नवी दिल्ली, 22 सप्टेंबर : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे बुधवारी निधन झाले. गेल्या महिन्यात जिम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि तब्बल 41 दिवस रुग्णालयात उपचार करूनही त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. अलीकडच्या काळात, बॉलिवूड गायक केके, टीव्ही अभिनेता दीपेश भान, कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार, अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचा हार्ट अटॅक, कार्डियक अरेस्ट आणि पक्षाघाताने मृत्यू झाला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सर्व स्टार्स त्यांच्या उत्कृष्ट फिटनेससाठी चर्चेत असत. त्यामुळे अनेकांना असा प्रश्न पडलाय की, हे लोक फिट असूनही त्यांना हृदयविकाराचा झटका येतो आणि त्यांचा मृत्यू कसा काय होतो? याचं उत्तर हृदयरोग तज्ज्ञांकडून जाणून घेऊया. या प्रश्नावर तज्ञांचे मत काय आहे? अपोलो हॉस्पिटल, नवी दिल्लीच्या कार्डिओलॉजिस्ट डॉ. वनिता अरोरा म्हणतात की, हृदय निरोगी ठेवण्यासाठी फक्त शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे पुरेसे नाही. हृदयविकार टाळण्यासाठी मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे देखील खूप महत्त्वाचे आहे. सर्व सेलिब्रिटी स्वत:ला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करतात. कधी ते जिममध्ये जाऊन व्यायाम करतात तर कधी इतर पुरेशा प्रमाणात शारीरिक हालचाली करताना दिसतात. मात्र, परफॉर्मन्स, स्पर्धा, फॅशन, प्रोजेक्ट, लुक इत्यादींविषयी ते अनेक गोष्टींबाबत नेहमीच तणावात असू शकतात. अनेक सेलिब्रिटी ड्रग्ज, दारू आणि स्मोकिंगही खूप करतात. या सर्व गोष्टींचा हृदयावर वाईट परिणाम होतो. यामुळे त्यांना हृदयविकाराचा धोका वाढतो. हेे वाचा - मूळव्याधीवर रामबाण घरगुती उपाय; औषधांचीही गरज पडणार नाही हृदयविकाराचा फिटनेसशी संबंध - जे लोक तंदुरुस्त आणि निरोगी राहतात त्यांना आजार होण्याची शक्यता कमी असते, असे अनेकदा म्हटले जाते. यावर डॉ.वनिता अरोरा सांगतात की, सेलिब्रिटी फिजिकल फिटनेसकडे जास्त लक्ष देतात, पण मानसिक आजाराला बळी पडतात. त्यांच्याकडे सर्व संसाधने उपलब्ध असतात आणि त्यांचा आहारही खूप चांगला असतो, यात शंका नाही. या सर्व गोष्टींशिवाय मानसिक स्वास्थ्य त्यांच्या जीवनाचा शत्रू बनतो. मिडनाईट पार्टी, स्मोकिंग, मद्यपान, ड्रग्ज, खराब जीवनशैली यासारख्या घटकांमुळे सेलिब्रिटींच्या हृदयाचे आरोग्य बिघडते. हे वाचा - तुम्ही तुमच्या तेलकट त्वचेला वैतागलात का? लगेच ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय हे देखील मोठे घटक असू शकतात - हृदयरोग तज्ज्ञांच्या मते, बहुतेक सेलिब्रिटी त्यांच्या लूकबद्दल खूप गंभीर असतात. ते वजन कमी करण्यासाठी अनेक तंत्रांचा अवलंब करतात आणि काही इंजेक्शन्स देखील वापरतात. बॉडी शेप, पिळदास मसल्स करण्यासाठी काही सप्लिमेंट्स वापरल्याने हृदयविकाराचा धोका सर्वाधिक वाढतो. हे देखील काही मोठे घटक आहेत जे सेलिब्रिटींच्या हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. केवळ सेलिब्रिटींनीच नाही तर सर्वसामान्यांनीही या सर्व गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून असे धोके टाळता येतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.