वॉशिंग्टन, 04 नोव्हेंबर : जगभरात कोरोनाव्हायरसची लस (corona vaccine) सुरू करण्याचं काम सुरू आहे. काही मोजक्या लशी मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. पुढील वर्षापर्यंत लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र कोरोनादेखील आपलं रूप बदलतो आहे, त्यामुळे बदलत्या व्हायरसवर या लशी किती प्रभावी ठरतील माहिती नाही. त्यामुळे कोरोनाचं बदलतं रूप हे एक आव्हानच आहे. मात्र आता कोरोनाच्या या बदलत्या रूपालाही घाबरण्याची किंवा चिंता करण्याची गरज नाही. कारण आता कोरोनाच्या प्रत्येक रूपाशी लढेल अशी कोरोना लसही तयार झाली आहे. कोरोनाव्हायरसच्या प्रत्येक स्ट्रेनवर प्रभावी अशी नॅनोपार्टिकल कोरोना लस (nanoparticle corona vaccine)विकसित करण्यात आली आहे. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसीन रिसर्चने (University of Washington) ही लस विकसित केली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार या लशीची प्राण्यांवर चाचणी झाली आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहे. ही लस जास्तीत जास्त अँटिबॉडीज तयार करत असल्याचं आणि जास्त कालावधी सुरक्षा देत असल्याचं दिसून आलं आहे. सेल जर्नलमध्ये (journal Cell) हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. उंदरामध्ये या लशीचा प्रयोग केला असता कोरोनामुक्त रुग्णांच्या शरीरात जितक्या अँटिबॉडीज तयार होतात त्यापेक्षा जास्त अँटिबॉडीज तयार होत असल्याचं दिसून आलं. उंदरामध्ये लशीचा डोस सहापट कमी करूनदेखील पाहण्यात आला. त्यावेळीदेखील दहापट अधिक न्यूट्रलाइझिंग अँटिबॉडीज तयार झाल्या. याशिवाय मजबूत असं बी-सेल इम्युन रिस्पॉन्सदेखील दिसून आला. यामुळे ही लस जास्तीत जास्त कालावधीसाठी परिणाम देईल, अशी आशा आहे. हे वाचा - रोगप्रतिकारक शक्तीसाठी अति काढा पिणंही हानीकारक; किती असावं प्रमाण जाणून घ्या माकडावर केलेल्या प्रयोगात दिसून आलं, शरीरात तयार झालेल्या अँटिबॉडीजनं कोरोनाव्हायरसच्या स्पाइक प्रोटिनवर हल्ला केला. या प्रोटिनमार्फत व्हायरस मानवी पेशीत घुसतो. तज्ज्ञांच्या मते ही लस व्हायरसचं म्युटेड स्ट्रेन म्हणजे बदलत्या रूपापासूनही सुरक्षा देऊ शकतो. अभ्यासानुसार या लशीचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर व्हायरसची प्रतिकृती करत, ज्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. या लशीसाठी व्हायरसच्या स्पाइक प्रोटिनचा वापर करण्यात आला नाही आहे. संशोधकांनी या लशीसाठी स्ट्रक्चर बेस्ड लस डिझाइन टेक्निक्सचा वापर केला. ज्यामुळे ही लस स्वतच असं प्रोटिन तयार करेल जे हुबेहुब व्हायरससारखं असेल. ही लस स्पाइक प्रोटिनच्या रिसेप्ट बायंडिंग डोमेनची 60 टक्के भागाची नकल करते, असं संशोधकांनी सांगतिलं. हे वाचा - मानलं राव यांना! नागरिकांची भीती घालवण्यासाठी पंतप्रधानांनीच घेतली COVID-19ची लस संशोधनाचे अभ्यास नील किंग यांनी सांगितलं, नॅनो पार्टिकल मार्फत कोरोना महासाथीशी लढण्यास मदत मिळेल अशी आशा आम्हाला आहे. आता लवकरच या लशीचं मानवांवरही प्रयोग होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.