मराठी बातम्या /बातम्या /heatlh /भारतीय कफ सिरपमुळे उझबेकिस्तानमधील 19 बालकांचा गेला जीव? WHO कडून त्या औषधावर अलर्ट

भारतीय कफ सिरपमुळे उझबेकिस्तानमधील 19 बालकांचा गेला जीव? WHO कडून त्या औषधावर अलर्ट

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

सर्दी-खोकला ही लहान मुलांमध्ये दिसणारी सामान्य समस्या आहे. बहुतेक लहान मुलांना वारंवार सर्दी-खोकला होत असल्याचं तुम्ही बघितलं असेल.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  नवी दिल्ली, 12 जानेवारी : सर्दी-खोकला ही लहान मुलांमध्ये दिसणारी सामान्य समस्या आहे. बहुतेक लहान मुलांना वारंवार सर्दी-खोकला होत असल्याचं तुम्ही बघितलं असेल. परिणामी अशा मुलांचे पालक घरामध्ये एखादं कफ सिरप कायम ठेवतात. मात्र, हेच कफ सिरप जीवघेणं ठरलं तर? जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्ल्यूएचओ) केलेल्या दाव्यानुसार, भारतीय कंपनीनं तयार केलेल्या कफ सिरपमुळे उझबेकिस्तानमध्ये 19 बालकांचा मृत्यू झाला आहे. डब्ल्यूएचओनं निवेदन दिलं आहे की, नोएडामधील मॅरियन बायोटेक या कंपनीनं बनवलेल्या दोन कफ सिरपचा उझबेकिस्तानमधील बालकांच्या मृत्यूशी संबंध आहे. त्यामुळे नागरिकांनी या औषधांचा वापर करू नये. ‘इंडिया टुडे’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

  गेल्या वर्षी (2022) डिसेंबर महिन्यामध्ये उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयानं दावा केला होता की, एका भारतीय औषध कंपनीनं उत्पादित केलेल्या औषधांचं सेवन केल्याने देशात 18 बालकांनी आपला जीव गमावला आहे. त्यानंतर डब्ल्यूएचओनं या प्रकरणात लक्ष घातलं होतं.

  आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, "अँब्रोनॉल सिरप आणि DOK-1 मॅक्स सिरप ही दोन उत्पादनं संशयास्पद आहेत. दोन्ही उत्पादनांची निर्माती मॅरियन बायोटेक (उत्तर प्रदेश, भारत) या कंपनीनं केलेली आहे. प्रयोगशाळेत केलेल्या विश्लेषणात दोन्ही उत्पादनांमध्ये अस्वीकार्य प्रमाणात डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन आढळून आलं आहे."

  हे ही वाचा : थंडीत का वाढतो अस्थमा अटॅकचा धोका? बचावासाठी या गोष्टींची नक्की घ्या काळजी

  मेडिकल अलर्टमध्ये डब्ल्यूएचओनं म्हटलं आहे की, उझबेकिस्ताननं 22 डिसेंबर 2022 रोजी 19 बालकांच्या मृत्यूबाबत आमच्याकडे तक्रार केली होती. भारतामध्ये तयार झालेल्या कफ सिरपबद्दल आक्षेप नोंदवण्यात आला होता. मॅरियन बायोटेकनं उत्पादित केलेली दोन्ही 'सबस्टँडर्ड' औषध गुणवत्ता मानकं किंवा वैशिष्ट्यांची पूर्तता करण्यात अयशस्वी ठरली आहेत. त्यामुळे ती वापरण्यास योग्य नाहीत, असं तपासात समोर आलं आहे.

  "ही निकृष्ट उत्पादनं वापरण्यासाठी असुरक्षित आहेत. विशेषत: मुलांसाठी त्यांचा वापर केल्यास गंभीर इजा किंवा मृत्यू होऊ शकतो. या दोन्ही उत्पादनांना इतर देशांमध्ये मार्केटिंग परवाना असू शकतो किंवा ते अनौपचारिकपणे इतर देशांना किंवा प्रदेशांमध्ये वितरित केले जाण्याची शक्यता आहे," असंही मेडिकल अलर्टमध्ये म्हटलं आहे.

  उत्तर प्रदेश अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभागानं उझबेकिस्तानमधील 19 मुलांच्या मृत्यूशी संबंधित असलेल्या मॅरियन बायोटेक कंपनीचा उत्पादन परवाना रद्द केला आहे. गौतम बुद्धनगरचे ड्रग इन्स्पेक्टर वैभव बब्बर म्हणाले, "पुरेशी कागदपत्रं सादर न केल्यानं आम्ही मॅरियन बायोटेक कंपनीचा उत्पादन परवाना निलंबित केला आहे. तपासणीदरम्यान कंपनीकडे काही कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती. राज्य परवाना प्राधिकरणानं कंपनीला कारणं दाखवा नोटीसदेखील बजावली होती. कंपनीनं त्यांची पूर्तता केली नाही."

  हे ही वाचा : सर्वच गाठी ब्रेस्ट कॅन्सरच्या नसतात! पाहा कॅन्सरयुक्त आणि नॉन कॅन्सर गाठीतील फरक

  डब्ल्यूएचओनं या पूर्वीदेखील भारतातील कफ सिरपवर कारवाई केलेली आहे. ऑक्टोबर 2022मध्ये मेडेन फार्मा या भारतीय औषध निर्मात्या कंपनीनं तयार केलेल्या चार कफ सिरपवर कारवाई झालेली आहे. या कफ सिरपमुळे आफ्रिका खंडातील गांबिया देशात 66 बालकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता.

  WHO India Uzbekisthan : भारतीय औषधांमुळे उझबेकिस्तानमध्ये 19 बालकांचा मृत्यू? WHO चा भारतावर आरोप

  First published:

  Tags: India, Who