मुंबई, 13 जानेवारी : दूधाला पूर्णान्न म्हटलं जातं. अगदी बाळापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. पण दुधाची हीच गरज आणि उपयुक्तता पाहून काही लोक काही नफ्यासाठी दुधात भेसळ करतात आणि लोकांच्या जीवाशी खेळतात. नुकतंच मुंबईतही असचा भेसळयुक्त दूधसाठा जप्त करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे हे दूध पिशवीतील आहे. गोकूळ, अमूल अशा नामांकित दूध पिशव्यांमध्येही भेसळ आढळली आहे. या पिशव्या ब्लेडने कापून त्यात भेसळ करून त्या पुन्हा सीलबंद करण्यात आल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरात आणलेलं दूध भेसळयुक्त तर नाही ना? याची खात्री करून घ्या. आता दुधात भेसळ आहे की नाही हे ओळखायचं कसं? हा तुम्हाला पडलेला प्रश्न. आता भेसळ ओळखायची म्हणजे त्यासाठी लॅब हवी, काही विशिष्ट उपकरणं हवीत, असं तुम्हाला वाटत असेल. पण त्याची काही गरज नाही. तुम्ही घरच्या घरीच दुधातील भेसळ ओळखू शकता. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानाने (FASSI) घरीच दुधाची भेसळ ओळखण्यासाठी काही प्रक्रिया सांगितल्या आहेत. त्या आपण पाहुयात. पण त्याआधी दुधात नेमकी कशाकशाची भेसळ होते ते पाहुयात. दुधात कशाची भेसळ होते? दुधात पाणी घालण्यासोबतच 10 पेक्षा जास्त वेगवेगळ्या गोष्टी मिसळून सिंथेटिक दूध तयार केलं जातं. तज्ज्ञांच्या मते, पाण्यात दूध पावडर मिसळूनही बनावट दूध तयार केले जाते, ज्यामध्ये लोणी नसते. स्निग्धता दिसून येण्यासाठी रिफाइंड तेल आणि शॅम्पूचा वापर केला जातो. दूध पांढरे दिसण्यासाठी वॉशिंग पावडर आणि पांढरा रंग (सफेडा) मिसळला जातो. दुधात गोडवा आणण्यासाठी ग्लुकोज टाकले जाते. हे वाचा - Gokul Amul Adulterated Milk : मुंबईकरांनो, पिशवीतलं दूध घेताय तर सावधान, तब्बल 1064 लिटर भेसळयुक्त दूध आढळलं भेसळयुक्त दूध प्यायल्याने काय होईल? सतत सिंथेटिक दूध प्यायल्याने कर्करोग होऊ शकतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दुधात कॅल्शियम असते, पण सिंथेटिक दूध बनवल्यास त्याची प्रतिक्रिया उलट होऊ शकते. यामुळे हाडांनाही त्रास होऊ शकतो, तर केमिकलमुळे आतडे, यकृत खराब होईल. विशेषत: लहान मुले आणि गरोदर महिलांवर सर्वाधिक दुष्परिणाम होतील. दुधातील भेसळ कशी ओळखायची? 1. सिंथेटिक दूध सिंथेटिक दुधाची चव कडू लागते. बोटांच्या दरम्यान चोळले की ते साबणासारखे स्निग्धपणासारखे वाटते. गरम झाल्यावर ते पिवळे होते. 2. पाण्याची भेसळ दुधाचा थेंब एका गुळगुळीत पृष्ठभागावर टाका.
जर थेंब हळू वाहत असेल आणि टाकलेल्या ठिकाणी पांढरा डाग राहत असेल तर ते शुद्ध दूध आहे. जर दूध पृष्ठभागावर पडल्यानंतर कोणत्याही प्रकारचे निशाण सोडत नसल्यास या स्थितीत तुमच्या दुधात भेसळ झाली आहे, असं समजा भेसळयुक्त दुधाचा एक थेंब कोणताही डाग न राहता त्वरीत वाहतो. 3. स्टार्चची चाचणी दुधात आयोडीनचे काही थेंब घाला.
मिक्स केल्यावर मिश्रणाचा रंग निळा होईल. तर त्यात स्टार्च मिसळलेला आहे समजा. 4. दुधात डिटर्जंट दूध आणि पाणी समप्रमाणात एकत्र करा.
जर त्यात फेस तयार होऊ लागला, तर याचा अर्थ असा की त्यात डिटर्जंटची भेसळ झाली आहे. 4. युरियाची भेसळ 10 मिलीलीटर दुधात पोटेशियम कार्बेनाइटचे 5-6 थेंब टाकावे. जर दुधाचा रंग पिवळा पडला तर समजावे की त्यात यूरियाची भेसळ केली आहे. हे वाचा - कच्चं दूध पिणं आरोग्यासाठी चांगलं की हानिकारक? काय सांगतात तज्ज्ञ वास जर तुमच्या दुधात भेसळ असेल किंवा त्यात कोणत्याही प्रकारचे सिंथेटिक असेल. दुधाचा वास घेऊन तुम्ही याबद्दल जाणून घेऊ शकता. जर दुधात सिंथेटिकची भेसळ झाली असेल. अशा परिस्थितीत, आपण त्याच्या खराब चव आणि वासाने याबद्दल सहजपणे शोधू शकता. खवा बनवून पाहा दुधापासून खवा बनवूनही तुम्ही त्यातील भेसळ जाणून घेऊ शकता. यासाठी एका भांड्यात दूध एका चमच्यावर मंद आचेवर ढवळत राहा. यानंतर तुम्हाला ते काढून 2 ते 3 तास थंड होण्याची वाट पहावी लागेल. खवा घन व तेलकट असल्यास तुमचं दूध शुद्ध आहे. जर तो दगडासारखे कठीण झाला असेल तर या प्रकरणात तुमचं दूध भेसळयुक्त आहे.