आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव महत्त्वाचा असतो. एखाद्या अवयवामध्ये जरी बिघाड झाला तरी त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर दिसून येतो. किडनी म्हणजे, मूत्रपिंड हा मानवी शरीरातील असाच एक अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. रक्तातील युरिया, क्रिएटिनिन, अॅसिड इत्यादी नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ फिल्टर करण्याचं काम या किडनी करतात. लाखो लोक विविध प्रकारच्या किडनीच्या आजारांसह जगत आहेत आणि चिंतेची बाब म्हणजे, यापैकी बहुतेकांना याची जाणीवही नाही. यामुळेच किडनीच्या आजारांना ‘सायलेंट किलर’ म्हणून संबोधलं जातं. कारण, बहुतेक लोकांमध्ये हा आजार गंभीर होईपर्यंत त्याचं निदान होत नाही. किडनीचे आजार कालांतरानं गंभीर होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, किडनीशी संबंधित कोणतीही समस्या तुमच्या एकूण दैनंदिन कामावर परिणाम करते. यासोबतच त्याचा शारीरिक क्षमतेवरही विपरित परिणाम होतो. त्यामुळे किडनीच्या आरोग्याबाबत प्रत्येकानं जागरुक असणं आवश्यक आहे. ( अशा पद्धतीने बनवा डिंकाचे लाडू; थंडीत ऊर्जाही मिळेल आणि पचनशक्तीही होईल मजबूत ) किडनी निकामी होण्याव्यतिरिक्त किडनीच्या समस्येशी संबंधित अशी अनेक लक्षणं आहेत जी आपल्याला सहज लक्षात येत नाहीत. अशा लक्षणांची माहिती या बातमीत देण्यात आली आहे. 1. किडनी निकामी झाल्यामुळे भूक कमी होते. युरिया, क्रिएटिनिन, अॅसिड यांसारखे विषारी पदार्थ शरीरातच जमा होऊ लागतात, ज्यामुळे भूक आणि तोंडाच्या चवीवर परिणाम होतो. 2. किडनीच्या समस्येमुळे सूज येण्याच्या तक्रारी जाणवू शकतात. पेशींमध्ये द्रवपदार्थांच्या संयोगामुळे डोळ्यांभोवती सूज येण्याचा धोका असतो. 3. अशक्तपणा हे किडनीच्या समस्येचं एक सामान्य लक्षण आहे. किडनीमध्ये बिघाड असल्यास तुम्हाला खूप थकवा जाणवेल आणि अधिक हालचाल करण्यास त्रास होईल. 4. किडनीच्या समस्येची वॉर्निंग म्हणून मळमळ होणं आणि उलट्या होण्याचा त्रास सुरू होतो. 5. किडनीमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास, सुरुवातीची लक्षणं म्हणून तुमची टाच, पाय आणि घोट्याजवळ सूज येऊ शकते. (लहान मुलांना पॅरॅसिटॅमॉल देताना या गोष्टी लक्षात घ्या; नाहीतर होऊ शकतात दुष्परिणाम) किडनी निरोगी ठेवण्यासाठी उपाय 1. किडनी निरोगी ठेवण्यासाठी सकस आहार घ्या आणि वजन नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा. 2. तेलकट, फास्ट आणि जंक फूड टाळण्याचा प्रयत्न करा. ताजी फळं आणि पालेभाज्या खाण्यावर भर द्या. त्यामुळे किडनी निरोगी राहण्यास मदत होईल. 3. किडनी निरोगी ठेवण्यासाठी शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वेळोवेळी तपासत राहा. यासाठी लिपिड प्रोफाइल टेस्ट आवश्यक आहे. 4. किडनी निरोगी ठेवण्यासाठी कमी प्रमाणात मीठ खावं. यासाठी पॅक केलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणं टाळा. 5. किडनी निरोगी ठेवण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्या. पाणी कोमट असेल तर अधिक फायदा होईल. यामुळे शरीरातून युरिया आणि सोडियमसारखे विषारी पदार्थ बाहेर टाकणं सोपं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.