पाटणा, 12 डिसेंबर : एखाद्या मृताच्या जवळ जायची तशीही अनेकांना भीती वाटते आणि अशा परिस्थितीत त्या मृतदेहामध्ये अचानक हालचाल होऊ लागली तर मग काय अवस्था होईल याची कल्पना आपण करूच शकतो. असंच काहीसं घडलं ते बिहारमधील एका कुटुंबासोबत. रुग्णालयात त्यांचा रुग्ण मृत झाला. त्याचा मृतदेह आणण्यासाठी ते लोक गेले. डेडबॉडीजवळ पोहोचताच त्यांना घामच फुटला.
बिहारच्या धनबादमधील असर्फी रुग्णालयात घडलेली ही घटना. डॉक्टरांनी एका रुग्णाला मृत घोषित केलं. रुग्णाच्या नातेवाईकांना डेथ सर्टिफिकेच दिलं आणि मृतदेह घेऊन जाण्यास सांगितलं. जेव्हा नातेवाईक डेडबॉडीजवळ पोहोचले तेव्हा त्यांना धक्काच बसला.
आज तकच्या रिपोर्टनुसार रुग्णाच्या कुटुंबानं सांगितलं, 9 डिसेंबरला त्यांच्या रुग्णाचं ब्रेन हॅमरेज झालं होतं. यानंतर रुग्णाला असर्फी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शुक्रवारी 11 डिसेंबरला रुग्णालयानं रुग्णाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आणि रुग्णाचा मृतदेह नेण्यास सांगितलं. नातेवाईक जेव्हा मृतदेह घ्यायला गेले, तेव्हा मृतदेहामध्ये हालचाल होत होती. त्याच्या हृदयाची धडधड सुरू होती असं दिसलं. त्याचा श्वासोच्छवासही सुरू होता. याचा अर्थ त्यांचा रुग्ण मृत झाला नव्हता तर जिवंत होता.
हे वाचा - 120 रुपयांच्या बदल्यात एक कोटी रुपये खिशात; एका रात्रीत ड्रायव्हर झाला मालामाल
डॉक्टरांनी जिवंत रुग्णालाच मृत घोषित केलं होतं. रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला याची माहिती दिली तेव्हा प्रशासनानं हा दावा फेटाळला. तो रुग्ण जिवंत नाही असं सांगितलं. मग नातेवाईकांनी गोंधळ घातला. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गोंधळ शांत केला. रुग्णालयाचा प्रताप पाहून पोलीसही आश्चर्यचकीत झाले. याप्रकरणात पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे आणि पुढील तपास सुरू केला आहे.
हे वाचा - कोरोनाच्या नियमांचं केलं उल्लंघन; भरमंडपात नवरीचा लग्नास नकार
दरम्यान संबंधित डॉक्टर फरार झाल्याचं सांगितलं जातं आहे. तर रुग्णाला उपचारासाठी SNMMCH मध्ये पाठवण्यात आल्याची माहिती आहे.