नवी दिल्ली 27 डिसेंबर : सध्या विज्ञानाचं युग आहे. मानवानं विज्ञानाच्या (Science) आधारे इतकी प्रगती केली आहे की, आपण थेट सूर्यापर्यंत जाऊन पोहचलो आहोत. मात्र, तरी देखील कधीना कधी आपल्याला भविष्य (Future), ज्योतिषशास्त्र (Astrology), अंकशास्त्र (Numerology) यासारख्या गोष्टींवर विश्वास ठेवावासा वाटतो. काही लोक तर आपल्या दिवसाची सुरुवातच राशीभविष्य वाचून करतात. आपला दिवस कसा जाईल? ही उत्सुकता त्यामागे असते. दिवसाबरोबरच आपलं वर्ष कसं जाईल? याबाबतही अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण होत असते. सध्या जगभरात नवीन वर्षाच्या स्वागताची लगबग सुरू आहे.
2021 या वर्षानं कोरोना महामारी, नैसर्गिक आपत्ती यांसारख्या घातक गोष्टी आपल्याला दिल्या. आता येणारं 2022 हे वर्ष काय घेऊन येणार आहे, याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या पार्श्वभूमीवर बल्गेरियातील (Bulgaria) बाबा वंगा (Baba Vanga) या नावानं प्रसिद्ध असलेल्या वांगेलिया पांडावा गुस्तेरोव्हा (Vangelia Pandava Gusterova) यांनी 2022 बद्दल केलेली आश्चर्यकारक भविष्यवाणी (Prophecy) चर्चेत आली आहे. दृष्टीहीन असलेल्या बाबा वंगा यांनी आपल्या मृत्यूपूर्वीच जगाच्या भविष्याबद्दल अनेक गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. टीव्ही 9नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
वयाच्या 12व्या वर्षी वांगेलिया गुस्तेरोव्हा यांनी आपली सामान्य दृष्टी गमावली होती. आपल्याला भविष्य बघता यावं म्हणूनचं देवानं आपली दृष्टी घेतल्याचा दावा, बाबा वंगा यांनी केला होता. त्यांनी सोव्हिएत संघाचं विघटन, ब्रिटनची प्रिन्सेस डायना हिचा मृत्यू (Princess Diana Death), 2001 मधील वर्ल्ड ट्रेड सेंटर दहशतवादी हल्ला, चर्नोबिल अपघात (Chernobyl disaster) आणि ब्रेक्झिट या संकटांबाबत केलेल्या भविष्यवाणी एकदम खऱ्या ठरल्या आहेत. 'बाल्कनचा नास्त्रेडॅमस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा वंगा यांनी 2022 या वर्षासाठी केलेल्या भविष्यवाणीनं सध्या इंटरनेटवर तुफान लोकप्रियता मिळवली आहे.
बाबा वंगा यांच्या मते, भारतातील तापमान (Baba Venga Prediction for India) 50 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल. यामुळे पिकांवर टोळधाड (Locusts Attack) येईल आणि भारतात दुष्काळ पडेल. 2022 मध्ये जगातील प्रमुख शहरं पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करतील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. नद्यांच्या प्रदूषणामुळे पिण्याच्या पाण्याची (Drinking Water) ही कमतरता भासणार आहे. 2022 मध्ये जास्तीत जास्त लोक संगणक आणि मोबाईलवर आपला अधिक वेळ घालवतील, असंदेखील त्यांनी आपल्या भविष्यवाणीमध्ये म्हटलं आहे.
2022मध्ये करावा लागेल नैसर्गिक आपत्तींचा सामना
यावर्षी संशोधकांचा एक गट सायबेरियामध्ये (Siberia) एक प्राणघातक विषाणू (Deadly virus) शोधेल. हा विषाणू आतापर्यंत गोठलेल्या अवस्थेत असेल. मात्र, ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनद्या वितळतील आणि हा विषाणू मुक्त होईल. त्यानंतर निर्माण होणारी परिस्थिती नियंत्रित करणं कठीण होईल, असा अंदाज बाबा वंगा यांनी व्यक्त केला आहे.
बाबा वांगा यांच्या मते, 2022 मध्ये भूकंप (Earthquake) आणि त्सुनामीचा (Tsunami) धोका वाढणार आहे. हिंद महासागरात एक शक्तिशाली भूकंप होईल आणि त्यानंतर मोठी त्सुनामी येईल. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंडोनेशिया आणि भारतासह जगातील अनेक देशांच्या किनारी भागांना याचा सामना करावा लागेल. या त्सुनामीत शेकडो लोकांचा मृत्यू होईल. याशिवाय, 2022मध्ये एलियन्स ओमुआमुआ नावाचा लघुग्रह पृथ्वीवर पाठवतील, असाही दावा त्यांनी केला आहे.
आणखी पाच दिवसांनी संपूर्ण जग नवीन वर्षाचं स्वागत करेल. त्यापूर्वीच बाबा वंगा यांची भविष्यवाणी व्हायरल झाली आहे. त्यांची भविष्यवाणी जर सत्यात उतरली तर येणारं वर्षही संकटांनी भरलेलं असण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aliens, New year, Rain flood, Virus