नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : सध्या सोशल मीडियावर अमेरिकेतील एका व्यक्तीची लिंक्डइन पोस्ट खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने आपल्या मुलीच्या आत्महत्येचे कारण सांगितले आहे. त्या व्यक्तीच्या मुलीने ‘लाइम डिसीज’मुळे आत्महत्या केल्याचे भावनिक पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे. या आजाराची लागण त्या मुलीच्या मेंदूमध्ये झाली होती. आता सोशल मीडियावर लाइम आजाराची चर्चा सुरू झाली आहे. हा आजार काय आहे आणि किती घातक आहे, हे जाणून घेण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. लाइम डिसीज असोसिएशन नुसार, हा आजार जगातील 80 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे आणि या यादीत भारताचे नाव देखील समाविष्ट आहे. या धोकादायक आजाराबद्दल सविस्तर जाणून घ्या. लाइम रोग म्हणजे काय? सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या माहितीनुसार, लाइम रोग हा एक जिवाणू संसर्ग आहे जो संक्रमित काळ्या पायांचा किटक चावल्यामुळे पसरतो. हा अतिशय वेगाने पसरणारा आजार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या आजाराची सुरुवातीची लक्षणे सर्वसाधारण आजारपणाची असतात. ज्यामुळे बहुतेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यानंतर हळूहळू हा रोग सांधे, हृदय आणि मज्जासंस्थेमध्ये पसरतो. यावर योग्य वेळी उपचार न केल्यास एखाद्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. या आजाराची बहुतांश प्रकरणे अमेरिकेत दिसून आली आहेत. परंतु, इतर देशांमध्येही या आजाराचा मोठा धोका आहे. कीटक चावल्यानंतर 3-30 दिवसांनी या रोगाची लक्षणे दिसतात. लाइम रोगाची लक्षणे? - डोकेदुखी - ताप - थकवा - मायग्रेन - त्वचेवर पुरळ उठणे - सांधेदुखी - स्नायू दुखणे - सूज - हृदयाच्या ठोक्यांची गती बदलणे. हे वाचा - तुमच्या हातच्या खाद्यपदार्थांनाही येईल हॉटेलस्टाईल फूडची चव; हे आहे सिम्पल मॅजिक लाइम रोग बरा होऊ शकतो का? लाइम रोगाची लागण झालेल्या लोकांवर लक्षणांच्या आधारे उपचार केले जातात. बहुतेक प्रकरणांमध्ये, रुग्ण प्रतिजैविकांनी काही आठवड्यांत बरे होतात. जर हा संसर्ग मेंदू आणि हृदयात पसरला तर त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होते. अशा स्थितीत व्यक्तीच्या मृत्यूचा धोका वाढतो. मात्र, या आजारावर अद्याप कोणतीही लस तयार झालेली नाही. अनेक संशोधनात त्याच्या उपचारांबाबतही प्रश्न उपस्थित केले गेले आहेत.
लाइम रोग कसा टाळायचा - - कीटकनाशक वापरा - किडे चावू नयेत म्हणून स्वतःचा बचाव करा - घराभोवती कीटकनाशकाची फवारणी करावी - कीटकांपासून पाळीव प्राण्यांचे संरक्षण करा - लक्षणे दिसल्यास ताबडतोब तपासणी करा

)







