मुंबई, 30 जानेवारी : किडनी अर्थात मूत्रपिंड हा शरीरातल्या महत्त्वाच्या अवयवांपैकी एक अवयव आहे. दूषित घटक शरीराबाहेर टाकण्याचं काम हा अवयव करतो. त्यामुळेच किडनीच्या कार्यावर काही विपरीत परिणाम झाला, तर आरोग्यविषयक अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. वेळीच लक्ष दिलं नाही, तर किडनीच्या समस्या गंभीर रूप धारण करतात. अंतिम टप्प्यात त्याबद्दल समजलं तर साहजिकच होणारा त्रास मोठा असतो. म्हणूनच किडनीच्या स्वास्थ्यासाठी चांगली काळजी घेणं अत्यावश्यक असतं. त्यासाठी सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे आहार. आहाराच्या माध्यमातून किडनीचं आरोग्य चांगलं राखता येऊ शकतं. काही पदार्थ किडनीच्या दृष्टीने सुपरफूड्स म्हणून ओळखले जातात. ते आहारात ठेवल्यास किडनीसाठी उपयुक्त ठरू शकतं. त्या पदार्थांबद्दल जाणून घेऊ या.
सफरचंद : सफरचंद हे असं फळ आहे, की ज्यात पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन्स, झिंक अशी अनेक पोषक तत्त्वं आढळतात. कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी हे फळ उपयुक्त ठरतं. तसंच, ग्लुकोजची पातळी कायम राखण्यातही ते उपयुक्त असतं. सफरचंदाचं सेवन किडनीचं आरोग्य चांगलं राहण्याच्या दृष्टीने लाभकारक असतं.
हेही वाचा - तुमच्या शरीरात 'हे' बदल दिसतायेत? वेळीच सावध व्हा असू शकतो किडनीशी संबंधित आजार
लाल ढोबळी मिरची : लाल ढोबळ्या मिरचीत व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 6, फॉलिक अॅसिड, फायबर्स आदी घटक मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे लाल ढोबळी मिरची आहारात असेल, तर किडनीचं आरोग्य चांगलं राहतं. या मिरचीचं सेवन डोळे चांगलं राखण्यासही मदत करतं.
हेही वाचा - Health Tips : 'या' प्रकारचे फॅट म्हणजे विष! तुम्हीही असे घातक पदार्थ खाता का?
अननस : अननस हे खूप हेल्दी आणि चविष्ट फळ आहे. या फळात फायबर्स मोठ्या प्रमाणावर असतात. शिवाय मँगनीज आणि व्हिटॅमिन्सही असतात. या फळाचं सेवन किडनीसाठी लाभदायक ठरतं.
लसूण : भारतीय स्वयंपाकात लसूण वापरली जातेच. त्यामुळे वेगवेगळ्या पदार्थांना खास चव येते. मँगनीज, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6 असे अनेक पौष्टिक घटक लसणीत असतात. ते किडनीच्या आरोग्यासाठी चांगले असतात. लसूण अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्मांसाठीही ओळखली जाते.
फुलकोबी/फ्लॉवर : व्हिटॅमिन सी, फोलेट, फायबर्स आदी घटक फ्लॉवरमध्ये असतात. शरीरातून विषद्रव्यं बाहेर काढून टाकण्याच्या कामी फ्लॉवर उपयुक्त ठरतो. त्यामुळे किडनीचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle