विजय वंजारा (मुंबई) 13 जानेवारी : अन्न आणि औषध प्रशासनाने मागच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजे 10 जानेवारी रोजी कांदिवलीमध्ये पाच ठिकाणी छापे टाकले. या छाप्यांमध्ये हजारो लिटर दुधाची भेसळ जप्त करण्यात आली आहे. मुंबईतील कांदिवली येथे 1064 लिटर भेसळयुक्त दूधसाठा जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच व्यक्तींवरोधात कांदिवलीतील समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे.
अन्न आणि औषध प्रशासनाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखा नियंत्रण, आर्थिक गुन्हे विभाग यांच्यासोबत संयुक्त कारवाई करण्यात आली. यामध्ये 10 जानेवारी 2023 रोजी कांदिवलीतील गावदेवी रोडवरील काजू पाडा येथे पाच ठिकाणी छापे टाकण्यात आले.
हे ही वाचा : ‘प्रेयसीचं भूत मला सतावतं..’; घाबरलेल्या प्रियकराची पोलिसांसमोर कबुली अन् अखेर 8 महिन्यांनी त्या हत्येचा उलगडा
या छाप्यांमध्ये गोकुळ व अमूल या नामांकित कंपनीच्या दुधाच्या पिशव्या ब्लेडने कापून त्यामधील काही दूध काढून पाणी भरून स्टोव्ह पीन व मेणबत्तीच्या साहाय्याने पुन्हा सीलबंद करण्यात येत असल्याचे आढळून आले.
या पाचही ठिकाणी दुधाचे एकूण नऊ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. पाचही ठिकाणावरून 62 हजार रुपये किमतीचा 1064 लिटर भेसळयुक्त दुधाचा साठा नष्ट करण्यात आला आहे. या पाचही व्यक्तींविरोधात कांदिवलीतील समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली.
हे ही वाचा : वाळू माफियाची गुंडगिरी, ट्रॅक्टर रोखला म्हणून वनरक्षकाला कुऱ्हाडीने मारहाण, गोंदियातील घटना
या कारवाईत वीरेय्या रोशैय्या गज्जी (52), श्रीनिवास नरसय्या वडलाकोंडा (39), नरेश मरेया जडाला (29), अजय्या गोपालू बोडपल्ली (42). रमा सत्यनारायण गज्जी (30) यांना अटक करण्यात आली आहे.