मुंबई, 7 ऑगस्ट- अंडी (Eggs) ही प्रथिनांचा (Proteins) चांगला स्रोत असल्यानं पौष्टिक घटक म्हणून आहारात त्यांचा समावेश करण्याचा आग्रह डॉक्टर, आहारतज्ज्ञही करतात. त्यामुळे अनेक लोक नियमितपणे अंडी खातात. मात्र पिवळ्या भागात शरीरासाठी हानिकारक ठरणारे कोलेस्टरॉल (Cholesterol) जास्त प्रमाणात असल्यानं अनेक लोक अंड्यातील पिवळा बलक (Yellow Yok) खात नाहीत. तुम्हीही व्यायाम करत असाल तर आहारतज्ज्ञ तुम्हाला अंडी खाण्याचा सल्ला देतात मात्र त्यातील फक्त पांढरा भाग खाण्यास सांगतात. त्यामुळं तुम्हीही अंडी खाताना त्यातला पिवळा बलक काढून टाकून फक्त पांढरा भाग खात असाल तर तुम्ही अनेक चांगल्या पौष्टिक घटकांना मुकता. अंड्यातील पिवळ्या बलकातही जीवनसत्वासह अनेक पोषक घटक असतात. टीव्ही 9हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, एका अंड्यात साधारण 186 मिलीग्रॅम कोलेस्टेरॉल असतं आणि ते या पिवळ्या बलकात असतं. आपल्या शरीराला कोलेस्टेरॉलचीदेखील गरज असते, जे मानवी शरीरात टेस्टेस्टेरॉन बनवते आणि ऊर्जेची पातळी वाढवते. स्नायू (Muscles) मजबूत होण्यासाठीही याचा उपयोग होतो. त्यामुळे अंड्यातील पिवळ्या भागात असणारं कोलेस्टेरॉल जितकं सांगितलं जातं, तितकं हानिकारक नसतं. तसंच अंड्यातील या पिवळ्या भागात विविध जीवनसत्त्वेही (Vitamins) असतात. यामध्ये ए, डी, ई, बी -12 तसंच जीवनसत्व ‘के’ सह लोह, रिबोफ्लेविनसारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी असतात. आपल्या शरीराच्या संतुलित विकासासाठी या सर्व गोष्टींची आवश्यकता असते. तसंच अंड्यातील पिवळं बलक हा मेंदूतील न्यूरोट्रान्समीटर्ससाठी फायदेशीर असणाऱ्या कोलीनचा (Choline) महत्त्वाचा स्रोत आहे. गर्भधारणा आणि स्तनपानादरम्यान हे कोलीन शरीरासाठी खूपच लाभदायी असतं. यात अँटिऑक्सिडेंटही (Antioxidants) मोठ्या प्रमाणात असल्यानं उर्जेच्या दृष्टीनेदेखील ते फायदेशीर असते. याच्यामुळे डोळ्यांनाही संरक्षण मिळतं. (हे वाचा: रोज प्या 5 हेल्दी ड्रिंक;डायबेटिज रुग्णांसाठी आहेत संजीवनी ) त्यामुळे तुम्ही अंड्याचा पिवळा भाग खात नसाल, तर तुम्ही त्यातील सगळ्या पोषक घटकांपासून वंचित राहता. हे टाळण्यासाठी अंड्याचा फक्त पांढरा भाग न खाता पिवळा भाग खाणंही आवश्यक आहे. मात्र ते प्रमाणात खाणं हेदेखील महत्त्वाचं आहे. अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या अहवालात असं म्हटलं आहे की, जे लोक दर आठवड्याला सात अंडी खातात त्यांना हृदयरोगाचा धोका कमी असतो. मात्र तुम्ही एकाच दिवसात अंड्यातील पिवळ्या बलकासाह 7-8 अंडी खाल्लीत तर ते आरोग्यासाठी चांगले नाही. (हे वाचा: मजबूत केस आणि नितळ त्वचेसाठी ‘हा’ पदार्थ वापरा; पाहा आश्चर्यकारक फायदे ) अंड्यातील पांढऱ्या भागातदेखील (White Yok) भरपूर प्रथिने आणि उपयुक्त घटक असतात. त्यामुळं अंडी खाताना पांढरा आणि पिवळा बलकही खाणं महत्त्वाचे आहे. मात्र पिवळा बलक खाताना त्याचं प्रमाण नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. जेणेकरून त्याचा त्रास न होता फायदा होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







