अँमस्टरडम, 18 मार्च : माणसाला दुःख झालं तरी त्याच्या डोळ्यातून (Eyes) अश्रू (Tears) येतात आणि आनंदानंही अश्रू येतात. काही लागलं, जखम झाली, टोचलं किंवा डोळ्यात धूळ, कचरा काही गेलं तरी डोळ्यातून पाणी येतं. काही वेळा रडल्यानंतर माणसाला बरं वाटतं. मनावरील ताण हलका होतो; त्याचबरोबर डोळ्यातून अश्रू येणं हे केवळ मानसिकच नव्हे तर शारीरिक आरोग्याच्या दृष्टीनंही आवश्यक असतं. काही व्यक्तींमध्ये काही आजारांमुळे त्यांच्या अश्रू ग्रंथी (Tear Glands) सुकून गेलेल्या असतात. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांतून अश्रूच येत नाहीत. त्यामुळे डोळ्यांसंबंधी आजारही बळावतात.
पण आता शास्त्रज्ञांनी कृत्रिम अश्रू ग्रंथी (Artificial Tear Glands) निर्माण करण्यात यश मिळवलं आहे. नेदरलँड्समधील ह्यूब्रेच इन्स्टीट्यूट फॉर डेव्हलपमेंट बायालॉजी अँड स्टेम सेल (Hubrecht Institute for developmental biology and stem cell) आणि प्रिन्सेस मेक्सिमा सेंटर फॉर पेडियाट्रिक ऑन्कोलॉजी (Princess Maxima Center for pediatric Oncology) या संस्थांमधील शास्त्रज्ञांनी या अश्रू ग्रंथी विकसित केल्या आहेत. स्टेम सेल जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे. आज तकने याबाबत वृत्त दिलं आहे.
या संशोधनाचे अभ्यासक हान्स क्लेवर्स (Hans Clevars) यांनी सांगितलं, ‘डोळ्यांच्या चारही बाजूंना असणारे गट्स निर्माण करणं हे अतिशय मोठं आव्हान होतं. कारण हे गट्स दर पाच दिवसांनी आपला थर बदलतात, मात्र त्यात यश आलं.’
हे वाचा - Mask घाला अन् दुरावा मिटवा; मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगबाबत नवं संशोधन
शास्त्रज्ञांनी गट टिश्यूचे (Tissue) अतिशय लहान तुकडे घेतले आणि त्यामध्ये स्टेम सेल (Stem Cell), प्रोटीन भरलं. स्टेम सेल्स पूर्णपणे विकसित होतील आणि नैसर्गिक अश्रू ग्रंथीप्रमाणे त्या कार्य करतील, अशी अपेक्षा होती. हान्स क्लेवर्स यांच्या टीमनं आधी उंदराच्या अश्रू ग्रंथी विकसित केल्या मग त्यांनी मानवी अश्रू ग्रंथी बनवण्यावर लक्ष केंद्रीत केलं. पहिल्या आठवड्यात अनेक छोट्या छोट्या ग्रंथी त्यांनी विकसित केल्या. मेंदूद्वारे अश्रू ग्रंथीना जो संदेश मिळतो तो एड्रिनेलिन हार्मोन्समुळं मिळतो. त्याचप्रमाणे हान्स आणि त्याच्या टीमनं बनवलेल्या अश्रू ग्रंथीना एड्रिनेलिन हार्मोन्समुळे संदेश पाठवला तर त्या फुटतात आणि डोळ्यातून घळाघळा अश्रू येऊ लागतात, हे सिद्ध झालं.
अर्थात अद्याप या कृत्रिम ग्रंथीबाबत काही मर्यादा आहेत. या ग्रंथी नैसर्गिक ग्रंथी प्रमाणेफक्त डक्टल सेल्सपासून बनलेल्या नाहीत. यामध्ये अन्य कोशिकांचाही समावेश करण्यात आला आहे. तसंच प्रत्यक्ष डोळ्यात याचं प्रत्यार्पण करून परीक्षण करणं बाकी आहे, असंही हान्स यांनी स्पष्ट केलं.
हे वाचा: 130 किलो वजनाच्या मुलानं व्यायाम आणि आहाराच्या मदतीनं घटवलं 55 किलो वजन
अश्रू नसतील तर डोळ्यातील ओलसरपणा कमी होतो. जळजळ, संसर्ग यापासून अश्रू ग्रंथी डोळ्याचं संरक्षण करत असतात. ते नैसर्गिक संरक्षण अशा व्यक्तींना लाभत नाही. डोळ्यांचे अन्य विकारही होऊ शकतात. त्यामुळं डोळ्यातून पाणी येणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. या ग्रंथीच्या निर्माणामुळं भविष्यात अश्रूसंबधित आजारांवर कसे उपचार करता येतील हे शास्त्रज्ञांना समजलं आहे. भविष्यात असे अनेक मिनी ऑर्गन्स निर्माण करून मानवी शरीरात प्रत्यारोपण करणं शक्य होईल. मानवजातीसाठी हे अत्यंत महत्त्वाचे संशोधन असून, आरोग्यक्षेत्रातील उपचार पद्धतींना यामुळे नवी दिशा मिळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.