नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : बदलत्या ऋतुमध्ये लहान मुलांना ताप येणं ही सामान्य बाब आहे. तापामुळे मुलांना अस्वस्थ वाटतं आणि ते रडारड करतात. अंगात ताप असलेल्या मुलांमध्ये चिडचिड, थकवा, भूक न लागणं, आळस, उलट्या आणि डिहायड्रेशन यांसारखी लक्षणं दिसतात. अशा स्थितीत शरीराचं तापमान 100 डिग्री फॅरेनहाइटपेक्षा जास्त होऊ लागलं तर आपण मुलांना पॅरॅसिटॅमॉल गोळी किंवा सिरप देतो. तुमच्याही घरात मुलं असतील तर पॅरॅसिटॅमॉलच्या गोळ्या किंवा सिरप देण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. मुलांना ताप आल्यावर लगेच औषध देण्याची गरज नाही. काही वेळा औषधांशिवाय तापावर उपचार केल्याने त्यांची प्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते. अगदी सजहपणे वापरल्या जाणाऱ्या पॅरॅसिटॅमॉल औषधांचे लहान मुलांच्या आरोग्यावर काही दुष्परिणाम होतात का? याबाबत आपण जाणून घेऊया. काय आहे पॅरॅसिटॅमॉल? नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार (एनएचएस), पॅरॅसिटॅमॉल हे डोकेदुखी, पोटदुखी आणि ताप बरं करणारं औषध सामन्य औषध आहे. परंतु, लहान मुलांच्या अंगातील ताप कमी करण्यासाठी त्याचा अतिवापर करू नये. असे केल्याने मुलांच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. लहान मुलांना पॅरॅसिटॅमॉल देण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात घ्या डॉक्टरांचा सल्ला घ्या: लहान मुलांना पॅरॅसिटॅमॉल देण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. असं केल्यानं तुम्ही बाळाला त्याच्या वजन आणि वयानुसार योग्य प्रमाणात औषध देऊ शकाल. योग्य प्रमाणात औषध द्या: औषधाचा पहिला डोस देऊनही ताप लवकर उतरत नसेल, तर अनेकजण जास्त प्रमाणात पॅरॅसिटॅमॉल देऊ लागतात. हा चुकीचा मार्ग आहे. याचा मुलाच्या आरोग्यावर दुष्पपरिणाम होऊ शकतो. औषध देण्यापूर्वी ताप चेक करा: जर तुम्ही बाळाला तोंडावाटे औषध देत असाल तर त्याआधी एकदा ताप तपासा. जर, तापमान 100 डिग्री फॅरेनहाइटपेक्षा जास्त असेल तरच पॅरॅसिटॅमॉल द्या. ओव्हरडोस टाळा: जर मुलाला दोन औषधं एकत्र द्यायची असतील तर औषधांबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कधीकधी खोकल्याच्या औषधातही पॅरॅसिटॅमॉलचा डोस असतो. अशा परिस्थितीत, मुलाच्या शरीरात जास्त प्रमाणात पॅरॅसिटॅमॉल जाण्याची शक्यता असते. मुलाच्या वजनानुसार डोस द्या: पॅरॅसिटॅमॉलचा डोस मुलाच्या वजनावर अवलंबून असतो. जर, तुमच्या मुलाचं वजन पाच किलो किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर पॅकेजिंगवर दिलेल्या सूचनांनुसार किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषध द्या.
विनाकारण वापर टाळा: पॅरॅसिटॅमॉलचा उपयोग केवळ तापासाठीच नाही तर इतर वेदनांवरही होतो. जर मुलाला ताप असेल; पण त्याला अस्वस्थ वाटत नसेल तर पॅरॅसिटॅमॉल देऊ नका. कधीपर्यंत द्याल औषध: पॅरॅसिटॅमॉल दिल्यानंतर तीन दिवसानंतरही ताप कमी होत नसेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा. अशा स्थितीमध्ये मुलाला व्हायरल इन्फेक्शन झालेलं असू शकतं. असं झालं असेल तर त्यावर लवकर उपचार करणं आवश्यक आहे. हे वाचा - कंबर स्लीम बनवायची असेल तर नाश्त्यात करा हे 5 बदल, लगेच फरक दिसू लागेल दोन डोसमध्ये चार तासांचं अंतर गरजेचं: लहान मुलांना 24 तासांत चारपेक्षा जास्त वेळा पॅरॅसिटॅमॉल देणं योग्य नाही. मुलांना दिवसातून फक्त चार वेळा पॅरॅसिटॅमॉल देणं सुरक्षित आहे. वरील गोष्टी लक्षात घेऊन पॅरॅसिटॅमॉलचा वापर केल्यास लहान मुलांवर त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता कमी होते.