नवी दिल्ली, 12 जानेवारी : कोविडचा (corona) नवीन व्हेरियंट ओमायक्रॉन (Omicron) भारतासह जगभरात वेगाने पसरत (spreading rapidly) आहे. कोरोनाचा हा व्हेरियंट फारसा जीवघेणा नाही, असा दावा तज्ज्ञांकडून वारंवार केला जातोय. मात्र, आरोग्यतज्ज्ञ (health experts) अद्याप या संसर्गाबाबत कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचलेले नाहीत. शास्त्रज्ञ यावर सतत संशोधन करत आहेत. ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव पाहता डॉक्टर सतत आवाहन करत आहेत की, ‘तुम्ही या व्हायरसचा संसर्ग होऊ नये, यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करा.’ त्यातच मसिना हॉस्पिटलमधील (Masina Hospital) पल्मनॉलॉजिस्ट आणि ब्रॉन्कोस्कोपिस्ट सल्लागार डॉ. सोनम सोळंकी यांनी ओमायक्रॉन व्हेरियंटची लक्षणं (Omicron symptoms) काय असतात, याबाबत माहिती दिली आहे. डॉ.सोनम सोळंकी यांनी सांगितलेली ओमायक्रॉनची मुख्य लक्षणं - अंग दुखणं, अशक्तपणा, थकवा, डोकेदुखी आणि ताप ही ओमायक्रॉनची सुरुवातीची लक्षणं आहेत. सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णाला खोकला होऊ शकतो. कधीकधी खोकला आणि सर्दी होते. शिंकताना नाकातून पाणी येतं. - खोकला सहसा कोरडा असतो. तो पुढील काही दिवसांत बरा होतो. बर्याच वेळा, 80 टक्के रुग्णांमध्ये पहिल्या 3 दिवसांत ताप बरा होतो. जर तो बरा झाला नाही, तर हे मध्यम ते गंभीर संसर्गाचं लक्षण असतं. अशावेळी संबंधित व्यक्तीची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. - तुमच्यामध्ये जर ओमायक्रॉनची लक्षणं असतील तर स्वतः आयसोलेशनमध्ये राहावे. जेणेकरून तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांना हा आजार होणार नाही. तसेच तत्काळ रॅपिड अँटिजेन चाचणी करावी. ही चाचणी निगेटिव्ह असेल आणि तरीही तुम्हाला कोणतीही लक्षणं दिसत असतील, तर आरटीपीसीआर चाचणी करावी. या चाचणीमुळे तुम्हाला कोविड झाला आहे का नाही, याची खात्री होईल. वाचा : कोरोना नियम मोडल्याबद्दल 4 वर्षांचा कारावास, उच्चपदस्थांना फोडावी लागणार खडी मास्कचा वापर करा ओमायक्रॉन शरीरावर ज्या प्रकारे वर्चस्व गाजवत आहे, त्याबद्दल वेगवेगळ्या देशांतील आरोग्य तज्ज्ञांचे मत जवळजवळ समान आहे. या विषाणूची लागण झालेल्या लोकांमध्ये प्रथम घसा खवखवणं किंवा घशात जळजळणं अशी लक्षणं दिसतात. काही आरोग्यतज्ज्ञ असंही म्हणतात की, ‘डोकेदुखी आणि खोकल्याच्या समस्यां सोबत घसा खवखवणं हे लक्षण दिसतं. हा विषाणू घशात संसर्ग वेगाने पसरवत असतो. या विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे सुगंध आणि चव घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होत नाही,’ असे तज्ज्ञांचे मत आहे. पण तुम्ही घराच्या बाहेर जाताना नियमित मास्कचा वापर करा, तसेच तुमच्यामध्ये ओमायक्रॉनची लक्षणं असतील आणि तुम्हाला कोणत्याही कारणास्तव घराबाहेर जाण्याची गरज असेल, तर एन 95 मास्क वापरावा, असे डॉक्टरांचे मत आहे. वाचा : उंदरांपासून विकसित झालाय कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट? चिनी संशोधकांच्या दाव्याने वाढवली चिंता गेल्या 24 तासांत देशात 1,94,720 नवीन रुग्णांची नोंद भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 1,94,720 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 442 लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, काल, मंगळवारी (11 जानेवारी 2022) 1,68,063 नवीन रुग्ण आढळले आणि 277 लोकांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3,60,70,510 झाली आहे. गेल्या 24 तासांत 60,405 रुग्ण कोरोना आजारातून बरे झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत या आजारातून बऱ्या झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3,46,30,536 झाली आहे. सध्या देशात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 9,55,319 आहे. कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 4,84,655 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे प्रत्येकाने मास्कचा वापर करण्यासोबतच कोरोना अनुषंगाने असणारी नियमावली पाळणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.