रास होतो. अशा रुग्णांसाठी एकॅलब्रुटिनिब (acalabrutinib) हे औषध प्रभावी ठरू शकतं, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं. हे औषध ब्लड कॅन्सरवर उपचारासाठी वापरलं जातं.

हे वाचा - Breasfeeding करणाऱ्या आईने अंडं खाणं सुरक्षित आहे का?

बीटीके प्रोटिन  (Bruton tyrosine kinase - BTK) रोगप्रतिकारक प्रणालीत महत्त्वाची भूमिका बजावतं. यामुळेच सायटोकाइन (cytokines) या प्रोटिनच्या निर्मितीला उत्तेजन मिळतं जे सूजेला कारणीभूत ठरतं. कोरोना रुग्णांमध्ये हे प्रोटिन जास्त झाल्याने  रोगप्रतिकारक प्रणालीच इन्फेक्शनसह इतर अवयवांनाही हानी पोहोचवू लागते. जर बीटीके प्रोटिन ब्लॉक केलं तर रोगप्रतिकारक प्रणाली अतिसक्रिय होण्यापासून रोखता येऊ शकते. एकॅलब्रुटिनिब औषधाने हे बीटीके प्रोटिन ब्लॉक करू शकतो, असं संशोधकांनी सांगितलं.

हे वाचा - लहान मुलांनाही असू शकतो ब्रेन ट्युमर; या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

संशोधकांनी एकॅलब्रुटिनिब औषधाचा रुग्णालयात दाखल असलेल्या 19 गंभीर कोरोनारुग्णांवर अभ्यास करून पाहिला. या रुग्णांच्या शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी होती, शिवाय सूजही होती.

औषधाचा डोस दिल्यानंतर एक ते तीन दिवसांतच या रुग्णांची प्रकृती सुधारली. त्यांना नीट श्वास घ्यायला येऊ लागला आणि सूजही कमी झाली. ऑक्सिजनवर असलेल्या 11 पैकी 8 रुग्णांना डिस्चार्जही मिळाला. मात्र वेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांमध्ये फारशी सुधारणा झाली नाही. 8 पैकी 4 रुग्णांना नंतर वेंटिलेटरची गरज पडली नाही. त्यापैकी दोघांना डिस्चार्ज मिळाला तर दोघांचा मृत्यू झाला.

हे वाचा - ब्लड प्रेशर असलेल्या कोरोना रुग्णांची 'ही' चूक बेतेल जीवावर; ओढावू शकतो मृत्यू

अद्याप या औषधाबाबत अभ्यास सुरू आहे. त्यामुळे सर्व रुग्णांवर याचं क्लिनिकल ट्रायल करू शकत नाही. रुग्णांच्या परिस्थितीनुसार या औषधाचा वापर व्हायला हवा, असंही शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं आहे.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: June 8, 2020, 3:52 PM IST

ताज्या बातम्या