मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

चमत्कार! तब्बल 109 दिवस ECMO वर कोरोनाशी झुंज; Lung Transplant शिवायच ठणठणीत बरा झाला रुग्ण

चमत्कार! तब्बल 109 दिवस ECMO वर कोरोनाशी झुंज; Lung Transplant शिवायच ठणठणीत बरा झाला रुग्ण

जास्त दिवस ECMO वर राहून लंग ट्रान्सप्लांटशिवाय बरा झालेला भारतातील पहिला कोरोना रुग्ण.

जास्त दिवस ECMO वर राहून लंग ट्रान्सप्लांटशिवाय बरा झालेला भारतातील पहिला कोरोना रुग्ण.

आतापर्यंत चार आठवड्यांपेक्षा जास्त दिवस ECMO राहिलेले रुग्ण फुफ्फुस प्रत्यारोपणाशिवाय (Lung transplant) बरे झाले नाहीत.

चेन्नई, 20 ऑगस्ट : कोविड-19च्या (Covid 19) भयावह संसर्गाने अनेकांचे प्राण हिरावून घेतले. अनेक तरुणही त्यात बळी पडले; मात्र काही जण गंभीर संसर्ग होऊनही आश्चर्यकारकरीत्या त्यातून बचावलेही. अशीच एक दुर्मिळ घटना नुकतीच चेन्नईत (Chennai) घडली आहे. कोरोना संसर्गामुळे तब्बल 109 दिवस ईसीएमओ (ECMO) प्रक्रिया आणि व्हेंटिलेटरवर राहावं लागलेले 56 वर्षांचे मुदिज्जा (Mudijja) नुकतेच ठणठणीत होऊन घरी गेले. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे एवढं होऊनही त्यांच्यावर फुप्फुस प्रत्यारोपणाची (Lung Transplant) शस्त्रक्रिया करावी लागली नाही. वैद्यकीयदृष्ट्या हे मोठंच आश्चर्य मानलं जात आहे.

चेन्नईतल्या क्रोमपेट (Chromepet) इथल्या रेला हॉस्पिटल (Rela Hospital) या मल्टिस्पेशालिटी क्वाटर्नरी केअर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. हॉस्पिटलच्या म्हणण्यानुसार हा मोठा वैद्यकीय चमत्कारच आहे.

फुप्फुसावरच्या शस्त्रक्रियेदरम्यान किंवा फुप्फुस प्रत्यारोपण सुरू असतानाच्या कालावधीत ते काम अखंडितपणे सुरू राहावं म्हणून ECMO ही प्रक्रिया केली जाते. कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वांत जास्त नुकसान होतं ते फुप्फुसांचं. कारण त्यावरच त्या विषाणूचा हल्ला होतो. त्यामुळे फुप्फुसातला संसर्ग गंभीर असल्यास एक्स्ट्रा कॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन (ECMO) ही प्रक्रिया करावी लागते. त्याद्वारे रक्तात ऑक्सिजन मिसळण्याचं फुप्फुसांचं काम शरीराबाहेर केलं जातं. ही प्रक्रिया दीर्घ काळ करता येत नाही.  त्यामुळे तब्बल 109 दिवस ECMO आणि व्हेंटिलेटरवर (Ventilator) राहूनही मुदिज्जा यांना फुप्फुस प्रत्यारोपणाची आवश्यकता न भासता ते ठणठणीत बरे झाले, हा चमत्कार मानला जात आहे.

हे वाचा - पालकांनो सावध राहा! कोरोनानंतर AFM चं संकट; मुलांमधील या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

मुदिज्जा यांना एप्रिल महिन्याच्या अखेरीला कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यानंतर रेला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. सीटी स्कॅन केल्यानंतर त्यांना मध्यम स्वरूपाचा कोविड-19 न्यूमोनिया झाल्याचं स्पष्ट झालं. त्यांची ऑक्सिजन सॅच्युरेशन पातळी (Oxygen Saturation Level) 92 टक्के होती. त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना प्रति मिनिटाला 10 लिटर ऑक्सिजनची गरज भासू लागली. हृदय आणि फुप्फुस प्रत्यारोपण करणारे सर्जन आणि ज्येष्ठ सल्लागार डॉ. सी. अरुमुगम यांच्या नेतृत्वाखालच्या वैद्यकीय टीमने त्यांच्यावर ECMO सुरू करण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्या प्रकृतीत सुरुवातीचे चार-पाच आठवडे फारशी सुधारणा झाली नाही. तरीही ते उपचार सुरू ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. 50 दिवस ECMO सुरू राहिल्यानंतर फुप्फुसांमध्ये थोडी सुधारणा दिसू लागली. त्यानंतर फुप्फुस प्रत्यारोपणाशिवायच ही प्रक्रिया सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. जसजशी फुप्फुसांमध्ये सुधारणा होऊ लागली, तसतशी ही प्रक्रिया हळूहळू कमी करून बंद करण्यात आली, असं डॉ. अरुमुगम यांनी सांगितलं.

62 दिवसांनी ECMO पूर्ण बंद करण्यात आली; मात्र पुढचे दोन आठवडे त्यांना (Tracheotomy) ट्रकिओटॉमीद्वारे (घशातून नळ्या घालून) व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. 109 दिवसांनी, 29 जुलै 2021 रोजी त्यांचा व्हेंटिलेटरही काढण्यात आला. त्यानंतर लवकरच मुदिज्जा यांना बसायला लावण्यात आलं. त्यांचा आहारही हळूहळू सुरू करण्यात आला. 60 दिवसांहून अधिक काळ ECMO चा वापर करावा लागूनही फुप्फुस प्रत्यारोपण करावं न लागलेले मुदिज्जा हे देशातले पहिलेच रुग्ण असावेत, असं डॉ. अरुमुगम यांनी सांगितलं. हॉस्पिटलचे अध्यक्ष प्रा. रेला यांनी सांगितलं, की ECMO मशीन हे कोविड काळात जीवनरक्षक टूल ठरतं आहे.

हे वाचा - ZyCov-D ला हिरवा कंदील; भारताने तयार केलेली जगातील पहिली DNA Plasmid कोरोना लस

दरम्यान, चेन्नईतल्याच MGM हेल्थकेअर या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने 32 वर्षांचा एक कोविडबाधित रुग्ण 72 दिवस ECMO वर राहिल्यानंतर बरा झाल्याचं जाहीर केलं आहे. त्या रुग्णाच्या फुप्फुसांमध्ये गंभीर संसर्ग झाला होता. तसंच, कान-नाक-घशातही संसर्ग होता, रक्तस्राव होत होता आणि आणखीही काही कॉम्प्लिकेशन्स होती. ECMO वर ठेवून त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि तो बरा झाला आहे. आणखीही दोन तरुण पेशंट्सना याच पद्धतीने बरं वाटल्याचं हॉस्पिटलने म्हटलं आहे.

First published:

Tags: Corona, Coronavirus, Covid19