मुंबई, 11 जानेवारी : हिवाळा हा हंगाम गुलाबी थंडाचा असला तरी या ऋतूत अनेक आजारांचा धोका वाढतो. हिवाळ्यात अनेक संसर्गजन्य आजारांसोबत दम्याची समस्या देखील उद्भवते. थंडीचे आगमन होताच दम्याच्या रुग्णांची संख्याही वाढू लागते. दमा हा एक श्वासोच्छवासाचा आजार आहे ज्यामध्ये वायुमार्गात सूज आल्याने व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे हिवाळा हा दम्याच्या रुग्णांसाठी थोडा त्रासदायक असतो.
वेबएमडीच्या बातमीनुसार, थंड वातावरणात वायुमार्ग अरुंद झाल्यामुळे आणि प्रदूषणामुळे दम्याचा झटका येण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. दम्याची लक्षणे वाढण्यामागे आपली कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती देखील एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणारी जीवनशैली आपण अंगीकारणे गरजेचे आहे. थंडीमुळे श्वासनलिका अरुंद झाल्यामुळे आणि सतत धुक्याच्या संपर्कात राहिल्याने दम्याच्या रुग्णांचा त्रास खूप वाढतो.
सर्वच गाठी ब्रेस्ट कॅन्सरच्या नसतात! पाहा कॅन्सरयुक्त आणि नॉन कॅन्सर गाठीतील फरक
आरोग्य तज्ज्ञांनुसार, दम्याची समस्या कोणत्याही वयात उद्भवू शकते. परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये ती लहानपणापासूनच सुरू होते. सामान्यतः हा आयुष्यभराचा आजार असतो. तो फक्त औषध आणि इनहेलरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात नियंत्रित केला जाऊ शकतो. लहान मुलामध्ये आणि प्रौढांमध्ये या रोगाची लक्षणे जवळजवळ समान असतात.
दम्याची मुख्य लक्षणे
- सतत खोकला येणे
- बराच काळ सर्दी राहणे
- एकाच वेळी अनेक शिंका येणे
- किरकोळ श्रम करताना श्वास लागणे
- श्वास घेताना शिट्टीसारखा आवाज येणे
- छातीत घट्टपणा जाणवणे
- भीती वाटणे
दम्याच्या समस्येची कारणे
- थंड हवेच्या संपर्क येणे
- धुके, धूर, धूळ, प्रदूषणाच्या संपर्कात येणे
- बंद घरात राहणाऱ्या पाळीव कुत्रे आणि मांजरांच्या केसांमुळेही दम्याची लक्षणे वाढतात.
- फ्रीजमध्ये ठेवलेले थंड पदार्थ वापरणे
हिवाळ्यात दमा कसा टाळावा
उबदार कपडे घाला : हिवाळ्यात दमा आणि सायनसच्या रुग्णांना अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक असते. दम्याचा अटॅक टाळण्यासाठी उबदार किंवा लोकरीचे कपडे घालावेत. थंड वारे याची लक्षणे वाढवू शकतात. त्यामुळे तुमचे शरीर उबदार ठेवावे.
धुरापासून दूर राहा : हिवाळ्यात धुरामुळे अस्थमाच्या रुग्णांच्या समस्या वाढतात. त्यामुळे सायनस आणि अस्थमाच्या रुग्णांनी धुरापासून दूर राहावे. यासोबतच धुळीपासून संरक्षण करणेही खूप गरजेचे आहे.
अल्कोहोल, सिगारेटपासून दूर राहा : अस्थमा आणि सायनसच्या रुग्णांसाठी दारू आणि धूम्रपान दोन्ही अत्यंत घातक आहेत. धुम्रपानामुळे फुफ्फुसे कमकुवत होतात आणि दम्याच्या रुग्णांचा त्रास वाढू शकतो. म्हणूनच या सवयी बदलणे आवश्यक आहे.
कोमट पाणी प्या : हिवाळ्यात खोकला आणि सर्दीची समस्या वाढते. ही समस्या अनेक दिवस राहिल्यास त्याचे रूपांतर दम्यामध्ये होऊ शकते. त्यामुळे हिवाळ्यात सतत कोमट पाणी प्यायला हवे. फुफ्फुसातील श्लेष्माची समस्या देखील कोमट पाण्याने दूर होते.
सर्व्हायकल कॅन्सर आहे महिलांच्या मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण, गर्भाशय निरोगी ठेवण्यासाठी खा हे पदार्थ
नाकाने श्वास घ्या : बरेच लोक तोंडाने श्वास घेतात ज्यामुळे दम्याचा त्रास होतो. तुम्ही तुमच्या तोंडातून श्वास घेत असाल तर जास्त थंड हवा तुमच्या श्वसनमार्गामध्ये प्रवेश करते आणि त्यामुळे श्वास घेण्याचा मार्ग बंद होतो. थंड हवा तुमच्या फुफ्फुसापर्यंत पोहोचते आणि त्यामुळे दम्याचा झटका येण्याची शक्यताही वाढते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle, Winter