मुंबई, 23 जुलै : वाढते ताणतणाव, धावपळीची जीवनशैली, चिंता, पोषक आहार घेण्याकडे होणारं दुर्लक्ष आणि पुरेशा व्यायामाचा अभाव या गोष्टींमुळे शारीरिक समस्या वाढताना दिसतात. महिलांचा विचार करता कुटुंब आणि करिअर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडताना, त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे महिलांमध्ये (Women) आजारांचं (Disease) प्रमाण वाढत आहे. पांढरा स्राव (White discharge) जाणं किंवा ल्युकोरिया (Leucorrhoea) ही महिलांना जाणवणारी सामान्य समस्या आहे. किशोरवयीन मुलींना प्रामुख्याने ही समस्या भेडसावते. थोडासा पांढरा स्राव जाणं ही मोठी समस्या नाही. परंतु, असा त्रास जास्त प्रमाणात जाणवत असेल तर ती चिंताजनक बाब ठरू शकते. अशा वेळी तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. ल्युकोरियाचा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय (Home Remedies) फायदेशीर ठरू शकतात. पांढरा स्राव कमी प्रमाणात जात असेल तर हे उपाय निश्चितच गुणकारी ठरू शकतात. `टाइम्स ऑफ इंडिया` ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. अनेक महिलांना पांढरा स्राव जाण्याची समस्या जाणवते. हा स्राव कमी प्रमाणात असेल तर चिंता करण्याचं कारण नसतं; मात्र स्राव जास्त प्रमाणात असेल तर वैद्यकीय उपचारांची गरज भासू शकते. काही वेळा अशक्तपणा (Weakness) आणि संसर्गामुळे (Infection) पांढरा स्राव जास्त प्रमाणात होतो. स्रावाचा रंग राखाडी, हिरवा, पिवळा किंवा तपकिरी असेल तर ही बाब चिंताजनक असू शकते. घट्ट पांढरा स्राव आणि योनीला खाज सुटणं ही समस्या यीस्ट संसर्गामुळे (Yeast Infection) निर्माण होते. योनिमार्ग (vagina) स्वच्छ न ठेवणं, अतिचिंता आणि पोषक आहाराच्या कमतरेमुळेदेखील पांढऱ्या स्रावाची समस्या निर्माण होते. पांढऱ्या स्रावाच्या लक्षणांमध्ये चक्कर येणं, थकवा येणं, खाज सुटणं, अशक्तपणा, प्रायव्हेट पार्टमधून दुर्गंधी येणं, डोकेदुखी आणि बद्धकोष्ठता यांचा समावेश होतो. पांढऱ्या स्रावाची समस्या काही घरगुती उपायांनी, तसंच आहारात काही पदार्थांचा समावेश केल्याने दूर होऊ शकते. हे वाचा - Vagina Discharge मध्ये बदल; महिलांनो दुर्लक्ष करू नका, असू शकतो गंभीर आजार पांढरा स्राव जाण्याची समस्या असलेल्या महिलांसाठी भेंडी (Lady Finger) गुणकारी ठरते. सर्वप्रथम भेंडी पाण्यात शिजवून घ्यावी. त्यानंतर मिक्सरमधून एकत्र करून खावी. भेंडी चिरून, शिजवून दह्यात भिजवून सेवन करणंदेखील योग्य ठरतं. स्रावासोबतच योनिमार्गाला खाज सुटण्याची समस्या जाणवत असेल तर पेरूच्या पानांचा (Guava Leaves) वापर गुणकारी ठरतो. पेरूची काही पानं पाण्यात उकळून घ्यावीत. हे पाणी थंड झाल्यानंतर दिवसातून दोनदा प्यावं. यामुळे त्रास कमी होतो. पांढऱ्या स्रावाची समस्या दूर करण्यासाठी तांदूळ स्टार्च (Rice Starch) अर्थात तांदूळ शिजवलेलं पाणी नियमितपणे पिऊ शकता. सातत्याने असा त्रास होत असेल तर तांदळाचा स्टार्च पिणं श्रेयस्कर ठरतं. आवळा (Indian gooseberry) अनेक आजारांवर गुणकारी मानला जातो. आवळ्यात व्हिटॅमिन सी, तसंच अनेक पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आरोग्य सुधारतं. पांढऱ्या स्रावाची समस्या जाणवत असेल तर महिलांनी रोज कच्चा आवळा, आवळा पावडर, मुरांबा किंवा घरी बनवलेल्या कॅंडीज खाव्यात. भारतीय घरांमध्ये तुळशीचा (Tulsi) वापर नेहमीच केला जातो. अनेक वर्षांपासून तुळशीचा वापर औषधी दृष्टिकोनातून केला जात आहे. तुळशीची पानं पाण्यात बारीक करून त्यात मध मिसळून ते मिश्रण घ्यावं. पांढऱ्या स्रावाची समस्या दूर करण्यासाठी दिवसातून दोनदा हे पेय प्यावं. तसंच महिला दुधासोबतही तुळशीच्या पानांचं सेवन करू शकतात. मेथीचे दाणे (Fenugreek seeds) पाण्यात उकळून सेवन केल्यानं पांढऱ्या स्रावाची समस्या दूर होते. यासाठी अर्धा लिटर पाण्यात मेथीचे दाणे टाकावेत. पाणी निम्मं होईपर्यंत उकळून घ्यावं. हे पाणी थंड झाल्यावर प्यावं. हे वाचा - नका बाळगू लाज! महिलांमध्ये वाढतोय हा आजार; वेळीच उपचार न केल्यास होतील दुष्परिणाम पांढऱ्या स्रावाच्या समस्येवर धणेही (Coriander Seeds) गुणकारी ठरतात. धणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवावेत. सकाळी हे पाणी गाळून घ्यावं आणि रिकाम्या पोटी प्यावं. पांढऱ्या स्रावावर उपचार करण्यासाठी हा सर्वांत सोपा आणि सुरक्षित घरगुती उपाय आहे. योनिमार्गातून स्राव होणं काही वेळा चांगलं असतं. यामुळे योनिमार्गातले बॅक्टेरिया, बुरशी निघून जाते. तसंच पांढरा स्राव योग्य प्रमाणात असल्यास लैंगिक संबंधावेळी ल्युब्रिकेशन म्हणून उपयुक्त ठरतो. परंतु, पांढऱ्या स्रावाचं प्रमाण अधिक असेल तर महिलांनी तातडीने वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.