मुंबई, 27 जानेवारी : अबॉर्शन म्हणजे गर्भपात याचा अर्थ गर्भधारणेची समाप्ती. अल्ट्रासाउंड तपासणीनंतर गर्भामध्ये काही अॅबनॉरमॅलिटी असल्याचं आढळल्यास किंवा आईच्या प्रकृतीला धोका असल्यास अॅबॉर्शन वैद्यकीयदृष्ट्या केलं जातं. त्याव्यतिरिक्त संबंधित महिला किंवा दाम्पत्याच्या विनंतीवरूनही अॅबॉर्शन केलं जातं. प्रतिबंधक साधनं अपयशी ठरल्याने गर्भधारणा झाली असल्यास किंवा अन्य काही सामाजिक कारणांमुळे अॅबॉर्शनची मागणी संबंधित महिला किंवा दाम्पत्याकडून केली जाऊ शकते.
अॅबॉर्शन ही स्त्री-रोगतज्ज्ञांकडून वैद्यकीय सोयीसुविधा असलेल्या ठिकाणी केली जाणारी सर्वसाधारण प्रक्रिया आहे आणि ती बहुतांशी सुरक्षित आहे; मात्र असुरक्षित परिस्थितीत ही प्रक्रिया केल्यास महिलेच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो. दर वर्षी जगभरात सुमारे 25 दशलक्ष अॅबॉर्शन्स असुरक्षितरीत्या केली जातात. त्यामुळे संबंधित महिलांचा मृत्यू होण्याचं किंवा त्यांना वेगवेगळे आजार होण्याचं ते एक प्रमुख कारण आहे. भारतात करण्यात आलेल्या अभ्यासापैकी 67 टक्के अॅबॉर्शन्स असुरक्षित होती. वेगवेगळ्या राज्यांत हे प्रमाण वेगवेगळं आहे. भारतातल्या दुर्बल आणि अभावग्रस्त लोकसंख्येत हे प्रमाण खूप जास्त आहे. 15 ते 19 वर्षं वयोगटातल्या तरुणी अॅबॉर्शनशी निगडित गुंतागुंतीमुळे मरण पावण्याचा धोकाही सर्वांत जास्त आहे. त्यामुळे देशातल्या सर्व शहरी आणि ग्रामीण भागांतल्या महिलांना अॅबॉर्शनशी संबंधित काळजी घेण्यामध्ये येणारे अडथळे समजून घेण्याची आणि त्यात सुधारणा करण्याची तातडीची गरज आहे.
हे वाचा - Pregnancy Test : गर्भातील बाळावरही करता येतात उपचार; फीटल मेडिसीनबाबत तुम्हाला माहिती आहे का?
अॅबॉर्शन गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत (4-13 आठवडे) किंवा दुसऱ्या तिमाहीत (13 ते 24 आठवडे) केलं जाऊ शकतं. गर्भधारणा जितकी जास्त आठवड्यांची असेल, तितकं गर्भपातात गुंतागुंत निर्माण होण्याचं प्रमाण जास्त असतं. वैद्यकीय घटक, तसंच महिलेची इच्छा यानुसार गर्भपात मेडिकली किंवा सर्जिकली केला जाऊ शकतो. अतिरिक्त रक्तस्राव, गर्भाचे काही अंश शरीरात राहणं आणि गर्भाशयाला दुखापत होणं अशा तीन प्रकारची गुंतागुंत गर्भपातात होणं शक्य आहे. गर्भाशयाच्या बाहेरच्या बाजूला गर्भधारणा झाली असेल, तर त्याला Ectopic Pregnancy असं म्हणतात. गर्भपात करण्यापूर्वी संबंधित महिलेला झालेली गर्भधारणा Ectopic नाही याची खात्री केली पाहिजे.
तातडीची काळजी
गर्भपाताची प्रक्रिया सर्वसाधारणपणे डे-केअर स्वरूपात केली जाते. गर्भपात केल्यानंतर संबंधित महिलेला रक्तस्राव होत आहे का, वेदना आहेत का किंवा संसर्गाची काही लक्षणं दिसत आहेत का, हे पाहण्यासाठी तिला निरीक्षणाखाली ठेवलं जातं. तिची प्रकृती चांगली असेल आणि त्रास होत नसेल, तर तिला त्याच दिवशी घरी सोडलं जातं.
पेनकिलर्स आणि अँटीबायोटिक्सचा कोर्सही डिस्चार्जच्या वेळी दिला जातो. संसर्ग टाळण्यासाठी अँटीबायोटिक्सचा कोर्स न चुकता पूर्ण करणं आवश्यक असतं. संबंधित महिलेचा रक्तगट निगेटिव्ह असेल, तर अँटी-डी इंजेक्शनची गरज भासू शकते.
घरी घ्यायची काळजी
गर्भपातानंतर महिलेने विश्रांती घेणं गरजेचं असतं. गर्भधारणा किती आठवड्यांची होती यावर गर्भपातानंतर किती दिवस विश्रांती घ्यावी लागेल हे अवलंबून असतं. अतिरिक्त रक्तस्रावासारखी काही परिस्थिती उद्भवली असेल, तर दीर्घ काळ विश्रांती घ्यावी लागू शकते. पहिल्या तिमाहीत गर्भपात करण्यात आला असेल, तर नेहमीच्या अॅक्टिव्हिटीज अगदी दुसऱ्या दिवशीही सुरू करता येऊ शकतात.
मेडिकल किंवा सर्जिकल प्रक्रियेनंतर काही आठवडे वेदना असू शकतात. ते गोळा येण्यासारखं असतं. तोंडावाटे पेनकिलर्स घेतल्यास त्यापासून आराम पडू शकतो.
गर्भपातानंतर चार आठवड्यांपर्यंत रक्तस्राव होऊ शकतो; मात्र बहुतांश केसेसेमध्ये आठवड्याभरासाठी रक्तस्राव चालू-बंद होऊ शकतो. या कालावधीत संबंधित महिलांनी मेन्स्ट्रुअल कप्स किंवा टॅम्पॉन्सपेक्षा सॅनिटरी पॅड्स वापरण्याची शिफारस केली जाते.
हे वाचा - Pregnancy tips : अशा पद्धतीने करा प्रेग्नन्सी प्लॅनिंग; नैसर्गिक गर्भधारणेत अडचणी येणार नाहीत
गर्भधारणेची लक्षणांची तीव्रता साधारणतः 2-3 दिवसांत कमी होऊ लागते.
रेड फ्लॅग साइन्स अँड सिम्प्टम्स (धोक्याची लक्षणं) :
काही धोक्याची लक्षणं दिसली, तर महिलेने तातडीने त्याबद्दल डॉक्टरना माहिती दिली पाहिजे. 100 अंश फॅरनहाइटपेक्षा जास्त ताप, पोटात दुखणं, विचित्र दुर्गंधी अशी संसर्गाची लक्षणं दिसत आहेत का यावर बारीक लक्ष ठेवावं. गुठळ्यांसह प्रचंड रक्तस्राव होणं आणि चक्कर आल्यासारखं वाटणं अशी लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.
गर्भपातानंतर संबंधित महिलेला मूड डिस्टर्बन्स होण्याचा त्रास होणं शक्य आहे. त्याची तीव्रता जास्त असल्यास तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे.
पुढच्या गर्भधारणेचं काय?
मेडिकल किंवा सर्जिकल यांपैकी कोणत्याही प्रकारचा गर्भपात सुरक्षितपणे करण्यात आला, तर पुन्हा गर्भधारणा होण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही; मात्र संसर्ग किंवा गर्भाचे अंश शरीरात राहणं किंवा गर्भाशयाला दुखापत होणं यांपैकी काही झाल्यास पुन्हा गर्भधारणा होण्याच्या क्षमतेवर दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे योग्य पर्यवेक्षणाखाली ही प्रक्रिया सुरक्षितपणे पार पडणं गरजेचं आहे.
संततिनियमन/गर्भनिरोध
गर्भपातानंतरच्या फॉलो-अपमध्ये काँट्रासेप्शन अर्थात संततिनियमन म्हणजेच गर्भनिरोधक साधनांचा वापर यांविषयी चर्चा झाली पाहिजे, जेणेकरून मूल नको असताना गर्भधारणा होणार नाही. गर्भपात सर्जिकली केल्यास दीर्घ काळ कार्यरत राहणारं रिव्हर्सिबल इंट्रायुटेराइन डिव्हाइस त्याच वेळी बसवता येतं. तसं नसेल, तर गर्भपातानंतर 4-6 आठवड्यांनी जेव्हा सारं काही पूर्ववत होईल, तेव्हा याबद्दल चर्चा होऊ शकते.
प्रशिक्षित वैद्यकीय व्यावसायिकाच्या पर्यवेक्षणाखाली सुरक्षितरीत्या गर्भपात केल्यास आणि गर्भपातानंतर योग्य ती काळजी घेतल्यास संबंधित महिलेची प्रकृती लवकर आणि पूर्णपणे सुधारण्यास मदत होते. तसंच तिचं पुढच्या आयुष्यातलं आरोग्य आणि गर्भधारणा यांमध्ये कोणतीही दीर्घकालीन जोखीम राहत नाही.
लेखक : डॉ. अरुणा मुरलीधर, सीनिअर कन्सल्टंट ऑब्स्टेट्रिशियन अँड गायनॅकॉलॉजिस्ट, ओबीजीवायएन, फोर्टिस हॉस्पिटल, रिचमंड रोड, बेंगळुरू
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.