लखनऊ, 21 ऑगस्ट : प्रत्येक पालकासाठी त्यांची सर्वात मोठी संपत्ती असते ती त्यांची मुलं. अगदी गरीब असो किंवा श्रीमंत पालक आपल्या मुलांसाठी जीवाचं रान करतात. त्यांच्यावर संकट ओढावल्यास त्यांच्यासमोर ढाल बनून राहतात. त्यांचा मुलं हाच त्यांचा जीव असतो आणि अशाच जीवाला वाचवण्यासाठी एका बापाची धडपड सुरू आहे. बिहारमधील (Bihar) 10 महिन्यांचा अयांश सिंह (Ayansh singh) ज्याला स्पाइनल मस्कुलर अट्रॉफी (Spinal muscular atrophy) हा दुर्मिळ आजार आहे. यावर उपचारासाठी 16 कोटी रुपयांचं इंजेक्शन द्यावं लागतं. इतका खर्च अयांशच्या पालकांना झेपणारा नाही, त्यामुळे त्यांनी मदत मागितली आहे. अयांशचे वडील आलोक कुमार सिंह (Alok kumar singh) सोशल मीडियावर आपल्या मुलासाठी मदतीसाठी हात पसरले आहेत . मला जेलमध्ये टाका पण माझ्या लेकाला वाचवा अशी आर्त हाक दिली आहे. आज तक च्या रिपोर्टनुसार आलोक कुमार सिंह म्हणाले, “मी आलोक कुमार सिंह. माझ्या मुलाचं नाव अयांश आहे, ज्याला एक गंभीर आजार आहे. त्याला वाचवण्यासाठी 16 कोटी रुपये इंजेक्शनची गरज आहे. मी आणि माझी पत्नी दिवसरात्र आपल्या मुलाला वाचवण्यासाठी लोकांकडून मदत मागत आहोत. काही लोक माझ्याबाबत अफवा पसरवत आहे. दहा वर्षांपूर्वी माझ्या भावाकडून जी चूक झाली त्याची शिक्षा मला नका देऊ. माझ्याबाबत अफवा नका पसरवू. माझा भाऊ रांचीतील एका इन्स्टिट्यूटमध्ये होता, जे 2012 साली बंद झालं. त्यात मीसुद्धा भागीदार होतो. दहा वर्षांपूर्वीचं सत्य तुम्हाला माहिती नाही. फक्त तुम्ही शेअऱ करत आहात” हे वाचा - पालकांनो सावध राहा! कोरोनानंतर AFM चं संकट; मुलांमधील या लक्षणांकडे दुर्लक्ष नको पुढे त्यांनी सांगितलं, “माझं लग्न इन्स्टिट्यूट बंद झाल्यानंतर 2014 साली झालं. आठ वर्षांपूर्वीच मी माझ्या भावापासून दूर झालो. दहा वर्षांपूर्वी माझ्या भावाने काही चुकीचं केलं असेल किंवा माझ्याकडून काही चूक झाली असेल तर त्याची शिक्षा दहा महिन्यांच्या अयांशला का? तुम्ही जर या मुलाला वाचवू शकत नाही तर चुकीची माहिती पसरवून त्याला मारण्याचा प्रयत्न करू नका. मी एक हतबल बाप माझ्या मुलाचं आयुष्य तुमच्याकडून मागत आहे. जर सरकार किंवा तुमच्या नजरेत मी चुकीचा असेन तर माझी संपत्ती विकून किंवा मला जेलमध्ये टाकून माझ्या मुलाला वाचवा” “जर माझ्याकडे खूप पैसे असते तर मी बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारसमोर रस्त्यावर बसून माझ्या मुलाच्या जीवासाठी भीक मागितली नसते. जो बाप आपल्या मुलासाठी मुख्यंंत्र्यांपासून पंतप्रधान आणि राज्यपालांपासून राष्ट्रपतींपर्यंत मदत मागतो आहे, त्याची स्थिती तुम्ही समजू शकता. ज्यांना माझ्या खात्याची माहिती हवी आहे, त्यांनी माझ्या घरी यावं मी त्यांना सर्व माहिती देईन. सोशल मीडियावरही मी नेहमी अपडेट देतो. कृपया माध्या मुलाचा चेहरा पाहा, माझी स्थिती पाहा. एका मुलासाठी तीन महिन्यांपासून आम्ही दिवसरात्र भीक मागत आहोत. माझ्या वेदना समजून घ्या. माझ्याबाबत काही तक्रार असेल तर मला सांगा”, असं ते म्हणाले. हे वाचा - चमत्कार! 109 दिवस ECMO वर कोरोनाशी झुंज; लंग ट्रान्सप्लांटशिवायच रुग्ण ठणठणीत “मला एक मुलगी आहे, ती निरोगी आहे. 2017 साली मला मुलगा झाला पण अय़ांशला जो आजार झाला त्याच आजारामुळे सहा महिन्यांतच तो आम्हाला कायमचा सोडून गेला. सप्टेंबर 2020 मध्ये मला दुसरा मुलगा झाला, तो म्हणजे अयांश. त्याला SMA Type 1 आहे, आम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. मी एक मुलगा आधीच गमावला आहे, दुसऱ्याला तुम्ही वाचवा. जितकी मदत मला शक्य होईल मी करेन पण आता या मुलाला सर्वात जास्त मदतीची गरज आहे. मी हात जोडतो, पाय धरतो कृपया मला मुलाला वाचवा, अफवा पसरवू नका”, अशी विनंती त्यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.