नवी दिल्ली, 1 ऑगस्ट : जबाबदार नागरिक म्हणून पुढच्या पिढीचं भविष्य घडवायचं असेल, तर त्याची सुरुवात बालवयातच केली पाहिजे. मुलं लहान असल्यापासून आजूबाजूला पाहून, ऐकून शिकत असतात. मोठी झाल्यावर वडिलधाऱ्यांकडून समजुतीच्या (Parenting Tips) गोष्टी ऐकतात. शिक्षकांकडून शिस्तीचे धडे मिळतात. विशेषतः दहा वर्षं वयाच्या मुलांना समाजाविषयी, करिअरविषयी, चांगल्या वर्तणुकीविषयी मार्गदर्शन केलं, तर ही मुलं पुढे चांगली व्यक्ती म्हणून घडतील, यात शंका नाही. ‘ओन्ली माय हेल्थ डॉट कॉम’ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. दहा-बारा वर्षांच्या मुलांना थोडी समज आलेली असते; मात्र समाजाविषयी, बाहेरच्या जगाविषयी त्यांना पूर्ण ज्ञान नसतं. या वयातल्या मुलांना सांभाळणं खूप अवघड असतं. त्यांच्या अनेक प्रश्नांना समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत, तर माहिती मिळवण्यासाठी ते इतर पर्याय शोधतात. त्यातून गैरसमज होण्याची किंवा चुकीची माहिती मिळण्याची शक्यता असते. त्यासाठी याच वयात त्यांना काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती करून दिली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचा आदर केला पाहिजे समाजात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल आदर असावा, ही भावना मुलांच्या मनात रुजवली पाहिजे. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींमध्ये लहान-मोठे, गरीब-श्रीमंत असा भेदभाव करायचा नसतो, हे मुलांना याच वयात सांगणं गरजेचं असतं. त्यामुळे मोठी झाल्यावर मुलं चांगली व्यक्ती म्हणून समाजात वावरतील. सकारात्मकता रुजवणं गरजेचं बदलत्या जीवनशैलीमुळे, तंत्रज्ञानामुळे मुलांच्या संगोपनाच्या पद्धती बदलल्या आहेत. त्या योग्य की अयोग्य यापेक्षा त्याचे परिणाम पाहणं महत्त्वाचं आहे. अशा वातावरणात मुलांमध्ये पटकन नकारात्मकता वाढीला लागते. मन सकारात्मक (Positive) असलं, तर मेंदूतले न्यूरॉन्स योग्य पद्धतीनं काम करतात. यासाठीच मुलांना सकारात्मक ठेवणं गरजेचं आहे. पालकांनी मु लांना तसं वातावरण मिळेल, हे पाहिलं पाहिजे. सकारात्मकता जोपासायला आणि नकारात्मक विचारांना दूर सारायला मुलं स्वतःच शिकतील असं त्यांना घडवलं पाहिजे. सर्व अवयवांची माहिती देणं मुलांमध्ये याच वयात काही शारीरिक बदल होत असतात. या वयात मुलांशी पालकांनी सतत मोकळा संवाद ठेवला पाहिजे. कोणताही आडपडदा न ठेवता मुलांना शरीराच्या सर्व अवयवांची माहिती (Information Of Body Parts) दिली पाहिजे. मुलांना चांगला व वाईट स्पर्श कोणता याची जाणीव झाली पाहिजे, यासाठी त्यांना याच वयात ज्ञान देणं गरजेचं आहे. स्वच्छतेचे धडे हवेत फिट राहण्यासाठी शरीर व मन दोन्ही निरोगी असलं पाहिजे. त्यासाठी मुलांना लहानपणापासूनच स्वतःच्या शरीराची स्वच्छता (Personal Hygiene) कशी राखायची याचे धडे देणं महत्त्वाचं असतं. मानसिक स्वास्थ्यही कसं चांगलं ठेवायचं याचं मार्गदर्शनही दिलं पाहिजे. मुलांचे आदर्श व्हा मुलं पालकांकडे पाहूनच शिकत (Parents Are Role Model) असतात. त्यांच्यासारखी वागत असतात. त्यामुळे चांगलं वागण्याची जबाबदारी पालकांवर असते. भविष्यात मुलं चांगली वागावीत असं वाटत असेल, तर तसंच वर्तन पालकांनी ठेवलं पाहिजे. मुलांच्या जडणघडणीत दहा ते बारा वर्षं वयाचा काळ खूप महत्त्वाचा असतो. त्यांना चांगल्या सवयी लावण्यासाठी, माणूस म्हणून घडवण्यासाठी याच काळात पालकांनी योग्य प्रयत्न केले पाहिजेत, असं या विषयातल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.