मुंबई, 27 जानेवारी : मातृत्व ही आनंददायक भावना असते; मात्र मातृत्व वाट्याला येणं सोपं नसतं. सध्याच्या जीवनशैलीत गर्भधारणेमध्ये अनेक अडचणी येताना दिसतात. वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक गोष्टी सोप्या झाल्या असल्या, तरी जीवनशैलीमुळे झालेले बदल त्यात अडचणींची वाढच करत आहेत. गर्भधारणा अपघाताने नव्हे, तर नियोजनपूर्वक झाली पाहिजे, असं आयुर्वेद सांगतो. हे नियोजन करताना काही काही टिप्स निश्चित उपयोगी पडू शकतात.
सध्याच्या जीवनशैलीमुळे नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्यात समस्या येतात. त्यातून जोडप्यांमध्ये वाद, निराशा निर्माण होते. याने समस्या आणखी वाढतात. यासाठी गर्भधारणेबाबत विचारपूर्वक नियोजन करणं गरजेचं असतं. आहारविहार व दिनक्रमामध्ये योग्य ते बदल केल्यास शरीरातल्या दोषांचं नियमन होऊन नैसर्गिक गर्भधारणेला चालना मिळू शकते.
- लवकर झोपून लवकर उठावं असं आयुर्वेद सांगतो. गर्भधारणेचा विचार करत असाल, तर हे निश्चित उपयोगी पडेल. यामुळे शरीरातले दोष आणि संप्रेरकं संतुलित राहतात. किती तास झोप घेता यापेक्षा झोप कशी आहे व सकाळी किती वाजता उठता यावर शरीराच्या चयापचयाचं चक्र अवलंबून असतं. रात्री 10 वाजता झोपून सकाळी 6 वाजता उठणं नेहमीच फायदेशीर ठरू शकतं.
हे वाचा - Bija Sanskar : गर्भधारणेपूर्वी दाम्पत्याने नक्की करावे शरीर शुद्धीकरण; आयुर्वेदानुसार आहेत हे फायदे
- व्यायाम शरीरासोबतच मनालाही ताजतवानं ठेवतो. गर्भधारणेसाठी ओटीपोटाचे व्यायाम करणं हिताचं असतं. त्याचबरोबर योगासनं, मेडिटेशन, प्राणायाम हेही आवर्जून करावं. त्यामुळे मन एकाग्र व शांत होतं. ओटीपोटाच्या व्यायामांमुळे त्या भागातील रक्ताभिसरण वाढतं व बीजाची वाढही सुदृढपणे होते.
- घरचं ताजं अन्न हे शरीरासाठी कायमच पौष्टिक असतं. गर्भधारणेचा विचार करत असाल, तर रिफाईन्ड कर्बोदकं, ट्रान्सफॅट आणि भरपूर तेलात तळलेले पदार्थ खाणं टाळा.
- गर्भधारणेसाठी दोन्ही जोडीदारांमध्ये प्रेमाचं नातं असणं जरूरीचं आहे. त्यासाठी मन प्रसन्न ठेवणं, सकारात्मक राहणं फायदेशीर ठरतं. नैसर्गिक गर्भधारणेसाठी मन शांत आणि आनंदी असणं खूप महत्त्वाचं असतं, असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. त्यासाठी चांगला विचार करणं, आनंदी राहणं गरजेचं असतं.
- लठ्ठपणा हा नैसर्गिक गर्भधारणेत अडसर ठरू शकतो. त्यामुळेच गर्भधारणेचा विचार करत असलात, तर वजन कमी केलं पाहिजे. कमी वजन असलेल्या व्यक्तींनाही गर्भधारणेत समस्या येऊ शकतात. त्यामुळे सुदृढ शरीराच्या दृष्टीने वजन योग्य असणं गरजेचं असतं.
हे वाचा - Calcium In Pregnancy : प्रेग्नन्सीमध्ये कॅल्शियम आवश्यक! पण दिवसभरात किती प्रमाणात घेणे सुरक्षित?
- अनेक शारीरिक समस्या जेवणाच्या वेळा न पाळल्यामुळे उद्भवतात. गर्भधारणेसाठी वेळेवर व पुरेसा आहार घेणं महत्त्वाचं असतं. रात्रीचं जेवण शक्यतो झोपण्याच्या 3 तास आधी घ्यावं.
- गर्भधारणेचा विचार असेल, तर किमान 6 महिने दारू, सिगारेट व कॅफेनयुक्त पेय घेऊ नयेत. यामुळे नैसर्गिक गर्भधारणेतल्या अडचणी कमी होतील.
सध्याच्या जीवनशैलीचा विचार केल्यास नियोजनपूर्क गर्भधारणेचा विचार करणं हिताचं ठरेल. आयुर्वेदही तसंच सांगतो. त्यामुळे नैसर्गिक गर्भधारणा अधिक सोपी व सहज होऊ शकते.
लेखिका - डॉ. रेश्मा एम ए. आयुर्वेदिक गायनोकोलॉजिस्ट अँड फर्टिलिटी स्पेशालिस्ट, बीटीएम लेआऊट, बंगळुरू.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Lifestyle, Pregnancy, Pregnant woman, Woman