मुंबई, 19 फेब्रुवारी: गेल्यावर्षी जून महिन्यात पूर्व लडाखमध्ये असणाऱ्या गलवान खोऱ्यात (Galwan Valley) भारतीय लष्कराबरोबच्या चकमकीत आमचे 5 जवान आणि अधिकारी मारले गेल्याचं चीनने अखेर मान्य केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार चीनच्या लष्कराच्या पीएलए डेली (PLA Daily) या अधिकृत वृत्तपत्राचा दाखला देत चीनमधील सरकारी वृत्तपत्राने याबाबत माहिती छापली आहे. सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने पहिल्यांदाच या सैनिकांची नाव छापली आहेत. त्यांचा उल्लेख या वर्तमानपत्राने प्राणांची आहुती देणारे सैनिक असा केला आहे.
पीएलए डेलीमध्ये छापण्यात आलेल्या माहितीनुसार जे अधिकारी आणि जवान मारले गेले ते चीनच्या ताब्यात असणाऱ्या काराकोरम पर्वतरांगांमध्ये तैनात होते. यात असेही म्हटलं आहे की, चीनचे रेजिमंट कमांडर कुई फाबाओ यांना देखील भारतीय लष्कराकडून मारण्यात आलं आहे. भारतीय लष्कराचे कर्नल संतोष बाबू यांच्यासह 20 जवानांनी यामध्ये त्यांच्या प्राणांची आहुती दिली होती.
चीनने त्यांचे 5 अधिकारी आणि जवान मारले गेल्याचे असे म्हटले असले तरी याआधी काही आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार चिनी सैन्याची अधिक हानी झाली आहे. (हे वाचा- Corona Vaccine : ‘ही’ ठरली लसीकरण झालेली जगातील पहिली क्रिकेट टीम! ) गेल्यावर्षी चीन आणि भारतादरम्यान सीमारेषेवर अत्यंत तणावाचं वातावरण होतं. 15 जूनला झालेली झटापट गेल्या चार दशकातील भारत-चीनमधील सर्वात मोठा संघर्ष असल्याचं बोललं जातं. भारताने 20 सैनिक मारल्याचे जाहीर केले होते, पण चीनने याआधी कोणताही जवान मारला गेल्याचे मान्य केले नव्हते. दरम्यान भारताकडून दावा करण्यात आला होता की, चीनचे यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. TASS या रशियन वृत्तसंस्थेने तर चीनचे 45 जवान मारले गेल्याचे म्हटले आहे. दरम्यान सध्या पँगाँग लेक परिसरातून भारत आणि चीन या दोन्ही देशांनी सैन्य माघारी घेण्यास सुरुवात केल्याची देखील माहिती समोर आली आहे.