मुंबई 18 जानेवारी : देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरात सध्या लगीनघाई सुरू आहे. मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांनी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचे लग्न गुजरातमधील उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंटशी ठरवले आहे. ईशा अंबानी आणि आकाश अंबानी यांच्या ग्रॅण्ड वेडिंगनंतर आता अनंत अंबानीचा विवाह संमारंभ कसा पार पडाणार याकडे अनेकांच लक्ष आहे. आता हे उद्योगपती घराण्यातील जोडपं लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. त्यासाठी अंबानी आणि मर्चंट दोन्ही घरांमध्ये जोरदार तायरी सुरु आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची एंगेजमेंट गुरुवारी 19 जानेवारी रोजी होणार आहे. या समारंभासाठी येणाऱ्या पाहुण्यांना भारतीय फेस्टिव्हलच्या पोशाखात येण्यास सांगण्यात आले आहे. मंगळवारी नववधूंच्या मेहंदी समारंभाने या उत्सवाला सुरुवात झाली आहे. या मेहंदी समारंभाचे काही फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले आहेत.
थाटात पार पडला मेहंदी समारंभ
सोशल मीडियावर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या मेहंदी समारंभाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यात मुकेश अंबानी यांची होणारी धाकटी सून फारच सुंदर दिसत आहे. या समारंभासाठी राधिकाने गुलाबी रंगाचा हटके डिझायनर लेहेंगा परिधान केला होता. हा कस्टम-मेड लेहंगा प्रसिद्ध डिझायनर जोडी अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाईन केला होता. या लेहंग्यासोबत राधिकाने सुंदर अशी डायमंड ज्वेलरी परिधान केली होती. या लुकमध्ये राधिकाचं सौंदर्य अगदी खुलून आलं होतं. तिचे केस आणि मेकअप आरती नायरने केला होता.
गुरुवारी 'गोल धना' संमारंभ
मेहंदी फेस्टिव्हलनंतर दोन दिवसांनी म्हणजेच गुरुवारी संध्याकाळी 78 वाजता मुंबईतील अल्टामाऊंट रोडवरील अँटिलिया येथे भव्य “गोल धना” समारंभ होणार आहे. "गोल धना" हा पारंपारिक गुजराती एंगेजमेंट समारंभ आहे. या समारंभात आलेल्या पाहुण्यांना धणे आणि गूळ वाटले जातात.
कोण आहे राधिका मर्चंट?
राधिका मर्चंट ही एन्कोर हेल्थकेअरचे प्रमुख वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे आणि ती एनकोर हेल्थकेअरच्या बोर्डावर संचालक म्हणून काम करते. राधिकानं न्यूयॉर्क विद्यापीठाची पदवी संपादन केली आहे. ती एक उत्तम नृत्यांगना देखील आहे. अंबानी कुटुंबात नीता अंबानी यांच्यानंतर राधिका ही दुसरी व्यक्ती आहे, जिने भरतनाट्यम नृत्यप्रकारात अरंगेत्रम केलं आहे. ती मागील 8 वर्षांपासून गुरू भावना ठाकर यांच्याकडे नृत्याचे प्रशिक्षण घेत होती.
एकमेकांना डेट करत होते अनंत-राधिका
राधिका आणि अनंत अंबानी अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. गेल्या काही महिन्यांपासून ते एकमेकांना डेट करत होते. या जोडप्याचा रोका सोहळा 29 डिसेंबर रोजी राजस्थानच्या नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरात पार पडला. या समारंभात अनेक बॉलिवूड कलाकार, उद्योगपती आणि विविध क्षेत्रातील पाहूने उपस्थित होते.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anant Ambani, Anant Ambani Wedding, Lifestyle, Radhika Merchant