नवी दिल्ली, 29 जानेवारी : आपल्या शरीरात किडनीचं कार्य खूप महत्त्वपूर्ण आहे. किडनीचं पहिलं आणि सर्वांत महत्त्वाचं कार्य म्हणजे रक्त स्वच्छ करणं आणि त्यातील नको असलेले विषारी घटक दूर करणं. शिवाय किडनी रक्तदाब नियंत्रित करण्यातही मदत करते. पण जेव्हा तुमची किडनी नीट काम करत नाही, तेव्हा शरीरात अनेक प्रकारची लक्षणं दिसू लागतात. आज आम्ही तुम्हाला अशा काही लक्षणांबद्दल आणि संकेतांबद्दल सांगणार आहोत, ज्यावरून तुम्हाला सहज कळेल की तुमची किडनी निरोगी आहे की नाही.
खूप थकवा जाणवणं
जर तुम्हाला लहानसहान काम करतानाही थकवा जाणवत असेल आणि तुम्ही कामावर लक्ष केंद्रित करू शकत नसाल तर ते एक लक्षण आहे. जेव्हा आपली किडनी नीट काम करू शकत नाही, तेव्हा रक्तामध्ये टॉक्सिन्स आणि घाण जमा होऊ लागते. यामुळे लोकांना थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.
त्वचा कोरडी पडणं
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, किडनी आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त फ्ल्यूईड्स काढून टाकण्याचं काम करते. याशिवाय ती लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करते, हाडं मजबूत ठेवते आणि रक्तातील पोषक घटकांचं प्रमाण संतुलित ठेवते. त्वचा कोरडी होणं, त्यावर खाज येणं हे किडनीमध्ये काही समस्या असल्याचं एक लक्षण असू शकतं.
लघवीत रक्त येणं
निरोगी किडनी लघवी तयार करण्यासाठी रक्तातील टाकाऊ पदार्थ फिल्टर करते आणि शरीरातील रक्तपेशी सुरक्षित ठेवण्यास मदत करते. पण जेव्हा किडनीतील फिल्टर खराब होतात तेव्हा या रक्तपेशी लघवीमध्ये गळू लागतात. त्यामुळे लघवीमध्ये रक्त येऊ लागते.
लघवीमध्ये फेस तयार होणं
प्रेशर आलं असेल आणि तुम्ही लघवी करत असाल तर तेव्हा थोडा फेस तयार होतो, पण तो काही सेकंदांत स्वतःच नाहीसा होतो, परंतु जर तुमच्या लघवीमध्ये भरपूर फेस असेल तर हे लघवीमध्ये प्रोटिनचं प्रमाण वाढल्याचे संकेत असू शकतात.
स्नायू आखडणं
सोडियम, कॅल्शियम, पोटॅशियम किंवा इतर इलेक्ट्रोलाइट्सच्या पातळीतील असंतुलन तुमच्या स्नायूंच्या कार्यामध्ये अडथळा आणू शकतं, ज्यामुळे स्नायू आखडू शकतात आणि तुम्हाला किडनीसंबंधी आजार होऊ शकतात, असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात.
घोटा आणि पायांना सूज येणं
जेव्हा किडनी शरीरातून सोडियम योग्यप्रकारे काढून टाकू शकत नाही, तेव्हा तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात द्रव जमा होतो. त्यामुळे हात, पाय, घोट्यावर किंवा चेहऱ्यावर सूज येऊ लागते. विशेषतः तुमच्या पाय आणि घोट्यावर सूज दिसू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.