नवी दिल्ली 20, जानेवारी : भारतात विकासाची चाकं गतिमान झाली आहेत. तसंच भारताची लोकसंख्याही मोठी आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांसाठी ही मोठी बाजारपेठ बनली आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीचा देशाला निर्माण झालेला धोका सगळ्यांनी अनुभवला. आता भविष्यात कर्करोगासारख्या गंभीर आजारांचीही त्सुनामी येऊ शकते, असा दावा अमेरिकन ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर जेम अब्राहम यांनी केलाय.
भारतातली वाढती लोकसंख्या आरोग्य व्यवस्थेवर दिवसेंदिवस ताण निर्माण करत आहे. त्यातच जागतिकीकरण, जीवनशैलीत झालेले बदल व वृद्धांची वाढती संख्या यामुळे आजारांचं प्रमाण खूप वाढलंय. याचाच परिणाम म्हणून भविष्यात कर्करोगासारखे गंभीर आजार देशात वाढू शकतात, असा दावा करण्यात आलाय. अमेरिकन ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर जेम अब्राहम यांनी हा दावा केला असून, भविष्यात त्याच्या प्रतिबंधासाठी वैद्यकीय तंत्रज्ञानाचा विकास करणं हिताचं ठरेल असं त्यांनी म्हटलंय. ओहयोतल्या क्लीव्हलँड क्लिनिकमधल्या हिमॅटोलॉजी अँड मेडिकल ऑन्कोलॉजी विभागाचे ते प्रमुख आहेत.
कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी व त्यावर उपचार करण्यासाठी या काळात काय करावं लागेल, याबाबत 6 आवश्यक ट्रेंड्स त्यांनी सुचवले आहेत. त्यात कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी लस, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि डेटा डिजिटल टेक्निकचा विकास व लिक्विड बायोप्सी या गोष्टींनी सुरुवात करावी लागेल. त्याशिवाय जिनॉमिक प्रोफायलिंग, जीन एडिटिंग टेक्नॉलॉजीचा विकास आणि इम्युनोथेरपी, कार टी सेल थेरपीची नेक्स्ट जनरेशन या इतर 3 ट्रेंड्सचा समावेश आहे. भारतासारख्या भरपूर लोकसंख्येच्या देशात कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी तंत्रज्ञान नागरिकांच्या खिशाला परवडेल असं करणं व त्यांच्यापर्यंत पोहोचवणं ही महत्त्वाची बाब आहे, असं डॉ. जेम यांनी सांगितलं.
डॉ. जेम यांच्या दाव्याला पुष्टी देणारा रिपोर्ट ग्लोबल कॅन्सर ऑब्झर्व्हेटरीने दिला आहे. त्यानुसार, 2040पर्यंत जगात कॅन्सरचा हाहाःकार होऊ शकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 2020च्या तुलनेत 2040मध्ये जगात कॅन्सर रुग्णांची संख्या 47 टक्क्यांनी वाढून प्रति वर्षी 2 कोटी 80 लाख इतकी वाढलेली असेल. जगात 2020मध्ये कॅन्सरचे 1 कोटी 80 लाख रुग्ण होते, तर जवळपास 1 कोटी जणांचा याच आजाराने मृत्यू झाला होता. फुफ्फुसाच्या कर्करोगापेक्षा सध्या स्त्रियांमधल्या ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढलंय; मात्र जास्तीत जास्त मृत्यू फुफ्फुसाच्या कॅन्सरमुळेच होतात.
हे वाचा - कोरोना लस घेतलेल्यांनो सावधान! राज्यातील XBB.1.5 व्हेरिएंट इतका खतरनाक की तुमचा जीवही धोक्यात
एखादी चांगली लस कॅन्सरवर प्रभावी उपचार ठरू शकते, असं डॉ. जेम यांना वाटतं. गेल्या काही वर्षांत विविध प्रकारच्या कॅन्सरवर लशींचं संशोधन झालं. त्यातून सकारात्मक परिणामही समोर आले आहेत; मात्र अजूनही ते संशोधन पूर्ण झालेलं नाही. क्लीव्हलँड क्लिनिक टीमही ब्रेस्ट कॅन्सरवर लस तयार करत आहे. कॅन्सरवर उपचारांसाठी तंत्रज्ञान मानवापेक्षाही उपयोगी ठरू शकतं, असं मत त्यांनी व्यक्त केलं. बायोप्सीवेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं सामान्य आणि असामान्य व्हेरिएशन्सची ओळख अधिक चांगल्या पद्धतीनं होऊ शकते. साध्या मानवी डोळ्यांनी ते शक्य नसतं.
जेनेटिक प्रोफायलिंग किंवा टेस्टिंगद्वारे ब्रेस्ट कॅन्सर आणि कोलन कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यावरच समजू शकतो. येत्या काळात जिनॉमिक टेस्टिंगचा वापर वाढेल. रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलचं प्रमाण तपासण्यासाठी व कॅन्सर पेशींना शोधून मारण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जाईल, असं डॉ. जेम यांचं म्हणणं आहे. यामुळे कॅन्सरची पूर्ण वाढ होण्याआधीच त्याचं निदान होऊन त्याला नष्ट करता येईल. लिक्विड बायॉप्सीमुळे एक थेंब रक्तामधून कॅन्सर झाला आहे की नाही, ते समजू शकेल. यामुळे कॅन्सरचं निदान लवकर होऊ शकेल.
हे वाचा - 'महिलांना जितकी जास्त मुलं, तितका जास्त पगार, 3 लाख रुपयांचं अनुदान', मुख्यमंत्र्यांची अजब घोषणा
भविष्यात कॅन्सरचा धोका संपूर्ण जगासाठी घातक ठरू शकतो. त्यासाठी मद्यपान, धूम्रपान बंद करणं, आहार-विहाराकडे लक्ष देणं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याबरोबरच वैद्यकीय तंत्रज्ञान लोकांना परवडेल अशा पद्धतीने उपलब्ध करून देणं व त्यात विकास करणं हे जास्त उपयुक्त ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cancer, Health, Lifestyle, Serious diseases