मुंबई, 01 ऑगस्ट : प्रत्येकाच्या जीवनात मैत्रीला (Friendship) विशेष स्थान असतं. मनातल्या गोष्टी, गुपितं, सुख-दुःखं शेअर करण्यासाठी मित्राइतकी (Friend) जवळची व्यक्ती अन्य कोणीही नसते. आपण आपली प्रत्येक भावना, मत मित्रांसोबत अगदी निर्धास्तपणे शेअर करू शकतो. अडचणीच्या काळात, सुखाच्या क्षणी बरोबर असणारा मित्र आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो. मैत्रीचे अनेक किस्से, फायदे आपण नेहमीच वाचतो, ऐकतो; पण मैत्रीच्या नात्याविषयी एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. मैत्री आपल्या मानसिक आरोग्यासाठी उत्तम असते, असं अनेक अभ्यासांतून, संशोधनांतून स्पष्ट झालं आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनातून आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली. मैत्रीमुळे केवळ मानसिकच नव्हे, तर शारीरिक स्वास्थ्यही (Physical Health) लाभतं, असा दावा संशोधकांनी केला आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक मित्र असतो, ज्याच्याशी मनातलं दुःख, सुख, समस्या शेअर करता येते. मनातल्या व्यथा, दुःख मित्रासोबत शेअर केल्यानं मन हलकं होतं असं म्हणतात. त्यामुळे मैत्री ही मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असते, असं संशोधनातून स्पष्ट झालं आहे. त्यासोबतच मैत्रीमुळे शारीरिक आरोग्य उत्तम राहतं, असा दावा नुकताच संशोधकांनी केला आहे. मैत्रीचा केवळ मानसिक आरोग्यावरच नाही तर शारीरिक आरोग्य खोलवर परिणाम होतो, असं मेडिकल न्यूज टुडेच्या वृत्तात म्हटलं आहे. मैत्रीमुळे हृदयविकार (Heart Disease), कॅन्सर (Cancer), हाय ब्लड प्रेशर यांसारख्या (High blood Pressure) गंभीर आजारांचा धोका कमी होतो, असंदेखील नव्या संशोधनात दिसून आलं आहे. `टीव्ही नाइन हिंदी` ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. हे वाचा - Parenting Tips: पालकांनी आपल्या 10 वर्षांपर्यंतच्या मुलांना या 5 गोष्टी आवर्जुन शिकवा! संशोधकांनी संशोधनात सहभागी व्यक्तींना नेझल स्प्रेच्या माध्यमातून ऑक्सिटॉसिन दिलं (Oxytocin) असता, त्यांचा एकमेकांप्रति विश्वास वाढल्याचं दिसून आलं. तसंच त्यांच्यात जोखीम पत्करण्याची क्षमतादेखील वाढली. यामागे काही कारणं आहेत. चांगली मैत्री मानसिक आरोग्य मजबूत होण्यास कारणीभूत ठरते. ऑक्सिटॉसिन हे त्यामागचं मूळ कारण आहे. हायपोथॅलॅमसमध्ये तयार होणारं हे एक हॉर्मोन (Hormone) आणि न्यूरोट्रान्समीटर आहे. याचा संबंध माणसाच्या मनातला विश्वास, सहानुभूती आणि दयाळूपणासारख्या भावनांशी असतो. त्यामुळे मैत्री दृढ होण्यासाठी हा घटक महत्त्वाचा ठरतो. हे वाचा - Relationship Tips : संशय घेण्याच्या स्वभावामुळे वाढू शकतं नात्यातील अंतर, असा जपा विश्वास खरं तर एकटेपणामुळे (Loneliness) माणसाच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. डिप्रेशन (Depression) येण्यास एकटेपणा कारणीभूत असतो. यामुळे झोपेवर परिणाम होतो. एकटेपणामुळे पर्सनॅलिटी डिसॉर्डर किंवा मद्यपानाचं व्यसन जडण्याची शक्यता असते; पण मैत्रीमुळे या गोष्टी टळतात. मैत्रीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते. एका अभ्यासानुसार, ज्यांना चांगले मित्र असतात, त्यांना कार्डियोव्हॅस्क्युलर डिसीज, हृदयविकार, हाय ब्लड प्रेशर किंवा कॅन्सरसारखे गंभीर आजार होण्याचा धोका कमी असतो. ज्या व्यक्ती मित्रांपासून दूर राहतात, त्यांना हे आजार होण्याची शक्यता जास्त असते. यावरून आपल्या आयुष्यात मैत्री आणि मित्रमंडळी किती महत्त्वाची आहेत, हे अधोरेखित होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.